शोध रशियाचा आणि क्रेमलिनचा

0
2948

‘क्रेमलिनॉलॉजी’ असा इंग्रजीत शब्द आहे. ‘इंडॉलॉजी’ म्हणजे भारतविद्या म्हणजे भारताविषयीचा अभ्यास, संशोधन; ‘इजिप्तॉलॉजी’ म्हणजे इजिप्तबद्दलचा अभ्यास; तसं क्रेमलिनॉलॉजी म्हणजे रशिया विषयक अभ्यास. क्रेमलिन ही वास्तू आणि रशिया हे अशा रीतीने जणू एकजीव झाले आहेत.
वास्तविक क्रेमलिन म्हणजे तटबंदी बुरुजबंदी केलेली गढी. ती खरं तर प्रत्येक मोठ्या गावात, शहरात असायची. त्या गावाचा-शहराचा कारभार पाहणारे जे कुणी असतील, ते तिथे राहायचे आणि तिथूनच राज्याची कामं चालवायचे. पण काळाच्या ओघात इतर गावा-शहरांमधल्या गढ्या इतिहासजमा झाल्या. शहर मॉस्कोमधली गढी-क्रेमलिन, ही मात्र साधी गढी न राहाता एक बुलंद किल्लाच बनली; भौतिक, व्यावहारिक, लाक्षणिक, सर्वच अर्थांनी.
रशियन झार इव्हान-द-टेरिबल ही रशियाच्या इतिहासातली एक विलक्षण व्यक्ती होऊन गेली. सन १५३० ते १५८४ हा त्याचा कालखंड आहे. तो सतत नवनवीन प्रदेश जिंकत आणि जिंकतच गेला. त्याच्या शासनकाळातच रशिया हा एक प्रचंड विस्ताराचा आणि अफाट सामर्थ्यांचा देश बनला. इव्हान मॉस्कोतल्या क्रेमलिनमध्येच राहात असे. साहजिकच क्रेमलिन ही रशियन साम्राज्याची ओळख बनली. मधल्या कालखंडात नंतरच्या झार मंडळींनी रशियाची राजधानी मॉस्कोहून पेट्रोग्राड ऊर्फ सेंट पीटर्सबर्गला हलवली होती. का? तर मॉस्को हे समुद्रापासून खूप दूर आहे नि सेंट पीटर्सबर्ग हे बाल्टिक समुद्रावरचं एक उत्तम बंदर आहे.
पण १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर, राज्यकर्त्या साम्यवादी नेत्यांनी म्हणजे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर लेनिन याने राजधानी पुन्हा मॉस्कोत आणली. तेव्हापासून गेली १०० वर्षे रशियन महासत्तेचं ठाणं आहे, क्रेमलिन!
हिंदू वास्तुशास्त्र असं म्हणतं की, एखादी छोटी नदी जिथे मोठ्या नदीला मिळते त्या संगमावर किंवा एखाद्या नदीच्या वळणाच्या उत्तर तीरावर वास्तू उभारणं हे शुभफलदायी असतं. भारतातल्या असंख्य वास्तू या नियमाधारे उभारण्यात आलेल्या आहेत.
रशियन लोक हे स्लाव्ह वंशाचे आहेत. आधुनिक मानववंशशास्त्र आजच्या जगभरच्या मानवसमाजांची वेगवेगळ्या गटांत विभागणी करतं. त्यातला एक गट आहे ‘इंडो-युरोपीयन वांशिक गट.’ स्लाव्ह वंश हा इंडो-युरोपीयन गटातच मोडतो.
याचा अर्थ असा काढायला हरकत नाही की, गेली हजारो वर्षे भारतीय हिंदू लोक नवीन भूमी, नवीन संधी यांच्या शोधार्थ भारतातून बाहेर पडून जगभर जात आहेत. तसेच ते, आज रशिया या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात, गेले असावेत. कदाचित त्यामुळेच मॉस्कोची ही क्रेमलिन गढी, नेगलिन्नाया नावाची एक छोटी नदी मस्कवा या मोठ्या नदीला जिथे मिळते तिथे आणि शिवाय मस्कवा नदीच्या उत्तर वळणावर उभी आहे. कुणी नि केव्हा उभारली? फिनो-उगरिक नावाच्या लोकांनी इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात उभारली. पण स्लाव्ह लोकांनी अकराव्या शतकात ती चांगली मजबुतीने उभारली. तिथपासून आजपर्यंत म्हणजे गेली दहा शतकं एक हजार वर्षे क्रेमलिन सतत नांदती, गाजती, वाजती आहे.
या वास्तूने पाहिलेला गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास शौर्याचा आहेच, पण क्रौर्याचा जास्त आहे. इव्हान-द-टेरिबल नावाप्रमाणेच अत्यंत शूर आणि तितकाच क्रूर होता. दंतकथा या मोठ्या गमतीदार असतात. त्यांच्या अद्भुतपणात काहीतरी महत्त्वाचा बोध लपवलेला असतो. इव्हान-द-टेरिबलचा जन्म झाला त्यावेळी काही रशियन सरदार आणि एक तार्तार वंशाचा खान यांची भेट झाली. तार्तार हे रशियनांचे हाडवैरी. हा तार्तार खान भविष्यवेत्ता होता. तो म्हणाला, ‘तुमच्या राजाला एक मुलगा झालाय्. त्याला जन्मत:च दोन दात आहेत. एका दाताने तो आम्हाला खाणार नि दुसर्‍या दाताने तुम्हाला खाणार.’ हे भविष्य तंतोतंत खरं ठरलं. इव्हानने तार्तारांचा साफ उच्छेद करून त्यांना रशियाचं मांडलिक बनवलं. पण त्याने विरोध करणार्‍या स्वकीयांचीही सर्रास कत्तल केली.
अगदी हाच वारसा, साम्राज्यशाहीच्या विरोधात लोकांच्या राज्याची घोषणा देत राज्य बळकावलेल्या साम्यवाद्यांनी पुढे चालवला. १९१७ ते १९२४ या लेनिनच्या राजवटीच्या काळात किमान ५ लाख लोकांना ठार मारण्यात आलं. १९२४ साली स्टॅलिन सत्तेवर आला आणि त्याने माणसांचा खाटीकखानाच उघडला. दुसरं महायुद्ध संपल्यावर, १९४५ साली, पॉट्‌सडॅम इथल्या दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत, स्वकीयांच्या या कत्तलीचा विषय निघालेला असताना स्टॅलिनने चर्चिलला शांतपणे सांगितलं होतं की, आपल्या धोरणांना विरोध करतात म्हणून आपण किमान २ कोटी माणसं ठार मारली. स्टॅलिन पुढे ९ वर्षे म्हणजे १९५३ पर्यंत सत्तेवर होता. त्या काळात त्याने आणखी किती माणसं मारली? अजून नक्की आकडा बाहेर आलेला नाही. लेनिन, स्टॅलिन दोघेही मॉस्कोच्या क्रेमलिनमध्येच राहात होते.
लंडन शहरातली ‘टॉवर ऑफ लंडन’ ही एक इतिहासप्रसिद्ध वास्तू आहे. तिचाही इतिहास किमान ५०० ते ७०० वर्षांचा आहे. एकेकाळी तिथे राजवाडा होता. आज तिथे वस्तूसंग्रहालय आहे. अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टनमधलं व्हाईट हाऊस हे तसं फार जुनं नव्हे. कारण अमेरिका या स्वतंत्र राष्ट्राचाच इतिहास मुळी दोन-अडीचशे वर्षांइतका आहे. व्हाईट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान आणि कार्यालयसुद्धा आहे. तिथल्या ओव्हल ऑफिस नावाच्या प्रसिद्ध दालनातून अवाढव्य अमेरिकेचा कारभार चालतो आणि जगाच्या उठाठेवी चालतात, असंही म्हणायला हरकत नाही.
आता अशा राहात्या-जागत्या व्हाईट हाऊसमध्येही भुतं आहेत. तुम्हाला कदाचित धक्का बसेल; पण गुलामगिरीची लांच्छनास्पद पद्धत रद्द करणारा, त्यामुळे यादवी युद्ध ओढवून घेणारा, पण ते खंबीरपणे लढवून अमेरिकेची फाळणी टाळणारा महान राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याचं भूत व्हाईट हाऊसमध्ये वावरतं. मात्र, ते कुणाला त्रासबिस देत नाही.
टॉवर ऑफ लंडनमध्ये तर आत्महत्या केलेल्यांची, दगाबाजीने खून केलेल्यांची, अशी अनेक भुतं आहेत. टॉवर ऑफ लंडनमध्ये गुप्त तळघरं, भुयारं, चोरवाटा वगैरेही आहेत.
अगदी तोच प्रकार क्रेमलिनचाही आहे. ६८ एकर एवढ्या परिसरावर पसरलेल्या क्रेमलिनमध्ये भुयारं, तळघरं, चोरवाटा आणि भुतं सगळ्यांची अगदी रेलचेल आहे. वेगवेगळ्या झारांनी वेगवेगळ्या राज्यांमधून लुटलेली किंवा त्यांना नजराणे म्हणून आलेली अमाप संपत्ती म्हणजे सोनं, चांदी आणि रत्नं, मोती यांचे ढीग क्रेमलिनच्या गुप्त तळघरांमध्ये होते. शिवाय उत्तमोत्तम पेंटिंग्ज आणि अनमोल कलावस्तू सुद्धा अमाप होत्या. साम्यवाद्यांना हा सगळा खजिना फुकटात मिळाला.
आता भुतांचं म्हणायचं तर क्रेमलिनमधली तीन नामवंत भुतं म्हणजे इव्हान-द-टेरिबलचं भूत, लेनिनचं भूत आणि स्टॅलिनचं भूत. इव्हानचं भूत हे एखाद्या सावलीप्रमाणे वावरत असतं. स्टॅलिनचं भूत अवतीर्ण झाल्याची खूण म्हणजे, तो जिथे बसत असे ते कार्यालयाचं दालन एकाएकी गारढोण होतं. आणि लेनिनच्या भूताची तर मोठी कहाणीच आहे. २१ जानेवारी १९२४ या दिवशी लेनिन मरण पावला. म्हणजे निदान तसं जाहीर करण्यात आलं. पण १९२१ पासूनच त्याची प्रकृती ढासळू लागली होती. मे १९२२ मध्ये त्याला अर्धांगाचा झटका आला. त्यामुळे त्याला काठीशिवाय चालणं अशक्य झालं. मार्च १९२३ मध्ये त्याला पुन्हा अर्धांगाचा झटका आला. तेव्हा तो मॉस्कोपासून दूर गॉर्की शहरात विश्रांतीसाठी जाऊन राहिला.
आणि अचानक १९२३ च्या ऑक्टोबर महिन्यात, एक दिवस, अगदी दिवसाढवळ्या, स्वच्छ सूर्यप्रकाशात अनेक लोकांनी पाहिलं की, लेनिन क्रेमलिनच्या आवारात फिरतोय्. पूर्वीसारखाच जलद गतीने चालतोय्. चकित होऊन त्याच्याशी बोलायला पुढे सरसावलेल्या कुणाशीही तो काहीच बोलला नाही. आणि पाहाता पाहाता अचानक अदृश्य झाला. पाहणारे हादरलेच. पण ही बातमी साफ दाबून टाकण्यात आली. पुढे अडीच-तीन महिन्यांनी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं की, २१ जानेवारी १९२४ या दिवशी लेनिन मेला.
क्रेमलिनच्या तटावर, पीटर-द-ग्रेट या झारने बंडखोर बंदूकधारी सैनिकांची एक अख्खी पलटण कापून काढली होती. स्टॅलिन हाताखालच्या सामान्य नोकरांना बारीकशी चूक झाली तरी गोळी घालत असे. त्या पलटणीची, त्या नोकरांचीही भुतं मध्यान्ह रात्री क्रेमलिनच्या तटावर वावरतात, असं म्हणतात.
पाश्‍चिमात्य संशोधक-लेखक हे सतत अशा राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, अतींद्रिय, अमानवी गोष्टींचा मागोवा घेत असतात, त्यावर लिहीत असतात. आपल्याकडे तर अशा सगळ्याच गोष्टींचा अक्षरश: अमर्याद खजिना आहे. पण कुणी संशोधक त्याकडे वळतच नाही. चुकून वळलाच तर ते संशोधन पीएच्. डी. च्या प्रबंधापुरतंच असतं. एकदा पीएच्. डी. नि त्या पाठोपाठ कायम नोकरी किंवा पगारात इन्क्रिमेंट मिळालं की, सुखासीन आयुष्य सुरू होतं नि संशोधन-लेखन कायमचं बासनात जातं.

• मल्हार कृष्ण गोखले