‘गूड बाय अमेरिकन्स’, लोकशाही सांभाळा

0
245

ओबामा यांनी मानले जनतेचे आभार
वृत्तसंस्था
शिकागो, ११ जानेवारी
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज बुधवारी आपल्या शेवटच्या अध्यक्षीय भाषणातून अमेरिकन नागरिकांचा भावनात्मक निरोप घेतला. वाढता वंशवाद, विषमता आणि राजकीय गोंधळाच्या स्थितीमुळे देशाच्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या धोक्यापासून लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी आता नागरिकांचीच आहे, असे उद्‌गारही बराक ओबामा यांनी यावेळी काढले.
अमेरिकन नागरिकांनी आपल्याला एक चांगला राष्ट्राध्यक्ष आणि चांगली व्यक्ती होण्यास मदत केली. जेव्हा सामान्य माणूस सक्रिय सहभागी होतो, तेव्हाच बदल शक्य असतो. माझ्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा, असे मी तुम्हाला मुळीच सांगत नाही, तर तुम्ही आता स्वत:च्याच क्षमतेवर विश्‍वास ठेवा आणि अपेक्षित बदल घडवून आणा, असे ओबामा म्हणाले. शिकागो शहरात ते आपल्या सुमारे २० हजारावर समर्थक व चाहत्यांना संबोधित होते. सुमारे ५५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सलग आठ वर्षे अमेरिकेची सेवा करण्याची संधी मला तुमच्यामुळेच लाभली, असे आवर्जून सांगितले.
गेल्या आठ वर्षांत आपण खूप काही करून दाखविले आहे आणि भविष्यातही तुम्ही खूप काही करू शकणार आहात, असे सांगताना त्यांनी ओबामा यांनी लोकशाहीला असलेल्या धोक्याचाही इशारा दिला. आपण सर्वांनीच देशाचे नागरिक या नात्याने यापुढे सतर्क राहण्याची गरज आहे. अंतर्गत आणि बाह्य धोका निर्माण झालेला आहे. लोकशाहीची मूल्ये जोपासण्याची जबाबदारी आता आपल्यालाच पार पाडावी लागणार आहे, असेही ओबामा म्हणाले.
सत्तांतर सुरळीत होईल
येत्या २० जानेवारी रोजी अमेरिकेत सत्तांतर होणार आहे. त्यावेळी लोकशाहीची खरी परीक्षा होणार आहे. एका लोकनियुक्त राष्ट्राध्यक्षाच्या हातून दुसर्‍या लोकनियुक्त राष्ट्राध्यक्षांकडे सत्तेची सूत्रे सोपविण्यात येणार आहे. माझ्या कार्यकाळात अमेरिका अतिशय मजबूत झाली. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही अडचणीविना सत्ता सोपवण्याचे वचन मी दिले आहे, असेही ओबामा यांनी स्पष्ट केले.
माझ्या सत्ताकाळात गेल्या आठ वर्षांत अमेरिकेवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. इसिसचा समूळ नाश करण्यात येईल, असे ठामपणे सांगताना अमेरिकेला धोका पोहोचविण्याचे स्वप्न पाहणारा कोणीही सुरक्षित राहणार नाही, असा इशाराही बराक ओबामांनी दिला.
मिशेलचे मानले आभार
यावेळी बराक ओबामा यांनी पत्नी मिशेल ओबामांचेही कौतुक करताना विशेष आभार मानले. गेल्या २५ वर्षांत ती फक्त चांगली पत्नी आणि आईच नाही, तर चांगली मैत्रीणही झाली. अमेरिकन तरुणांचे मनोधैर्य वाढविण्याबद्दल मिशेल यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.