रविवारची पत्रे

0
164

छत्रपतींचे स्मारक सिंधुसागरात का नाही?
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कथित रूपाने ओळख असलेल्या अरबी समुद्रात पुण्यश्‍लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य-दिव्य स्मारकाचा शिलान्यास केला. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. पण ज्या समुद्रास अरेबियन सी किंवा अरब सागर, अरबी समुद्र म्हणतो, त्या अरब शब्दाचे शल्य कमीतकमी शिवरायांचा वारसा सांगणार्‍यांना वाटू नये याचा खेद होतो. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज भाषाशुद्धीचे समर्थक होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळातील सुमंत, अमात्य आदी नावेही ठरविली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर तर भाषाशुद्धीचे कडवे क्रियाशील समर्थक होते. त्यांनी स्वभाषा, स्व-अस्मितेसाठी मराठीत कित्येक पर्यायी समर्पक शब्द सुचवले आहेत. ते आज रूढ झाले आहेत.
पन्नास वर्षांपूर्वी हिंदू महासभेने एक अखंड हिंदुस्थानचे मानचित्र प्रकाशित केले होते. त्यात सर्व प्रांत, श्रीलंकेसह सर्व दर्शवले होते. त्या मानचित्रात हिंद महासागर म्हणजेच इंडियन ओशनचा ‘हिंदुसागर’, अरबी समुद्राचा ‘सिंधुसागर’ आणि बंगालची खाडी, उपसागर किंवा बे ऑफ बेंगालचा ‘गंगासागर’ असा उल्लेख केला आहे. हिंदू महासभा पूर्वीपासूनच ‘अशा’ शुद्धीचा आग्रह करत आहे. म्हणूनच औरंगाबादचा खडकी, आता संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशीव, ईस्लामाबादचे ईश्‍वरपूर, बॉम्बेचे मुंबई असा उल्लेख करत असते आणि इतरांनी करावा अशी अपेक्षा आहे.
या उलट फाळणीनंतर पाकिस्तानात बाप्पा रावळने वसवलेले रावळपिंडी होते. तेथे त्यांनी इस्लामाबाद केले. पाकिस्तानात रावळपिंडीचे इस्लामाबाद होऊ शकते, तर हिंदुस्थानात हैद्राबादचे भाग्यनगर किंवा अरब सागराचे सिंधुसागर को होऊ नये? यावर केंद्र व राज्य सरकार, शिवसेना व भाजपाने विचार करावा. प्रखर राष्ट्रवादी बुद्धिवानांनी देखील सिंधुसागरचा आग्रह करावा, असे सुचवावेसे वाटते.
लक्ष्मणलाल खत्री
८८०६१२२६५५
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले,अब की बार, मोदी सरकार!
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने राज्यभरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. मावळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अजब प्रकार पाहायला मिळाला. चित्रा वाघ यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग कार्यकर्ते घोषणा देत होते. परंतु वाघ यांनी अब की बार, म्हणताच कार्यकर्ते मोदी सरकार… म्हणू लागल्याने एकच खळबळ उडाली. वास्तविक अब की बार फेकू सरकार अशी घोषणा द्यायची होती. परंतु उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र अब की बार मोदी सरकार अशी घोषणा दिली. हे पाहून चित्रा वाघ यांनी लगेच बाजू सांभाळत अब की बार फेकू सरकार असे म्हणत आवाज वाढवला व कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, झाल्या प्रकाराने मात्र राष्ट्रवादी नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. अनेक कार्यकर्ते तर एकमेकांकडे पाहून हसत होते. वर्तमानपत्रांतील या बातमीने वाचकांचीही खूप करमणूक झाली. राष्ट्रवादीच्या लोकांनी ज्या घोषणा दिल्या त्या अगदी बरोबरच होत्या, अशी प्रतिक्रिया वाचकवर्गातून उमटली.
हेमंत कद्रे
पुणे
अस्वल, माकड अन् डोंबारी
पावनी- आमची १० वर्षांची नात- डोंबारी म्हणजे काय, हे विचारत होती. मोठ्या शहरात ही जमात दृष्टीस पडणे दुरापास्तच असल्याने, कसेबसे समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिची बोळवण केली.
मन आपसूकच भूतकाळात तरंगत गेलं. ते माकड किंवा अस्वलाचे खेळ करणारे, साप-नेवल्याची लढाई करवणारे, अनेक जालीम व्याधींवर अक्सीर इलाज/दवा देणारे आणि रस्त्यावरच्या जादूच्या प्रयोगांची आठवण ताजी झाली. रस्त्याच्या कडेला ताणून बांधलेल्या दोरीवर परकराचा घट्‌ट काचा मारून लहान मुलगी हातात लांबच लांब बांबू धरून दोरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कशी चालायची, ते डोळ्यांसमोर उभे झाले. खाली त्या मुलीची आई गळ्यात बांधलेली ढोलकी वाजवत उभी असे अन् बाप इतर प्रयोगाची तयारी करण्यात गुंतलेला असे.
जादूचे प्रयोग तर अक्षरशः डोळ्यांत प्राण अन् मुठीत जीव घेऊन बघत असू. रस्त्याच्या कडेला उकिडवे बसावे लागे. न बसल्यास मुलगी करून टाकण्याची जादूगाराची धमकी असे. मग काय बिशाद होती ते डावलण्याची! मोठ्यांना- ‘अपने अपने जेब-पाकीट’ संभाळण्याची ताकीद असे. तो उस्ताद अन् त्याचा जंबुरा यांची नोक-झोक, सवाल-जवाब जागेवरून हलू देत नसत.
तसेही खेळ अर्ध्यावर सोडून जाणार्‍या बघ्यांवर तो तिलिस्मात ( म्हणजे काय ते तेव्हाही माहीत नव्हते, आजही नाही) जादू करणार असल्याने प्रत्येक शो फुल्ल असायचा. हे विशेषत्वाने लक्षात असण्याचे कारण हे की, या प्रत्येकाच्या खेळांत, ज्या करतबींचा तो खेळ सुरू केल्यापासून वारंवार उल्लेख करीत असे ते खेळ प्रत्यक्षात कधीच केले जात नसत! जसे साप-नेवले की लडाई, लडकी का हवा मे चलना, खाने के लिये लड्डू-पेढे के ढेर और पैसे के झाड उगाना इत्यादी.
या सगळ्या मजेदार मोहजालातून बाहेर काढले जाणे अत्यंत क्लेशदायी असायचे. त्यात मनापासून रमलेले असताना कुणाचा आणि किती तीव्रतेचा प्रहार होईल, याचा भरवसा नसे. कानाला धरून घरी आणून सोडल्यावर शिक्षेमार्फतच सुधारणा घडवू चाहणारे वडीलधारे घरी असल्यास उत्तरपूजा क्वचितच टळत असे. त्या रस्त्याने जाणार्‍या शिक्षकांनी बघितले असल्यास, दुसर्‍या दिवशी शाळेत नसले तरी किमान वर्गात तरी कधी माकड, कधी अस्वल, तर कधी डोंबारी असे जाहीर नामकरण करण्यास शिक्षक चुकत नसत! आज आपल्याला अभ्यास न करता अधिक चांगला नंबर कसा काढता येईल, हे शिकवण्यासाठी विख्यात जादूगार मार्गदर्शन करणार आहेत. असे प्रत्यक्ष छडीपेक्षा झोंबणारे वाक्‌ताडन झाल्याची आठवण विसरणे जमलेले नाही.
पावनी आणि डोंबारी दोघांचेही आभार, आठवणींचा पेटारा उघडून दिल्याबद्दल!
बाबा नरवेलकर
९८६००६०२१२
प्रत्येकाने वाहतूक नियम पाळावेत
आपल्या राज्यात दरवर्षी केंद्र, राज्य, प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानातून, कमीत कमी अपघात कसे होतील यासाठी प्रयत्न केला जातो. अपघाताची जी काही संख्या वाढत आहे ती कमी कशी करता येईल, याकडेही सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. वाहतुकीच्या बाबतीत जे काही नवीन नियम येतात त्याचाही अभ्यास करून ते काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. गाडी चालविताना मोबाईलवर बोलू नका, नशा करून गाडी चालवू नका, सिग्नल तोडू नका. हेल्मेट अवश्य वापरा. प्रत्येकाला वाहतुकीचे हे नियम माहिती आहेत. ते आचरणात आणल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपले तसेच आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. शासन अभ्यास करून वाहतुकीचे नियम करते. या नियमांचा अभ्यास केला पाहिजे. रस्ता सुरक्षा अभियानाचे फलित तुम्ही सहभागी झाल्याशिवाय मिळणार नाही. आपण स्वत: नियमांचे पालन करून दुसर्‍यालाही नियम पाळण्यासाठी प्रेरित केल्यास अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. यासाठी प्रत्येकाने रस्ता सुरक्षा अभियानात योगदान दिले पाहिजे, असे वाटते. तरुणांनी चारचाकी व दुचाकी चालविताना वेगाची मर्यादा ठेवली पाहिजे. एखाद्याला अपघातात अपंगत्व आल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते, याची जाणीव तरुणांनी ठेवावी. मोठ्या प्रमाणात लोक दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. तरुणांमध्ये मोठा जोश आहे. हा जोश समाजोपयोगी कामांमध्ये वापरून प्रगती साधावी. प्रत्येक दुचाकी वाहनधारकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केलाच पाहिजे. आयुष्य मोलाचे आहे. आपल्या आयुष्यासाठी वाहतुकीचे सर्व नियम पाळून दुसर्‍यालाही पाळण्याविषयी सांगितले पाहिजे.
रस्ता सुरक्षा अभियान १५ दिवस मर्यादेत न ठेवता वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करायला पाहिजे. ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला पाहिजे. आज रस्त्यांमध्ये खूप मोठी सुधारणा झालेली आहे, तरीही दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे, जी चिंताजनक बाब वाटते. त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी तरुणांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळून दुसर्‍यालाही नियम पाळण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे.
प्रा. मधुकर चुटे
नागपूर
देशभक्ती आणि खोटी मैत्री
हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपल्याच मित्रावर प्रहार करणे या संस्कृतीचे नाव काय? त्यात स्वतःचे नुकसान होईलच, पण त्याहीपेक्षा धर्मांध शक्ती व विरोधी पक्षाला उभारी मिळेल, ही गोष्ट सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षांना समजणे गरजेचे आहे. पूर्वजांचे आशीर्वाद सदासर्वदा लाभतीलच असे नाही. केवळ स्वतःचे राजकीय नुकसान होता कामा नये, या एकाच कारणाने विकासाच्या मुद्यांना विरोध, आपली विश्‍वासार्हता कमीच करेल. हे का समजत नाही? देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतात आणि देशाच्या श्रद्धास्थानांचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्यच ठरते. वंदे मातरम्, भारत माता की जय, हीच राष्ट्र्‌वाणी, भक्ती, अभिमान व राष्ट्रनिष्ठा असून, हाच देशाच्या विकासाचा केवळ जागर आहे आणि ठेवासुद्धा. एकाच सूत्रात बद्ध केलेला हा ठेवा म्हणजे दमदार शब्दांतून निर्माण झालेले राष्ट्रीय मंत्रच आहेत आणि त्यामुळेच देशभक्तीची स्फुल्लिंगे चेतविली जातात. साध्या साध्या गोष्टींवरून आणि भाऊ भाऊ म्हणून मित्राच्या पायात तंगड्या घालून नाही, हेच सुज्ञाशी बहू असे.
अमोल करकरे
पनवेल
ढोंगी बगळे
आपण रोज वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवर बातम्या पाहिल्या की, अजूनही नोटबंदी हा विषय चघळला जात आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केल्यापासून सर्व विरोधक अजूनही टीका करीतच आहेत. सरकार जो काही निर्णय घेते तो विचारपूर्वकच घेते. कारण, त्यांच्यावर देशाची पूर्ण जबाबदारी असते. पण, ज्यांना अर्धवट ज्ञान आहे, त्यांना शहाणपण कोण शिकवणार? नोटबंदीमुळे काळा पैसा पकडला गेला. रिझर्व्ह बँकेसह अनेक बँकांमधील भ्रष्ट अधिकारी पकडले गेले. अनेकांवर कारवाई झाली आणि ती सुरूच राहणार आहे. पण, हे ढोंगी बगळे आकाश पाताळ एक करीत आहेत. तरी बरे की, यांना कुणी विचारीत नाही. ज्यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावली आणि हजारो जणांना तुरुंगात डांबले, तेव्हा कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालीत, अनेकांना यातना झाल्या. त्यावेळी अनेक युवकांना जीवे मारून टाकण्यात आले आणि नंतर त्यांचा पत्तासुद्धा लागला नाही. त्यावेळी हे ढोंगी बगळे कुठे होते. त्यावेळी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना तुरुंगात १९ महिने बंद केले. पण, दोन महिन्यांसाठी या कावळ्यांची कावकाव सुरूच आहे. अजूनही त्या घटना जुने लोक सांगतात, तेव्हा भयंकर राग येतो. ज्यावेळी इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी याच ढोंगी बगळ्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हजारो शिखांची कत्तल केली, अनेक घरांची राखरांगोळी केली, त्याचे या ढोंगी बगळ्यांना काहीच वाटत नाही. त्यातील अनेक आरोपी आज राजरोसपणे वावरत आहेत.
कॉंग्रेसने ६० वर्षे देशावर राज्य केल्यामुळे त्यांना सत्तेचा अघोरी रोगच जडला होता. या देशाचे वारसदार आम्हीच, असे समजून सतत तत्कालीन विरोधी पक्षांचा घोर विरोध केला. पण, मर्यादा नावाची चीजच नाही. राजकारणातही मोठ्यांचा मान राखावा ही यांची संस्कृती नाही. त्यांना फक्त हुकूमशाहीने राज्य चालविण्याची संस्कृती तेवढी मिळाली आहे. म्हणूनच तर देशाच्या जनतेने या लोकांना साफ नाकारून नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जाणत्या नेत्याच्या हाती सत्ता दिली. आज मोदी देशाच्या विकासासाठी चौफेर विकास करीत असताना, हा विकास यांच्या डोळ्यात सलतो आहे. त्यांनी केवळ देशातच लौकिक मिळविला नाही, तर जगातही भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. विरोधक एकच लक्ष्य करीत आहेत, ते म्हणजे मोदी आणि भारतीय जनता पक्ष. पण, या लोकांनी लक्षात ठेवावे की, जनतेला फसवणार्‍या या लोकांच्या हातून सत्ता हिसकून जनतेने ‘भगवान की हाक सुनी और मोदी जैसे ज्ञानीके हातमे भारत सौंेपा है’. ढोंगी बगळ्यांनो, आतातरी आत्मपरिक्षण करून आपल्या पापांची आठवण ठेवा.
शारदा रुक्मांगद
हवेली गार्डन, चंद्रपूर
आंधळा विचार सोडा!
नरेंद्र मोदी यांना हटवून लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सरकार बनवा, अशी मागणी तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली. हे एखाद्या शिरजोर माणसासारखेच वक्तव्य आहे. या वक्तव्यात राष्ट्रीय हित नसून केवळ एका व्यक्तीचा द्वेष तेवढा भरला आहे. हे त्यांचे म्हणणे कितपत योग्य आहे. लोकशाहीची काही चाड आहे की नाही? मोदी हे लोकशाही पद्धतीने पंतप्रधान झाले आहेत. सत्य हे आहे की, ममता बॅनर्जींच्या खासदारांनी चिटफंड घोटाळा केल्यामुळे त्या संतापल्या आहेत. आधी आपल्या खासदारांना त्यांनी सांभाळले पाहिजे. त्यांचे वक्तव्य एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभा देत नाही. स्वत: ममता असे उद्गार काढून हिटलरशाहीचे प्रदर्शन करीत आहेत. पंतप्रधानांविषयी आपण काय बोलत आहोत, कसे बोलले पाहिजे, हे आधी ममताने शिकले पाहिजे. यावरून तृणमूल कॉंग्रेसची पातळी किती खाली गेली आहे, हे सहज लक्षात येते. राजकीय नेत्यांनी आपली पातळी ओळखून विधाने करावीत. विरोधकांचे काम विरोधाचे आहे, हे एकवेळ मान्य. पण काहीही बोलून स्वत:चाच अपमान करण्याची जणू विरोधकांना सवयच जडली आहे. खालच्या पातळीवरचा विचार सोडा, आंधळा विचारही त्यागा.
डॉ. व. गो. देशपांडे
शंकरनगर, नागपूर