ओबामांच्या भाषणाचे जागतिक संदर्भ

0
152

‘‘लोकशाही संस्थेचे जाळे मजबूत करायचे तर आपण पक्षभेद विसरून काम केले पाहिजे. या व्यवस्थेत लोकांना मतदान करणे सोपे झाले पाहिजे, जिकिरीचे नाही. अमेरिकेसारख्या एका प्रगत देशातही लोक मतदानाच्या प्रकियेत सहभागी होत नसतील, तर ही बाब अगदीच दखलपात्र ठरते. राजकारणात पैशाचे महत्त्व तेव्हा वाढते, जेव्हा सर्वसामान्यांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्‍वास उडू लागतो.’’
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी परवा आपल्या निरोपाच्या भाषणात केवळ उपरोक्त वक्तव्यच केले नाही, तर शिकागोतून सार्‍या देशाला संबोधित करताना, संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या आपल्या भाषणातून वेगवेगळ्या स्थानिक व जागतिक मुद्यांचा ऊहापोह केला. यानिमित्ताने त्यांनी अमेरिकन जनतेला केलेले आवाहन, विविध समस्यांची त्यांनी केलेली मांडणी, त्यामागील कारणांची मीमांसा आणि त्याच्या उत्तरादाखल अपेक्षिलेले उपाय, म्हटलं तर अमेरिकन जनतेकडून आहेत आणि म्हटलं तर सार्‍या जगाकडून आहेत.
जागतिक पातळीवरील राजकारणाची सूत्रे आज ज्या पद्धतीने काही मोजक्या देशांच्या हातात एकवटली जाताहेत, त्या माध्यमातून महाशक्ती बनण्यासाठीची जी धडपड काही देश करताहेत, बलाढ्य केंद्र बनण्याच्या नादात सर्वसामान्य नागरिकांना काय हवं याचा जो विसर त्या देशांना पडतोय्, अशा परिस्थितीत भविष्यात जे चित्र निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे, ते बघितल्यानंतर महाशक्ती पदावर आरूढ असलेल्या आणि त्या पदावर आरूढ होण्याची स्वप्नं बघणार्‍या, अशा सर्वांनाच विचार करायला लावणारी अशी मांडणी त्यांनी आपल्या या भाषणातून सहज साधली होती.
संपूर्ण जगावर सत्ता गाजविण्याची अमेरिकेची मनीषा तशी कधीच लपून राहिलेली नाही. केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर इतरही सर्वच दृष्टिकोनांतून आपण जगावेगळे आणि अतिशय प्रगत असल्याचा त्यांचा कायम दावा राहिला आहे. पण तरीही या देशात आजवर एकही महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकलेली नाही. एका कृष्णवर्णीयाला त्या पदापर्यंत पोहोचायला वीसावे शतक उजाडावे लागले, हे वास्तव कसे नाकारता येईल? ओबामा यांच्यानंतर हे पद भूषविण्यास सज्ज असलेले डोनाल्ड ट्रम्प ज्या वेगवान गतीने वादग्रस्त आणि बेताल विधाने करीत सुटले आहेत, ते बघता धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा दिशादर्शनाची अपेक्षा जगाने यापुढे अमेरिकेकडून करावी की नाही, अशी परिस्थिती असताना, आजवरच्या अजरामर इतिहासाची कूस बदलत या महाशक्तीच्या
सर्वोच्चपदी विराजमान झालेले आणि दोन सत्र या देशाचा कारभार सांभाळल्यानंतर आता राजकीयदृष्ट्या निवृत्तीच्या मार्गावर असलेले ओबामा त्या पदाची सूत्रे खाली ठेवताना त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या कार्याचा गोषवारा तर मांडतातच, पण या काळात आपल्या हातून घडू न शकलेल्या बाबींसाठीची खंतही ते तेवढ्याच निरलसतेने व्यक्त करतात.
जगातील सर्वात शक्तिमान म्हणवल्या जाणार्‍या या देशातील कृष्णवर्णीयांच्या वाट्याला आलेला भेदभाव केवळ ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्याने संपेल, ही अपेक्षा तशी चुकीचीच. पण निदान ती संपविण्याच्या दिशेने प्रवास तरी सुरू व्हायला हवा होता. काही प्रमाणात तो तसा सुरू झाला असेलही कदाचित, पण त्याचे हवे तसे परिणाम दृश्य स्वरूपात अजून तरी दिसलेले नाहीत. लोकांच्या या संदर्भातील अपेक्षा पूर्ण करता न आल्याची भावना त्यांच्या भाषणातून व्यक्त होते. सारेच प्रश्‍न समाजातल्या केवळ एका वर्गाची निकड लक्षात घेऊन तोलले गेले, तर मग समस्या मुळासह सुटणारच नाही, हे सांगताना जी सर्वसमावेशकतेची सूत्रे अधोरेखित करण्याचा प्रयत्न ते करतात, ती जगातील कुठल्याही एखाद्या देशाला लागू पडतील.
‘‘जोपर्यंत आपण आपल्या राज्यघटनेशी प्रतारणा करीत नाही, त्यातील तत्त्वांना तिलांजली देत नाही, तोपर्यंत जगातील कुठलाच देश अमेरिकेचा पराभव करू शकणार नाही. अगदी चीन आणि रशिया देखील नाही. म्हणूनच, ज्या तत्त्वांवर हा देश आजवर उभा राहिला आहे, ती तत्त्वे आपण सोडता कामा नये. शेजारच्या छोट्या छोट्या देशांना धाकात ठेवण्याची आपली भूमिका कधीच नसावी ’’, हे त्यांचे विधान म्हटलं तर अमेरिकेची स्वत:ची भूमिका आहे आणि म्हटलं तर महाशक्ती पदाच्या स्पर्धेत उतरू बघणार्‍या देशांसाठी दिशादर्शनही आहे. आपण आजही जागतिक महासत्ता असल्याच्या आविर्भावात वावरणार्‍या रशियाला आणि त्या दिशेने वेगाने प्रवास करीत असलेल्या चीनला यातून द्यायचा तो ‘संदेश’ दिला गेला आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी क्रमांक एकवर आपणच असल्याचे ठणकावून सांगण्याची संधीही त्यांनी यानिमित्ताने साधल्याचे लक्षात येते. शैक्षणिक, सामाजिक, सांपत्तिक आणि वैचारिक पातळीचा विचार केला तर खरोखरीच प्रगत असा समाज इथे आहे. घरातल्या भांडणात नवर्‍याने एक थापड मारली तरी आपल्या अधिकाराचे हनन झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविणारी महिला, आठ वर्षांच्या काळात ओबामांचे कुठे काय चुकले याची तर्कशुद्ध चर्चा करणारा इथला संपन्न वर्ग, हिलरी क्लिटंनच्या पराभवानंतर ओघळत्या अश्रूंमधून भावना व्यक्त करणारी इथली भावुक तरुणाई…
तरीही हा प्रगल्भ म्हणवणारा समाज मतदानाच्या प्रक्रियेत हव्या त्या प्रमाणात सहभागी होत नाही. जनसामान्यांच्या मनातली लोकशाही व्यवस्थेबाबतची ही अनास्था अलीकडे जगात सर्वदूर अनुभवायला मिळते आहे अन् सर्वदूरच त्याचे नकारात्मक परिणामही दिसताहेत. अमेरिकेतील परवाच्या निवडणुकीचे निकाल तर त्याचे एक ‘उत्तम उदाहरण’ ठरले आहे. अन्यथा केवळ ‘क्लिटंन’ नको म्हणून हिलरींना पराभव पत्करावा लागणे आणि वादग्रस्त ठरूनही, न पेक्षा असूनही, डोनाल्ड ट्रम्प यांचा मात्र विजय होणे, याचे व्यवस्थित पण पातळी राखून झालेले विश्‍लेषण हे ओबामांच्या परवाच्या भाषणाचे वैशिष्ट्य होते. व्हाईट हाऊसमधील निवासाच्या या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेल्या कुटुंबीयांप्रतिच्या सद्भावना व्यक्त करतानाचा तो गहिवर, उर्वरित जगाला इशारा देतानाचा तो करारी बाणा, कृष्णवर्णीयांसाठीची ती कणव, हा वर्ग डावलून अमेरिकेची प्रगती होऊ शकत नाही हे तिथल्या श्‍वेतवर्णीयांना समजावून सांगतानाचे आर्जव, जी कर्तबगारी बजावता आली त्यासाठीचा सार्थ अभिमान, जे करता आलं नाही त्यासाठीची प्रामाणिक खंत… आणि त्याहीपेक्षा हे भाषण ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे’ आहे याची जाणीव मनाला सतत होत राहावी असे जागतिक पातळीवरचे चिंतन त्यात सामावलेले…
धार्मिक कट्टरतावाद, असहिष्णुता, अतिरेकी राष्ट्रवाद, कायद्याचा संकोच होणे, त्याबद्दलचा आदर संपणे… यातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही युद्धाची परिस्थिती निर्माण होते, असे सांगताना ते आज जगात सर्वदूर फोफावलेल्या दहशतवादाच्या मुद्याला स्पर्श करतात आणि त्याविरुद्ध ठामपणे उभे राहायचे तर एकत्रित लढ्याची गरजही प्रतिपादित करतात. बदल घडवून आणण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्‍वास ठेवण्यापेक्षाही त्याबाबतच्या स्वत:तल्या क्षमतेवर अधिक विश्‍वास ठेवण्याच्या, त्यांनी अमेरिकन जनतेला केलेल्या आवाहनाचा संदर्भही जागतिक पातळीवरच तोलला पाहिजे. एकूणच, लोकशाही शाबूत ठेवायची तर सर्वांनीच जागता पहारा देण्याची आवश्यकता आहे. ओबामांनी अमेरिकेपुरतं सांगितलं तरी उर्वरित जगाचीही गरज तीच आहे… शेवटी काय, ‘येस वुई कॅन’चे सूत्र केवळ त्या एकाच देशाला कसे लागू होईल? त्याचाही संदर्भ वैश्‍विकच आहे…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३