कॉंग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी

0
159

-ब्लॉक अध्यक्ष पदावरून वाद
-राऊत, चतुर्वेदी- ठाकरे यांच्यात जुंपली
तभा वृत्तसेवा
नागपूर, ११ जानेवारी
कॉंग्रेस नेत्यांमधील वाद मंगळवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पार्लमेंट्री बोर्डामध्ये ब्लॉक अध्यक्षांना बसू दिले नाही म्हणून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना जाब विचारला असता, या तिन्ही नेत्यांमध्ये देवडिया कॉंग्रेस भवनात चांगलीच खडाजंगी झाली. आरोप- प्रत्यारोपाचा हा सामना तब्बल अर्धा तास रंगला. नेत्यांमधील ही भांडणे बघून कॉंग्रेसचे तिकीट नको रे बाबा, असे म्हणण्याची पाळी अनेक इच्छुकांवर आली.
विधानसभा निवडणुकीत उपराजधानीतून कॉंग्रेसचा सफाया झाला तरीही नेत्यांमधील वाद संपता संपत नाहीये. कॉंग्रेस शहर कार्यकारिणीवरून शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी खा. विलास मुत्तेमवार विरुद्ध माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. सतीश चतुर्वेदी असा वादाचा सामना रंगत आहे. शहर कॉंग्रेस कार्यकारिणीच्या तीन बैठकांना अनुपस्थित राहणार्‍या या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना ठाकरे यांनी कार्यकारिणीतून काढून टाकले. मात्र, महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पार्लमेंट्री बोर्ड गठित केले होते. त्यात ब्लॉक अध्यक्ष, युवक कॉंग्रेस अध्यक्षांचा समावेश होता. परंतु, कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान विकास ठाकरे यांनी डॉ. राऊत व डॉ. चतुर्वेदी समर्थक ब्लॉक अध्यक्षाना पार्लमेंट्री बोर्डात बसू दिले नाही. त्यामुळे राऊत, चतुर्वेदी संतप्त झाले होते. पार्लमेंट्री बोर्डाच्या शिफारशीवरून उमेदवारांना तिकीट वाटप केले जाणार आहे. पार्लमेंट्री बोर्डात इच्छुकांच्या नावासमोर अधिकाधिक सदस्यांची पसंती असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा ब्लॉक अध्यक्षांना मुलाखतीदरम्यान बसू देण्याचा राऊत, चतुर्वेदी यांचा आग्रह होता. मात्र ही विनंती शहराध्यक्ष ठाकरे यांनी धुडकावून लावली. त्यामुळे या तिन्ही नेत्यांमध्ये पार्लमेंट्री बोर्डातील सदस्यांसमोर जोरदार भांडण झाले. या तिघांमध्ये जवळपास अर्धा तास खडाजंगी झाली. एकमेकांना पाहून घेण्याच्या धमक्याही या नेत्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे दोन्ही भ्रमणध्वनी क्रमांक बंद होते व ते दिल्लीत श्रेष्ठींना भेटण्यास गेले असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
राऊत, चतुर्वेदी समर्थकांच्या पत्रकावरून शहराध्यक्ष गायब
कॉंग्रेसतर्फे मनपा निवडणुकीसाठी अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. डॉ. नितीन राऊत व डॉ. सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनी महिनाभरापासूनच प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी काहींनी पत्रके छापून वाटणे सुरू केले. मात्र, या पत्रकामध्ये माजी खा. विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची छायाचित्रे नाही. लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांहून अधिक मतदारांनी मुत्तेमवार यांना नाकारले. त्यांच्याविषयी जनतेत प्रचंड रोष आहे. त्यामुळे अशा नेत्यांची छायाचित्रे छापून जनतेच्या रोषाला कोण सामोरे जाणार? असा सवाल चतुर्वेदी समर्थकांनी उपस्थित करीत त्यापेक्षा मुत्तेमवारांचे छायाचित्रे न छापलेलेच बरे, असा निर्णय घेतल्याचे समजते.