एक हजार वर्षांपूर्वीचा महाकाय वृक्ष कोसळला

0
271

वृत्तसंस्था
कॅलिफोर्निया, ११ जानेवारी
कॅलफोनिर्यातील भीषण वादळाने व मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली आहेच पण अनेक वृक्षही उन्मळून पडले आहेत. यंदाच्या वादळाने या भागातील प्राचीन म्हणजे एक हजार वर्षापूर्वीचे हजारो टन वजनाचे हे पायोनिअर केबिन ट्री जमीनदोस्त झाले. हे झाड नुसते प्राचीन नव्हते, तर या झाडाच्या रुंद खोडातून बोगदा काढून कारसाठी रस्ता बनविला गेला होता व त्यामुळे हे ठिकाण विशेष बनले होते.
अवाढव्य वाढणारे कोस्ट रेडवूड जातीचे हे झाड जगात फक्त कॅलिफोर्नियातच आढळते. या अवाढव्य झाडाचा महिमा जगभर पसरल्यानंतर पर्यटक येथे भेटी देऊ लागले. १९३१ साली २६३० हेक्टर परिसरात पसरलेल्या या जंगलाला स्टेट पार्कचा दर्जा मिळाला. केलावेरीज बिग ट्री स्टेट पार्क असे याचे नामकरण करण्यात आले. या झाडाला पायोनिअर केबिन ट्री किंवा द टनल ट्री असेही म्हटले जायचे. याची उंची तब्बल २५० मीटर होती. ३३ फूट म्हणजेच जवळपास १० मीटर एवढा याचा घेर होता. १३७ वर्षांपूर्वी या झाडाचे खोड गोल आकारात कोरण्यात आले. झाडामधून कोरलेल्या जागेत रस्ता होता, जिथून चारचाकी गाड्या सहज जायच्या.
या जंगलात भव्य आकाराची दोन झाडे होती. पहिले झाड ज्याला मदर ट्री म्हटले जायचे ते १९६० च्या पुरात कोसळले. महत्त्वाचे म्हणजे ते झाड पायोनिअर केबिन ट्रीपेक्षाही दोन पटीने मोठे होते.
कारसाठी रस्ता तयार केला जात असताना हे प्रचंड झाड रस्त्यात मध्येच येत होते. १३७ वर्षांपूर्वी हा रस्ता तयार केला गेला तेव्हा झाड तोडण्याऐवजी त्याच्या भल्या मोठ्या रूंद खोडातून कौशल्याने बोगदा तयार केला गेला होता व त्यातून रस्ता बनविला गेला होता. या बोगद्यातून दररोज हजारो वाहने जात येत असतात.
इतकेच नव्हे तर पर्यटक आणि प्रवासी यांच्यासाठी हा बोगदा मोठे आकर्षण बनला होता. यंदाचे भयानक वादळ हा वृक्ष पेलू शकला नाही.