शनीच्या चंद्रावर आहेत उत्तुंग पर्वत

0
211

-एक शिखर माऊंट एव्हरेस्ट एवढे
– नासाच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण माहिती
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, ११ जानेवारी
नासाच्या कॅसिनी मोहिमेत शनी आणि त्याचे विविध चंद्र यांच्याविषयी बरीच मोलाची माहिती संशोधकांना मिळालेली आहे. कॅसिनीने टिपलेली शनीच्या चंद्रांची अनेक छायाचित्रे त्यांच्याविषयीच्या संशोधनाला सहाय्यभूत झाली आहेत. आता कॅसिनीने शनीच्या ‘मिमास’ या चंद्राची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. त्यामध्ये या चंद्रावरील उत्तुंग पर्वतांचेही चित्रण झाले आहे. हा पर्वत पृथ्वीवरील हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट पर्वतशिखरासारखाच आहे. तो मिमासवरील हर्शेल क्रेटर असे नाव दिलेल्या एका भव्य विवराच्या मध्यभागी उभा आहे.
हर्शेल विवरामधील हे शिखर एव्हरेस्टइतकेच उंच आहे. खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांचे नाव या विवराला दिले आहे. हे विवर १३९ किलोमीटर लांबीचे आहे. त्याने मिमासच्या भूपृष्ठाच्या व्यासाचा एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे. मिमासचा व्यास ३९६ किलोमीटर आहे. या विवराच्या भिंती उंच आहेत असे त्यांच्या सावल्यांवरून लक्षात येते. विवराच्या अगदी मध्यभागी हे अनोखे शिखर आहे. कॅसिनीवरील नॅरो अँगल कॅमेर्‍याच्या सहाय्याने २२ ऑक्टोबर २०१६ मध्ये या चंद्राची छायाचित्रे टिपण्यात आली होती. मिमासपासून १ लाख ८५ हजार किलोमीटर अंतरावरून ही छायाचित्रे टिपण्यात आली.