साप्ताहिक राशिभविष्य

0
637

रविवार, १५ ते २१ जानेवारी २०१७

सप्ताह विशेष
• सोमवार, १६ जानेवारी : भय्याजी महाराज जन्मदिन, ताज आनंदाश्रम -सावंगी (वर्धा), •मंगळवार, १७ जानेवारी : धुंडामहाराज देगलूरकर पुण्यतिथी – पंढरपूर, •बुधवार, १८ जानेवारी : भद्रा १२.४६ ते २५.४०, •गुरुवार, १९ जानेवारी : कालाष्टमी, कुंभायन (२६.५०), स्वामी विवेकानंद जयंती (तिथीनुसार), श्री आत्मानंद सरस्वती रामचंद्र महाराज पुण्यतिथी-नागपूर, •शुक्रवार, २० जानेवारी : मंगळाचा मीन राशीत प्रवेश (१३.४५), गुळवणी महाराज पुण्यतिथी -पुणे, शिवदास महाराज पुण्यतिथी -लिहा -मोताळा (बुलडाणा), •शनिवार, २१ जानेवारी : संत ताजुद्दीन बाबा जन्मोत्सव-वाकी (नागपूर), भारतीय माघ मासारंभ

मेष : स्वभावातील ताठरपणा टाळा
आपला राशीस्वामी मंगळ लाभस्थानात शुक्र व केतूसोबत आहे. दशमात रवि आलेला आहे. गुरूची शुभ दृष्टी लाभलेली आहे. चंद्र या आठवड्यात पंचम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर अष्टम स्थानात जाईल. मंगळ-केतूच्या योगामुळे स्वभावात काहीसा ताठरपणा निर्माण होऊ शकतो. तीव्र व तिखट शब्दांचा वापर टाळायचा प्रयत्न करावयास हवा. कोणाचेही मन दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. व्यवसायात, भागीदारीत कोणाशीही वितुष्ट येऊ देऊ नये. खर्चवाढ होण्याची शक्यताही राहील. खिशावर नियंत्रण ठेवावयास हवे. दशमातील रवि नोकरी-व्यवसायासाठी युवावर्गाला चांगली संधी उपलब्ध करून देऊ शकेल. शुभ दिनांक- १५, १६, २०.
वृषभ : युवावर्गास भाग्यकारक योग
आपला राशीस्वामी शुक्र दशम स्थानात केतू व मंगळासोबत आहे. राश्यांतरानंतर रवि भाग्यस्थानात आलेला आहे. गुरूची भाग्य, लाभ व राशीस्थानावर शुभ दृष्टी आहे. चंद्र या आठवड्यात सुख स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर सप्तम स्थानात जाईल. युवावर्गास नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने भाग्यकारक योग लाभू शकतात. नोकरीतील नव्या संधी, जबाबदारी वाढण्याबरोबरच काहींना स्थानांतरण करावे लागू शकते. बदलीमुळे घरापासून दूर जाण्याचेही योग येऊ शकतात. व्यवसाय-विस्ताराच्या काही योजनादेखील आकारास येऊ शकतात. विवाहेच्छुक युवावर्गास विवाह जमणे किंवा विवाह होण्याच्या दृष्टीने वेगवान हालचाली घडू शकतील.
शुभ दिनांक-१७, १८, १९.
मिथून : प्रकृतीची काळजी घ्या
आपला राशीस्वामी बुध सप्तमस्थानात आहे. बुध मार्गी झालेला आहे. नुकताच रवि अष्टमात आलेला आहे. शुक्र व मंगळ भाग्यात आहेत. चंद्र या आठवड्यात पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर षष्ठ स्थानात जाईल. अष्टमातील रवि प्रकृतीची काळजी घेण्यास सुचवीत आहे. काहींना एखाद्या छोट्या-मोठ्या अपघातास, शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागण्याचेदेखील भय निर्माण होत आहे. त्यामुळे सतर्कता आवश्यक आहे. दरम्यान, घरातील मुला-मुलींच्या शिक्षणातील प्रगतीच्या बातम्या आनंद देतील. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. नोकरीत पदोन्नती व्हावी. त्यासोबत आर्थिक लाभ, अधिकारात वाढ होऊ शकेल. कार्यक्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटेल. शुभ दिनांक- १५, २०, २१.
कर्क : अनपेक्षित घटना संभव
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी धन स्थानात आहे व आठवडाअखेर तो पंचम स्थानात येईल. सुखस्थानात शनि व अष्टमात मंगळ असून, सप्तमात रवि आलेला आहे. धनावरील शनि-मंगळाच्या दृष्टीमुळे या आठवड्यात काहीसा आर्थिक पेच निर्माण होऊ शकतो. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडू शकतात. काहींना नोकरीत बदल करण्याचा निर्णयदेखील घ्यावा लागू शकतो. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. भागीदाराशी मतभेद निर्माण होऊन त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शांत राहून, काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असल्याचे वाटत असले तरी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळावयास हवे. शुभ दिनांक- १५, १७, १८.
सिंह : गुंतवणुकीस उत्तम वेळ
आपला राशीस्वामी रवि षष्ठात आलेला असून राशीस्थानी राहू आहे. सप्तमात मंगळ व शुक्र आहेत. धनस्थानात गुरू आहे. चंद्र सुरुवातीला आपल्या राशीतच असून, तो आठवडाअखेर चतुर्थ स्थानात येईल.
व्यवसायामध्ये नवी गुंतवणूक करण्याची योजना असेल तर आठवड्याच्या सुरुवातीस निर्णय घेता येऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या काही संधी लाभू शकतील. त्यांचा वेळीच लाभ घ्या. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या घडामोडी संभवतात. आर्थिक लाभ होईल. आवक वाढेल. जुनी येणी मिळू शकतील. आपल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. त्याचा फायदा पुढे मिळेल.
शुभ दिनांक- १५, १६, २०.
कन्या : कुटुंबात आनंद, समाधान
आपला राशीस्वामी बुध या आठवड्यातही सुखस्थानात आहे. आतापर्यंत त्याच्यासोबत असलेला रवि पंचमात गेला आहे, तर राशीस्थानात गुरू आहे. चंद्र व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत असून, आठवडाअखेर तो पराक्रम स्थानात जाईल. कन्या राशीच्या मंडळींना गुरूचा सर्वात मोठा लाभ विवाह, वैवाहिक सुख, संतती या दृष्टीने होण्याची शक्यता अधिक आहे. या राशीच्या विवाहेच्छुक मुला-मुलींना मनासारखा जोडीदार लाभून गृहस्थ जीवनाचा शुभारंभ करता येईल. त्याचप्रमाणे संततीची अभिलाषा बाळगणार्‍या नवपरिणितांना इच्छापूर्तीचे योग लाभतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबात उत्साह, पाहुण्यांची वर्दळ, आनंदाचे व समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- १७, १८, १९
तूळ : कार्यक्षेत्रात उत्तम संधी
आपला राशीस्वामी शुक्र मंगळासोबत पंचम स्थानात आहे. धनस्थानात शनि व व्ययस्थानात गुरू आहे. चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानात असून, तो आठवडाअखेर धन स्थानात येईल. चतुर्थात आलेल्या रविची दशम स्थानावर दृष्टी येणार असून, त्यायोगे युवावर्गाला नोकरी व व्यवसायात उत्तम संधी उपलब्ध होतील. नोकरीत बदल, पगारवाढ, पदोन्नतीच्या प्रयत्नात असलेल्यांनादेखील यश मिळू शकेल. तरुण वर्गाला विवाह व संततीचे उत्तम योग लाभावेत. गुरूची दृष्टी पाहता घरात मंगलमय वातावरण राहावयास हवे. एखादी मोठी खरेदी संभवते. प्रवासाच्या योजना आखल्या जाऊ शकतात. कलावंत व साहित्यिकांना प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक- १५, २०, २१.
वृश्‍चिक : कामे यशस्वी होणार
आपला राशीस्वामी मंगळ शुक्रासोबत सुखस्थानात, तर राशीस्थानी शनि आहे. पराक्रमात रवि आलेला आहे. शनि- मंगळाचा परिवर्तन योग कायम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला दशम स्थानात असून, तो आठवडाअखेर आपल्याच राशीत येणार आहे. भाग्यस्थानावर येणारी रविची दृष्टी काही भाग्यकारक संधी उपलब्ध करून देणारी ठरू शकते. ती आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती व आर्थिक लाभ दर्शविणारी आहे. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी लाभतील. काही मोठी कामे यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे आनंद व उत्साह अनुभवाल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना काही चांगल्या संधी लाभतील. काहींना त्यांच्या मुलांच्या अनुषंगाने उत्तम योग लाभू शकतात.
शुभ दिनांक- १७, १८, २१.
धनू : शुभवार्ता कानी पडतील
आपला राशीस्वामी गुरू दशमस्थानात असून आतापर्यंत आपल्या राशीत असलेला रवि धनस्थानात गेला आहे. बुध राशीत कायम आहे. भाग्य स्थानातून चंद्राचे भ्रमण सुरू होत असून, तो आठवडाअखेर व्यय स्थानात येणार आहे. मुलांकडून शुभवार्ता कानी पडतील. मुलांचा उत्कर्ष, शिक्षण, नोकरीतील त्यांची प्रगती, मुलांचे विवाहादी योग कुटुंबात आनंद निर्माण करू शकतात. साहित्यिक, कलावंत, पत्रकार मंडळींना त्यांच्या कामाचे समाजाकडून कौतुक होताना दिसेल. त्याची योग्य दखल घेतली जाऊन पुरस्कार, सन्मान, आर्थिक लाभ मिळू शकतो. काही मान्यवरांसोबत संपर्क येऊन त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील. हे संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा. शुभ दिनांक- १५, १६, २१.
मकर : आर्थिक व्यवहारात सतर्क
आपला राशीस्वामी शनि लाभस्थानी असून धनस्थानात योगकारक शुक्र व भाग्यात गुरू आहे. रवि आपल्या राशीत आलेला आहे. चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर लाभ स्थानात जाणार आहे. राशीत आलेला रवि कामाचे व वेळेचे सुयोग्य नियोजन करणे फायद्याचे ठरेल, असे सुचवीत आहे. सकारात्मक भूमिकेतून व वक्तशीरपणे केलेल्या कामांमुळे अचानक उद्‌भवणार्‍या अडचणींचा प्रभाव फारसा जाणवत नाही, हे सूत्र लक्षात ठेवावयास हवे. गुरूची शुभ दृष्टी आपल्या प्रयत्नांना बळ देईल व सतत आपली बाजू उंच ठेवण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगावयास हवी. डोके शांत ठेवून सार्‍या योजना मार्गी लावाव्या.
शुभ दिनांक- १७, १८, १९.
कुंभ : महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी उमेद
आपला राशीस्वामी शनि दशमस्थानात असून राशीत मंगळ, शुक्र व केतू आहेत. गुरू अष्टमात आहे. रवि नुकताच व्ययस्थानात आला आहे. चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर दशम स्थानी जाईल. राशीस्थानी असलेले मंगळ व योगकारक शुक्र काही अचानक शुभ योग देऊन नव्या योजना, व्यवसाय विस्ताराच्या प्रयत्नांना बळकटी देऊ शकतात. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवी उमेद देऊ शकतील. नव्या ओळखी, मित्रांचे सहकार्य या दृष्टीने विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. राशीत असणारा शुक्र काही तरुण-तरुणींना विवाह योग देऊ शकतो. कुटुंबात सलोख्याचे, आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. शुभ दिनांक- १५, १६, २०.
मीन : सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग
राशीस्वामी गुरू सप्तमस्थानात असून व्ययात मंगळ-शुक्र-केतू आहेत. आतापर्यंत दशमात असलेला रवि व्ययात आलेला आहे. चंद्र आपल्या षष्ठ स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर भाग्य स्थानात जाणार आहे. व्ययातील रवि घरात व कार्यक्षेत्राच्या ठिकाणी काही अशांतता, नाराजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. पती-पत्नीतही काही काळ असमाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. सप्तमातील गुरू या राशीच्या तरुण वर्गासाठी विवाहाच्या उत्तम संधी निर्माण करू शकतो. अनेक विवाहेच्छुकांना हे योग लाभून जीवनाचा उत्तम साथीदार लाभू शकेल. काही लोकांना सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविता येईल. शुभ दिनांक- १६, १७, १८.

मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६