इनऍक्टिव्ह अकाऊंट

0
205

आजचा दिवस राधासाठी काही चांगला उजाडला नव्हता. सकाळी एक तर उशिरा झोप उघडली त्यामुळे धावपळ झाली. मग कॅब उशिरा आली. कंपनीत पोहोचल्यावर कामाची खूप गडबड होती. कस्टमरच्या मेल लवकर डिस्पॅच करायच्या होत्या. त्यात कहर म्हणजे रवीचा फोन!
‘‘हं बोल रे, काय म्हणतो?’’ राधाने मोबाईल कानाला लावला नजर मात्र पीसीवर होती.
‘‘राधा, जरा भेटतेस संध्याकाळी? काम आहे महत्त्वाचं.’’
‘‘बघते जमलं तर! आमचा लंच ब्रेक झालाय तेव्हा तुझ्याशी नंतर बोलते.’’ आनंदला बघून राधाने मोबाईल बंद केला. तिला घाईने मोबाईल बंद करताना बघून त्याला शंका आलीच, ‘‘तू पुन्हा रवीला फोन केलास?’’ आनंदने नाराजी व्यक्त केली.
‘‘नाही, मी फक्त रिसिव्ह केला.’’
‘‘राधा, तो अतिशय चंट आहे. वापरून घेतोय तुला. डोळे कधी उघडणार तुझे? तो भावनिक फसवणूक करतोय तुझी. त्याच्यामुळे एखाद्या दिवशी गोत्यात येशील. मग बस पश्‍चात्ताप करत. शी! मूडच गेलं जेवायचं, तू बस त्याची मदत करत. जातो मी.’’ तो डबा बंद करत रागारागात म्हणाला. राधालाही मग जेवायची इच्छाच झाली नाही.
राधा आणि रवी दोघे बालमित्र. दोघांचं शिक्षण एकत्र झालं. दोघही सॉफ्टवेअर इंजिनीअर. आनंद आणि राधा एकाच कंपनीत होते नोकरीला. त्यांची कंपनी ‘माईंडस्पेस कन्सलटन्सी’ डेबिट/क्रेडिट कार्डचे बदलणारे पत्ते, फोन बँकिंग, नेट बँकिंगच्या संदर्भातली कामं हाताळायची. राधा कस्टमरच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवायची.
आनंदच्या सहवासात आल्यावर तिला रवी आणि आनंद यांच्यातला बुद्धीचा फरक जाणवू लागला. नकळत ती आनंदच्या हुशारीवर फिदा झाली. या उलट रवीचा कामचुकारपणा, फसवेगिरी नको वाटायची तिला. तरीसुद्धा ती त्याची मैत्री नाकारू शकत नव्हती. कारण बालमित्र होता ना तो! आताही नेहमीप्रमाणे त्याच्या नवीन व्यवसायाचे बारा वाजले होते आणि घेणेकरी त्रास देत होते. त्यामुळे तो सारखे राधाला फोन करत होता.
चारच्या सुमारास राधा हाफ डे घेऊन रवीला भेटायला गेली. त्यांच्या अवांतर गप्पा झाल्या अन् अचानक रवीने तिला २० लाखांची डिमांड केली.
‘‘काय म्हणतोस, २० लाख? माझ्याकडे कुठून आले इतके पैसे?’’ राधा आश्‍चर्याने म्हणाली.
‘‘मी व्यवसायासाठी कर्ज घेतलं, पण व्यवसाय बुडाला. आता बँकवाले माझ्या मागे लागलेत. प्लीज मदत कर गं. मी तुझे सगळे पैसे परत करेन, नाही तर आता मला जीव द्यावा लागेल,’’ रवी काकुळतेने म्हणाला.
‘‘रवी, अरे मी कुठून आणू इतकी मोठी रक्कम?’’
‘‘राधा, मी तुला एक आयडिया सांगतो. तू जर माझं ऐकलंस तर माझी गरज पूर्ण होईल.’’ ‘‘ते कसं काय रवी?’’ राधाने विचारले.
‘‘हे बघ राधा, तुझी कंपनी ‘सितारा बँके’च्या देशभरातल्या शाखेचे अकाऊंट हँडल करते ना? त्याच संदर्भात मला तुला काही सांगायचंय. हे बघ मागे मी जेव्हा एका बँकेत नोकरी करायचो तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, अनेक लोकं महिनोंमहिने आपले अकाऊंट मेंटेन करत नाही. आपण अशी अकाऊंट शोधून त्यातले पैेसे काढून घेऊ.’’
‘‘रवी आर यू मॅड? शुद्धीवर आहेस का?’’ राधा ओरडली.
‘‘अगं असं ओरडू नको. कुणालाही काही कळणार नाही आणि माझे पैसे आले की टाकीन न परत अकाऊंटला.’’
‘‘हे बघ रवी तू चांगला मित्र असला तरी तुझ्यासाठी माझं नाव खराब करणार नाही. हे नाही जमणार मला, सॉरी.’’
‘‘राधा तू हेच ओळखलं मला? अगं मी खात्री देतो की, कोणत्याही संकटात तुला सापडू देणार नाही. तू फक्त इतकंच कर की, ‘इनऍक्टिव्ह’ असलेल्या काही अकाऊंटची माहिती मला दे. बाकी सगळं मी बघतो,’’ तो उठत म्हणाला.
दुसर्‍या दिवशी पुन्हा रवीचा बाराच्या सुमारास फोन आला.
‘‘हे बघ रवी, जरा वेळ दे मला. सितारा बँकेचे एक लाखापेक्षा जास्त अकाऊंट आहेत आमच्याकडे.’’
‘‘मग काही अकाऊंट मला दे मी बघतो. हवं तर पेनड्राइव्हवर डाऊनलोड कर,’’ रवी म्हणाला
‘‘अरे पण पेनड्राइव्ह आणता येत नाही कंपनीत. चेकिंग असतं आमच्याकडे. तरी बघते रात्री येऊन. तुला उद्या फोन करते.’’
‘‘बरं ठीक आहे. मी वाट बघेन.’’
दुसर्‍या दिवशी सकाळपासून रवी राधाच्या फोनची वाट पहात होता. तीनच्या सुमारास राधाच घरी आली.
‘‘रवी हा घे पेनड्राइव्ह. यात बरेच अकाऊंट नंबर आहे.’’
‘‘थँक्स राधा! चल आपण लगेच बघू.’’ रवीने बोलता बोलता लॅपटॉप आणला आणि पेनड्राइव्ह त्याला जोडला. ‘‘हे बघ राधा, तिच्यासमोर लॅपटॉप ठेवत तो पुढे म्हणाला, हे वरंगलच्या राजीव मूर्तीचे अकाऊंट आहे. मागच्या अडीच वर्षांपासून कोणी ऑपरेट केले नाही. एकतर याला वेळ नसेल किंवा याला पैशाची गरज नाही इतका हा श्रीमंत असेल. तू थांब जरा मी याच्या कॉण्टॅक्ट नंबरवर फोन करतो.’’
‘‘थांब रवी, वेडा आहेस का? फोन करून तू अडकशील ना!’’
‘‘अगं राधा तो लँडलाईन नंबर आहे. तेव्हा माझा नंबर समजणार नाही. काळजी करू नकोस.’’ बोलता बोलता त्याने फोन लावला.
‘‘हॅलो, राजीवजी है क्या? मुझे उनसे बात करनी है.’’ पलीकडून ‘‘कौन’’ असं विचारताच रवी बोलू लागला.
‘‘जी नही| पापा को गुजरे तो ढाई साल हो गये| आप कौन?’’
‘‘मैं हैदराबाद से उनका दोस्त बोल रहा था| ठीक है रखता हूँ|’’ रवीने झटक्यात फोन कट केला.
‘‘लो राधा मॅडम, ये साहाब तो जिंदाही नही है| हमे कोई धोका नही है| अगं याच्या अकाऊंटला ६५ लाख कॅश आहे कुजत पडलेली. आपण ती काढू आणि माझं काम झालं की, मी वापस टाकून देईन. आहे ना सिंपल.’’
‘‘रवी तुला वाटतं तितकं सोपं नाही ते. त्याचे डेबिट कार्ड, चेकबुक, नेटबँकिंग पासवर्ड सगळं काही त्याच्या फॅमिलीकडे असणार, मग?’’
‘‘राधा मी चेंज ऍड्रेस रिक्वेस्ट टाकणार आहे,’’ रवी म्हणाला. ‘‘चेंज ऍड्रेस रिक्वेस्ट ब्रँच ऑफिसला जाईल, मग बँक ते सगळे कागदं व्हेरिफाय करून तुझ्या कंपनीला पाठवेल. जे काही बदल होणार असतील ते तुझ्या कंपनीत होतील. हे सगळं तूच सांभाळून घे आणि मला पाठवून पण दे.’’
‘‘रवी यासाठी खातेधारकाची सही लागेल त्याचं काय?’
‘‘त्याची सही फारच साधी आहे. नुसती ‘एम. राजीव’ अशी. ती कॉपी करणं फारच सोपं आहे. राधा आता तू जास्त फाटे फोडू नको. आता पुढे ऐक. सर्व पेपर्स आधी ब्रँच ऑफिस आणि मग आऊटसोर्स एजन्सीकडे जातात. नंतर जुन्या पत्त्यावर व्हेरिफाय व्हायला जातात तर तू हे सार स्किप कर. तू सरळ तुझ्या कंपनीतून नव्या ऍड्रेसचे पत्र डिस्पॅच कर. मग मला लगेच कळव.’’
‘‘बाप रे! कठीण आहे मग, कारण हे अकाऊंट वरंगलचं आहे आणि त्या शाखेची इन्चार्ज मेघना आहे. तिचा पीसी मी कसा वापरू? आपले पासवर्ड कधी शेअर करायचे नसतात हे माहीत नाही का तुला?’’ राधा चिडून म्हणाली.
‘‘हो गं बाई! तुझं खरं असलं तरी हे करायचं आहेच ना? जा आता, ऑल द बेस्ट!’’
रवीकडून घरी आली तरी राधाचे विचार काही संपले नव्हते. आनंद कधीचा तिला न्याहाळतोय, हे पण तिच्या लक्षात आलं नाही.
आज सकाळपासुन राधा बावरलेली होती. भराभर रोजची कामं आटोपून ती कंपनीत पोहोचली. आधी तिने आपली काही काम संपवली, तोच तिला मेघना बाहेर जाताना दिसली.
‘‘अगं मेघना, माझ्या पीसीचं बहुतेक सर्वर डाऊन आहे आणि मला कस्टमरना अर्जंट मेल टाकायच्या आहेत. प्लीज तुझा पीसी वापरू का?’’ राधाने तिला थांबवून विचारलं
‘‘ए बाई, पासवर्ड शेयर करायचा नसतो माहिती नाही का तुला?’’ ‘‘माहिती आहे गं मेघना, पण काम वेळेवर झालं नाही तर सर ओरडतील. तुला माहिती आहे ना त्यांना कारणे दिलेली आवडत नाही. प्लीज! प्लीज हेल्प मी!’’
‘बरं ठीक आहे. तू इतके आर्जवं करतेच आहे तर मी संध्याकाळी जाण्यापूर्वी पासवर्ड चेंज करेन’’ मेघनाने तिला मेल आयडी आणि पासवर्ड देत म्हटले. ती वळल्यावर राधाने लगेच तिची लिंक ओपन केली आणि रवीला फोन केला, ‘‘हां रवी, पटकन पत्ता सांग.’’
‘‘हं लिहून घे, चंदननगर, मुलुंड वेस्ट, मुंबई,’’ तो म्हणाला.
‘‘रवि मी प्रोसिजर सुरू केली आहे. ष्/४ दिवसांत तुला चेकबुक, डेबिट कार्ड, नेट पासवर्ड सारं काही मिळेल.’’ बोलता बोलता राधाने वापरलेला डाटा डिलीट करायला सुरुवात केली.
राधा दोन-चार दिवस म्हणाली त्याप्रमाणे दोन दिवसांनी रवीला त्याने सांगितलेल्या पत्त्यावर ‘सितारा बँके’ची सारी डाक्युमेंट्‌स मिळाली. राजीव मूर्तीची खोटी सही करून त्याने कुरियर घेतले. लिफाफ्यात त्याला हवे असलेले सारे काही होते. मग काय? आठ दिवसांत त्याने येनकेनप्रकारे चाळीस लाख बँकेतून काढले.
दोघांनी मिळून केलेल्या गुन्ह्याची त्यांना कल्पना होती. त्यातले धोके, त्यातले भगदाड त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांना काही फिकीर नव्हती पकडले जाण्याची, पण त्यातला एक लुपहोल त्यांच्या लक्षात आला नाही की, जेव्हा खातेधारक आपला पत्ता बदलतो तेव्हा बँक झालेल्या या बदलाची नोटीस जुना आणि नवीन अशा दोन्ही पत्त्यांवर पाठवते. बँकेकडून जेव्हा ही नोटीस जुन्या पत्त्यावर गेली तेव्हा राजीव मूर्तीच्या मुलाने ते कुरियर सही करून घेतले. लिफाफा उघडून त्याने जेव्हा आतले पेपर बघितले तेव्हा तो अवाक् झाला. त्याने अशी कोणतीही रिक्वेस्ट टाकली नव्हती आणि मुळात तो त्या अकाऊंटबद्दल विसरलाही होता.
तो लगेच बँकेत जाऊन मॅनेजरला भेटला. त्यानं जे सांगितले ते ऐकन मॅनेजरचा विश्‍वासच बसेना.
‘‘मला सांगा जर तुम्ही ही रिक्वेस्ट दिली नाही तर मग कोणी दिली? त्याशिवाय का हे पत्र तुम्हाला मिळालं? तरीही थांबा जरा मी चौकशी करतो’’ बोलता बोलता मॅनेजरने इंटरकॉमवरून संबंधित कर्मचार्‍याला बोलावले.
‘‘सुधीर हे पत्र बघ. हे आपल्या बँकेकडून या मूर्तींच्या घरी पाठवलंय.’’
‘‘हो सर, हे पत्र तर मीच पाठवलं होतं कुरियरने.’’
‘‘सुधीर ही पत्ता बदलायची रिक्वेस्ट कोणी आणि कधी टाकलीय बघा.’’
‘‘सर ते तर माहीत नाही, पण ही रिक्वेस्ट इंटिमेशन बॅकएन्ड कंपनी ‘माइडस्पेस कन्सलटन्सी’कडून आली होती. नक्कीच यांनी काही घोटाळा केला असणार! मी सगळी चौकशी करतो. या अकाऊंटची सगळी डिटेल्स चेक करतो लवकर.’’
पंधराच मिनिटांत सुधीर अकाऊंट डिटेल्स घेऊन आला. ‘‘सर हे अकाऊंट अडीच वर्षांपासून बंद होतं. त्यानंतर चेंज ऍड्रेसनुसार चेकबुक, डेबिट कार्ड पाठविल्यानंतर दहा दिवसांपूर्वीच हे सुरू झालं. आतापर्यंत बारा वेळा ऑपरेट करून यातून चाळीस लाख रुपये काढल्या गेले.’’
‘‘मि. मूर्ती ही चूक आमची नाही तर माईंडस्पेस कन्सलटन्सीकडून झाली आहे. शांत व्हा! मी लगेच चौकशी करतो आहे. सुधीर तू लगेच माईंडस्पेसच्या विजलन्स इन्चार्जला फोन कर.’’
सुधीरने मुंबईच्या माईंडस्पेसला चटकन फोन केला
‘‘हॅलो सर, मी मुलुंड माईंडस्पेस कन्सलटन्सीमधून माथूर बोलतो आहे. मि. सुधीरने सारे सांगितले मला. अहो पण क्रॉस व्हेरिफिकेशनशिवाय हे कसं शक्य आहे?’’
‘‘झालंय मि. माथूर, व्हेरिफिकेशन न होता हे सारं झालंय. चाळीस लाख काढल्या गेले आहेत. लवकरात लवकर तपास करा.’’ माईंडस्ेपस कन्सलटन्सीत तपासाला वेगाने सुरुवात झाली. ‘‘सर, यासाठी वापरलेला लागइन आयडी मेघनाचा आहे,’’ माथूरचा असिस्टंट म्हणाला.
‘‘माय गॉड, म्हणजे चूक खरंच आपलीच होती. जा लवकर आणि तिला घेऊन ये’’ माथूरने त्याला तसाच बाहेर पाठवला.
दहा मिनिटांनी मेघनाला समोर पाहून ती काही बोलायची वाटही न पाहता माथूरने तिला पकडून पीसीसमोर उभं केलं. ‘‘मेघना हे काय आहे? तू इतका मोठा फ्रॉड केलास? हे बघ काय आहे, हा जो पत्ता बदलला आहे ना हे सारं तुझ्या आयडी व पासवर्डने केले गेले आहे.’’
‘‘नाही सर, मी काहीच केलेले नाही. अगदी खरं सांगते आहे मला काहीच माहिती नाहीये यातल.’’ मेघना घाबरून जात म्हणाली.
ती कबूल करत नाही हे बघून माथूरने पोलिसांना फोन केला.
कंपनीत पोलिस आल्याने घाबरलेल्या राधाने रवीला फोन केला.
‘‘राधा घाबरू नकोस. तुला काही विचारलं तर सरळ नाही म्हण. काहीच कबूल करू नकोस. चल नंतर बोलू-आता नको.’’ त्याने घाईने फोन कट केला
‘‘मेघना खरं काय इथेच बोल अन्यथा पोलिस त्यांच्या पद्धतीने तुला बोलतं करतील,’’ माथूरने एक प्रयत्न करून बघितला.
‘‘पण सर मी काही केलेच नाही तर काय कबूल करू? आणि कबूल करायला मला काही माहीत तर असायला हवं ना?’’ मेघनाला आता रडायला येऊ लागलं. अचानक मेघनाला आठवलं की, आपण एकदा आपला मेल आयडी आणि पासवर्ड राधाशी शेयर केला होता. ‘‘माथूर सर, हे सगळं कोणत्या दिवशी झालं हे समजेल का? प्लिज!’’
‘‘१० जुलै दुपारी १२.३०ला ही मेल गेली आहे,’’ माथूर.
‘‘सर १० जुलैला तर मी तुमच्याबरोबर मीटिंगमध्ये होते!’’ मेघना कातर स्वरात म्हणाली.
‘‘ओ यस! हे खरं आहे. म्हणजे याचा अर्थ तुझा पीसी कुणीतरी वापरला. माय गॉड, कोणाला सांगितला होतास पासवर्ड?’’
‘‘सर, त्या दिवशी राधाला अर्जंट मेल टाकायच्या होत्या आणि तिच्या मशीनचे सर्वर डाऊन होते म्हणून तिने माझा पीसी वापरला.’’
खरा गुन्हेगार अचानक पुढे आला अन् माथूर पोलिसांना घेऊन सरळ राधाच्या टेबलवर गेले.
‘‘राधा आम्हाला सारं समजलं आहे. कंपनीशी विश्‍वासघात?’’ ‘‘इन्स्पेक्टर साहेब हिला ताब्यात घ्या. ही खरी गुन्हेगार आहे,’’ माथूर तडकून म्हणाले.
राधा आधीच घाबरलेली होती. तिने लगेच गुन्हा कबूल केला. पोलिसांनी राधाकडून गुन्ह्याची सारी माहिती काढून घेतली. रवीला पकडायला पोलिस गेले तेव्हा तो पैसे घेऊन परांगदा झाला होता. रवीकडून फसवल्या गेल्यावर राधा आनंदशी नजर मिळवू शकली नाही. दोन आरोपीतला एक पळून गेल्याने राधाला जमानत मिळाली नाही. मैत्री निभवण्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली तिला.
पूर्वीच्या काळी बँकेचे खाते बरेच महिने जर वापरले नाही तर बँकेकडून नोटीस पाठवली जायची, पण आता सायबर युगात बँकेचे हायटेक बँकिंग, पर्सनल बँकिंग, नेट बँकिंंग असे वेगवेगळे भाग झाले, त्यामुळे वेळ वाचवायला, बँकेचे कस्टमर वाढवायला प्रत्येक विभागाचा वेगळा मॅनेजर आला. त्यात कहर म्हणजे कस्टमर केअरचे नंबर आले. त्यावर फोन केला की, प्रत्येक वेळी वेगवेगळे कर्मचारी बोलतात. आता यंत्राचं युग आलं. यंत्राने कितीही प्रगती केली तरी यंत्र वापरणार्‍या माणसाची प्रवृत्ती जोवर बदलत नाही तोवर यंत्रही चुका करणारच. म्हणूनच ई-बँक प्रणालीच्या ‘चमक धमक’मधील फसवणुकीपेक्षा बँकेची जुनी पद्धतच चांगली होती का? असा विचार करायची वेळ आली आहे. सोनाली करमरकर/९५०३७७५०५७