क्रांती-योगी (भाग-१)

0
196

खरे तर देशोपयोगी माणसांची चरित्रे विस्मृतीत जाणे हे योग्य नसते. पुढच्या पिढ्यांना त्यांचे आदर्श द्यायचे असतात, पण आपल्या समाजाला विस्मृतीचा रोग जडला आहे आणि सरकारी पातळीवर तो दूर करावा यासाठी कोणतीही उपाययोजना नाही.
आयुर्वेदाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांचे नाव माहिती नाही असा वैद्य सापडणे कठीण आहे. त्यांनी निर्माण केलेल्या काढ्यांचा आजसुद्धा अभ्यास केला जातो आहे, ही समाधानाची बाब आहे. एकाच वेळी वकील आणि डॉक्टर होण्याचा चमत्कार त्यांनी करून दाखवला होता. खरे तर बी.ए. झाल्यानंतर ते मुंबईला वकिलीचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांचे एक मित्र ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. सहज म्हणून ते तिकडे गेले. त्या काळी मेडिकल कॉलेजमध्ये पारशी मंडळींचे प्राबल्य खूप होते. तात्या मंडळींना डॉक्टर होणे जमणार नाही, अशी त्यांची धारणा असे. प्रिन्सिपॉल डॉ. हंटर यांनी, हे कशासाठी आले आहेत, असे विचारताच मित्राने, प्रवेशासाठी, असे ठोकून दिले. लगेच प्रवेश मिळाला. त्या दिवसापासून सकाळ-दुपार मेडिकल आणि सायंकाळी लॉ कॉलेज असा दिनक्रम सुरू झाला. दिवसरात्र अभ्यासात जाऊ लागली. याच काळात इरेला पेटून सीरपीं ाशवळलरश्र लेश्रश्रशसश र्क्षेीीपरश्र चा पहिला अंक त्यांनी स्वत: लिहून काढला. पुढचे अंक खूप गाजले, विदेशात जाऊ लागले. तेथील प्रकाशित होणारे औषधशास्त्रावरील ग्रंथ परीक्षणासाठी येऊ लागले. लवकरच त्या शास्त्राची मर्यादा लक्षात येऊन अण्णासाहेबांनी आर्य वैद्यक अर्थात आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला. इतकेच नव्हे, तर आयुर्वेदाची माहिती देणारे वैद्यसुधा हे मासिक आपल्या कॉलेजमध्ये चालू केले. पुढे केवळ वरिष्ठांच्या नाराजीमुळे त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करूनही वैद्यकशास्त्रातील पदवी मिळाली नाही. वकिलीची सनद मिळताच निर्वाहासाठी वकिली आणि लोकोपयोगासाठी वैद्यकी असे त्यांनी सुरू केले. वैद्यकीतून त्यांनी एकही पैसा घेतला नाही. कोणी ठेवून गेले तर त्याच्या घरी पैसे पोहोचते केले जात असत. अगदी फळ वा मिठाईदेखील ते घेत नसत. त्यांच्या वैद्यकीचे एकेक किस्से मात्र अफलातून आहेत. अत्यंत किचकट रोगातून त्यांनी लोकांना बरे केले. त्यांची नाडीपरीक्षा उत्तम होती. कित्येकदा रोग्याला काय झाले आहे हे न विचारता, तेच सांगायचे. तितकीच दृष्टिपरीक्षा चांगली होती. अनेकदा रोग्याच्या तोंडाकडे पाहून ते रोग ताडायचे. दर गुरुवार आणि रविवारी त्यांच्याकडे खूप गर्दी होत असे.
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणम्‌|
विरक्तस्य तृणं भार्या निःस्पृहस्य तृणं जगत्‌॥
(उदार मनुष्यासाठी धन, शूरासाठी मृत्यू, विरक्तासाठी पत्नी आणि निःस्पृह व्यक्तीसाठी संपूर्ण जग हे तृणासमान असते.)
अण्णासाहेब अर्थात विनायक रामचंद्र पटवर्धन यांचा जन्म ४ मे १८४७ ला पुण्यात झाला. घरची श्रीमंती अफाट होती. वडील आणि आई हे दोघे अत्यंत करारी होते. आई जानकीबाई खूपच कर्तबगार आणि अत्यंत भाविक स्त्री होती. आज पुण्यात शनिवारवाड्यामागे असलेला वाडा जानकीबाईंनी बांधून घेतला आणि मग पतीला सांगितले. त्या वाड्यावर आता पुणे महानगरपालिकेने लावलेला अण्णासाहेबांच्या नावाचा नीलफलक आहे. आई गणेशभक्त होती. त्याच्या कृपेने हा पुत्र झाला, या भावनेमुळे नाव विनायक ठेवले. लहानपणापासून विलक्षण हूड पण तल्लख बुद्धीचे असलेले अण्णासाहेब १८६४ मध्ये मॅट्रिक झाले. त्या काळात ते पुण्यातील एक सरदार घराण्यातील अधिकारी व्यक्ती असलेल्या चिंतो विठ्ठल ऊर्फ तात्यासाहेब रायरीकर यांच्या सहवासात आले. डेक्कन कॉलेजमधून १८६८ मध्ये ते बी.ए. झाले. त्या काळात देशोद्धाराचा प्रश्‍न सोडवण्याचा खटाटोप करणारे चार प्रकारचे लोक होते. तपस्या करून ते साधता येईल, असा विश्‍वास असलेले तात्यासाहेब रायरीकरांसारखे पहिल्या प्रकारात येत. प्रसंगी इंग्रजांशी लढून स्वराज्य मिळवता येईल, असे वाटणारे दुसर्‍या प्रकारातील, वासुदेव बळवंत फडकेंसारखे होते. इंग्रजांच्या संस्कृतीप्रमाणे आपली भौतिक संस्कृती वाढविण्यासाठी, तिसर्‍या प्रकारातील लोक समाजसुधारणा, धार्मिक सुधारणा आदींच्या मागे लागलेले होते. त्यांना आपली संस्कृती सध्याच्या काळात निरुपयोगी वाटत होती. चवथ्या प्रकारातील लोकांचा स्वाभिमान जबर होता. त्यांना आपली संस्कृती हीन वाटत नसे. त्यांनी आर्थिक चळवळी, बहिष्कार, स्वदेशी अशा नाना प्रकारच्या गोष्टींवर जोर दिला होता. त्यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक सभा उभी राहिली. त्यात अण्णासाहेब प्रामुख्याने कार्य करीत होते. त्यांनी पुढे डेक्कनस्टार आणि किरण अशी दोन इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे काढली होती. कालांतराने त्यातूनच मराठा आणि केसरीचे निर्माण झाले. लोकमान्य अण्णासाहेबांना खूप मानत असत. मंडालेहून सुटून येताच देवदर्शन करून ते अण्णासाहेबांना भेटायला आले होते.
मुंबईत ते शेट मुरारजी गोकुळदास यांच्या चाळीचा संपूर्ण तिसरा मजला भाड्याने घेऊन राहात होते. राहाणीमान अत्यंत थाटाचे असले, तरी कधीही कोणत्या आमिषाला अथवा व्यसनाला ते बळी पडले नाहीत. पान-तंबाखूचे व्यसन होते, पण एकदा अनवधानाने बाहेर टाकलेली पिंक आपल्या प्राध्यापकाच्या अंगावर पडली, हे पाहताच त्या क्षणाला त्यांनी ते व्यसन सोडले आणि पुढे आयुष्यात कधीही सुपारीदेखील खाल्ली नाही.
मुंबईत अभ्यासासोबत इंग्रजी राजकारणाचा बारकाईने अभ्यास सुरू होता. सत्ताधार्‍यांना टक्कर देण्यासाठी एखादी सत्ताच जवळ हवी, हे ओळखून त्यांनी संस्थानिकांशी संधान साधणे सुरू केले. यात हैदराबाद, बडोदा आणि इंदूर यासारख्या मोठ्या संस्थानांपासून लीमडी, वढवाण यासारख्या लहान संस्थानांचादेखील समावेश होता. एखादा स्वतंत्र प्रांत आपल्याला निर्माण करता आला, तर अधिक उत्तम होईल या कल्पनेने ते झपाटले होते. तुकोजी होळकरांनी त्यांची भेट घेतली, बडोदा प्रांतात त्यांना दिवाणगिरीची संधी चालून आली होती आणि सालारजंगाचे प्रकरण तर खूप महत्त्वाचे होते. याशिवाय विविध देशातील कौन्सिलांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा करणे हे सर्व चालूच होते. विशेष म्हणजे वकिली आणि डॉक्टरी हे दोन अभ्यासक्रम सांभाळत ही कसरत चालू होती.
त्यात हैदराबादच्या प्रकरणाने एक वेगळी रंगत आणली आणि त्यानंतर अण्णासाहेबांची आयुष्यदिशा पार बदलली, पण ते पुढच्या भागात…!!

डॉ. सच्चिदानंद शेवडे