बसस्थानक परिसरात वेगळ्या विदर्भाच्या घोषणा

0
156

– शेकडो कार्यकर्त्यांना अटक
– अर्धा तास वाहतूक खोळंबली
तभा वृत्तसेवा
नागपूर, ११ जानेवारी
वेगळे विदर्भ राज्य आणि विदर्भातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी, ११ जानेवारीला संपूर्ण विदर्भात चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी ११.३० वाजता मध्यवर्ती बसस्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वेगळ्या विदर्भासह विविध घोषणांनी संपूर्ण बसस्थानक परिसर व रस्ता दुमदुमून गेला. काही काळ वाहतूकही रोखून धरण्यात आली. बसस्थानकाच्या प्रवेशद्वार व बाहेर निघण्याच्या गेटवरच आंदोलकांनी ठाण मांडल्यामुळे प्रवासी वाहतूकही खोळंबली होती. यावेळी तुमचे आंदोलन बेकायदेशीर आहे, ते कृपा करून बंद करा, असे पोलिसांकडून आंदोलकांना सांगण्यात आले. पण, आंदोलक मागे हटायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी सर्वांना अटक केली.
आंदोलनाचे नेतृत्व राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ऍड. नंदा पराते, अरविंद देशमुख, दिलीप नरवडिया, श्याम वाघ, डॉ. जी. एस. ख्वाजा, अतुल रणदिवे यांनी केले. आंदोलनात शंभर ते दीडशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या…, भाजपा सरकार होश में आओ, गडकरी, फडणवीस दिलेले आश्‍वासन पाळा, विदर्भाच्या दगाबाजांना माफी नाही, वेगळा विदर्भ घेऊच यासह अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दिवसभराचे आंदोलन अर्ध्या तासात संपले!
समितीच्या नेत्यांनी सकाळी ११ ते ५ या वेळेत आणि २५ हजारांच्या उपस्थितीत आंदोलन होईल, असे सांगितले होते. मात्र, आंदोलन उशिरा सुरू झाले व अवघ्या अर्ध्या तासात संपलेही! जेमतेम १०० ते १५० जणांनी या आंदोलनात भाग घेतला. यातही पत्रपरिषदेत उपस्थित असणारे नेहमीचे चेहरे व काही युवकांचाच अधिक समावेश होता. दोन-तीन युवकांनी एसटी बसवर चढून आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न केला. पण, हा विरोधही जेमतेम दहा मिनिटातच ओसरला.

वाहतूक खोळंबली
अध्यापक भवनासमोर आंदोलक वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत बसस्थानकातून एसटी बाहेर पडण्याच्या गेटवर पोहोचले व नारेबाजी करू लागले. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने आंदोलक आत शिरू शकले नाही. मात्र, काही वेळपर्यंत वाहतूक खोळंबली होती.

अधिकार्‍यांचे प्रसंगावधान, आंदोलकांची धावाधाव
आंदोलकांनी गेटवरच ठाण मांडल्यामुळे एसटी गाड्या बाहेर येऊ शकत नव्हत्या. प्रवाशांची गैरसोयही होत होती. यावर एसटीच्या अधिकार्‍यांनी प्रसंगावधान राखून प्रवेशद्वारातूनच गाड्या सोडण्यास सुरुवात केली. जवळपास १५ ते २० गाड्या बाहेर निघाल्याही. मात्र, आंदोलकांपैकी कुणाचे तरी लक्ष या प्रकाराकडे गेले व झालेल्या आरडाओरडीने आंदोलकांनी प्रवेशद्वाराकडे धाव घेत वाहतूक बंद पाडली. दरम्यान, एक उत्साही कार्यकर्ता एसटीच्या टपावर चढून नारेबाजी करू लागला. त्याला पाहून आणखी दोघांना हुरूप आला आणि ते सुद्धा टपावर चढले. पोलिसांनी हा प्रकार अधिक ताणू न देता तीनही युवकांना खाली उतरवून अटक केली.