कलेतील प्रतिमात्मक चिंतन

0
160

कलेतील प्रतिमा विचार व कळवळा तसेच ती विवेक व भावना यांचा सुरेख मेळ असते. यातील एक जरी घटक निसटला तरी कलात्मक विचार नाहीसा होतो. ऐतिहासिकदृष्ट्या भाव-भावना हा घटक सर्वात जुना घटक आहे. त्याचप्रमाणे भावना हा घटक संवेदनेच्या पातळीवर आणि सौंदर्याच्या पातळीवर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्राचीन भारतीयांचा विश्‍वास होता की, जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल खूप कळवळा वाटायला लागतो तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते आणि कलेचा जन्म होतो. ‘रामायण’ या ग्रंथाचा रचयिता वाल्मीकि यांच्याबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, वाल्मीकि एकदा जंगलात फिरत असताना त्याला अचानक गवतावर दोन पाणवाला पक्षी एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याने बोलत आहेत असे दिसले. अचानक तिथे एक शिकारी आला आणि त्याने त्यापैकी एका पक्ष्याला आपल्या बाणाने ठार मारले. वाल्मीकिला दु:ख सहन नाही झाले. त्याच भावनिक अवस्थेत त्याने त्या शिकार्‍याला शापवाणी दिली. या शापवाणीचे स्वरूप एकाच यमकाच्या दोन लागोपाठ ओळींच्या स्वरूपाचे होते. या छंदाला पुढे ‘श्‍लोक’ असे म्हणण्यात आले. नंतर ब्रह्मानेदेखील या श्‍लोक स्वरूपनिर्मितीत आनंद लुटला. वाल्मीकिने श्‍लोकबद्ध रचनेतून ‘रामायण’ हा ग्रंथ लिहिला. या आख्यायिकेमुळे हे मानण्यात आले की, काव्याचा जन्म अशाच स्फोटक व भावनिक भाषणातून होतो.
अमर अशी कलाकृती निर्माण करायची असेल तर कलाकाराने केवळ जीवन-पटल दाखवून चालत नाही, तर त्यात भावनिक व आदर्श अशा वैचारिक दृष्टीनेही जीवनातील घटनांकडे बघितले पाहिजे. त्याच्या कला सादरीकरणात भावनिक व वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे. जगाबद्दल आपल्याला एक कलावंत म्हणून जे वाटते त्याला प्रक्रियेत आणण्यासाठी हे आवश्यक असते. मात्र, या भावना तीव्र नसतील तर उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकत नाही.
कलेतील प्रतिमा वस्तुनिष्ठता व व्यक्तिनिष्ठतेला नेहमी जोडण्याचा प्रयत्न करते. जीवनातील अत्यावश्यक पैलूंचे ती परावर्तन करते. त्यात वस्तुनिष्ठ आशय भरपूर प्रमाणात असतो. कलेतील प्रतिमांनी जीवनातील वास्तवाचे स्थान घ्यावे, असेही कलेतून अपेक्षित नसते. कला धर्मापासून इथेच वेगळी ठरते. कलेतून अभिव्यक्त झालेल्या प्रतिमा कलावंताच्या सृजनशील प्रतिभेचे दर्शन-रूप असते. त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्याच्या भावविश्‍व व जीवनानुभावाचेही दर्शन त्यातून घडते.
संगीतकला व नाट्यकला यासारख्या प्रायोगिक कलांमध्ये कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका स्पष्ट व उघड आहे. प्रत्येक नट स्वतंत्रपणे भूमिकेचे विश्‍लेषण करतो. तिचे अर्थघटक करतो. भूमिकेच्या विविध पैलूंवर स्वत: विचार करतो. एकोणविसाव्या शतकात टोमासो सल्विनीने ऑथेल्लो या पात्राचे अर्थघटन स्वच्छंदपणाचे केले. त्याने ऑथेल्लोचे चित्रण अगदी भोळसट, श्रद्धाळू असे केले. अलेक्झांडर ओस्टझेव्ह या रशियन नटाने ऑथेल्लोच्या विश्‍वनीयता या स्वभावगुणाचे दर्शन घडवले. सर लॉरेन्स ऑलिव्हिए याने अन्टीरोमॅन्टिक असा ऑथेल्लो उभा केला, ज्याला युरोपियन सभ्यतेची अजीबात जाणीव नाही. त्याने दयाळू व आकर्षक असा ऑथेल्लो सादर केला. महत्त्वाचा मुद्दा असा की, प्रत्येक नटाने जो ऑथेल्लो उभा केला, तो त्याच्या स्वत:च्या जीवनाच्या अनुभवाच्या आणि स्वत:च्या सृजनशीलतेनुसार रंगवला. प्रत्येक नट असेच करत असतो.
विज्ञानातसुद्धा शोध करणारा व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आहे की, तो अगदीच सामान्य बुद्धीचा आहे हे महत्त्वाचे नसते. विज्ञानात वैयक्तिक गुणांचा प्रभाव शोधप्रक्रियेवर होत नाही. त्याच्या एकूणच शोधकार्यावर होत नाही. ‘लॉ ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जी’चा सिद्धांत लोमोनोसॉव्हने प्रथम मांडला की, लॅव्होसिएने प्रथम मांडला यावर विज्ञानात वाद होत नाही.
विज्ञानात महत्त्वाचे निदान हे असते की, त्या शोधकार्याचे किंवा त्या सिद्धांताचे सूत्र सारखेच आहे. त्यामुळे विज्ञानात वस्तुनिष्ठतेला सर्वात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. इथे कला व विज्ञानात अंतर आहे. अशी कल्पना करा की, गोगोल या नाटककाराचे ‘इ इन्स्पेक्टर जनरल’ हे नाटक पुश्किन या कवीने लिहिले. नाटकाचा विषय व कथावस्तू कदाचित सारखीच राहिली असती, मात्र प्रत्यक्ष कृती व प्रतिमांची व्यवस्था यावर पुश्किनचा कवी म्हणून वेगळा प्रभाव पडला असता. प्रतिमांच्या व्यवस्थेवर लेखकाचा प्रभाव पडत असतो. त्यामूळे जितके प्रभावी व्यक्तिमत्त्व असले तेवढी प्रभावी कलाकृती बनेल.
श्रेष्ठ कलाकृती उच्च अभिरुची असलेल्यांनाही समाधान देते आणि ती आम जनतेलाही प्रभावित करते. मात्र, याच्या उलटही होण्याची शक्यता असते. एखादी कलाकृती सामान्य जनतेत लोकप्रिय होते. तिच्यातील आशय अगदीच सामान्य असला तरीही असे घडते. ज्यात आशयसंपन्नता आहे, अशा कलाकृतींची समीक्षा करताना अनेकदा समीक्षकांनी केवळ या मुद्यावर टीका केली आहे की, ती कलाकृती ‘जनमानस’ला समजत नाही; परंतु असे असले तरी कलाकार व प्रेक्षक यांचा ऐतिहासिक दृष्टीने विचार केल्यास असे आढळते की, श्रेष्ठ कलाकृती प्रेक्षकांना आवडली नाही असे क्वचितच घडते. वास्तव प्रतिमा नेहमीच वस्तुनिष्ठता व व्यक्तिनिष्ठता यांचा ‘तोल’ सांभाळते. कलावंताच्या कल्पना, कळकळीची भावना आणि त्याच्या आदर्शाच्या कल्पना यामुळे कलाकृतीत जिवंतपणा येतो.
प्रतिमेचे अनुकरण शक्य आहे. मात्र, तिचा ‘एकमेवपणा’ अबाधित असतो. एकच विषय असला, एकच कथा असली तरी तिचे सादरीकरण वेगळे असते. कारण कलाकाराची व्यक्तिनिष्ठ सृजनशीलता वेगवेगळी असते. विज्ञानात एकाच गोष्टीचा शोध पुन्हा पुन्हा होऊ शकतो. एकाच निष्कर्षावर दोन वैज्ञानिक आणि तेही वेगवेगळ्या काळात पोहोचू शकतात. मात्र कलेच्या इतिहासात असे कधीच घडले नाही की, दोन वेगळ्या कलावंतांनी एकच कलाकृती निर्माण केली. त्यामुळे कलेतील प्रतिमा एकमेवाद्वितीय असते.

डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२