रोजगारासाठी औद्योगिकीकरणाला प्राधान्य

अमरावतीत पदवीधरांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

0
107

तभा वृत्तसेवा
अमरावती, १६ जानेवारी
औद्योगिक गुतंवणुकीत १६ व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र गेल्या दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे. रोजगार निर्मितीसाठी भविष्यातही शेतिपूरक उद्योगासह औद्योगीकरणाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपा- शिवसेना- रिपाई (अ)- शिक्षक आघाडी – राष्ट्रीय समाज पक्ष – मराशिप महायुतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदानावर आयोजिण्यात आलेल्या पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषिमंत्री भाऊसाहे फुंडकर, ज्येष्ठ नेते अरुण अडसड, आमदार चैनसुख संचेती, खासदार आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे, उमेदवार व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, आ. उईके, आ. गोवर्धन शर्मा, आ. पाटणी, आ. बोंडे, आ. बुंदिले, आ. भिलावेकर, आ. राणा, माजी आ. खोटरे, माजी आ. संजय बंड यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होती.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राची प्रगती व्हावी, यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करीत आहे. त्याचे अतिशय चांगले परिणाम समोर येत असून शेतिपूरक उद्योगात क्रांती घडविण्यासाठी समृद्धी महामार्ग शासन तयार करीत आहे. हा मार्ग शेतकर्‍यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. तसेच या मार्गासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांचाही मोठा फायदा शासन करणार आहे. जी मंडळी या मार्गाला विरोध करीत आहे, ती मंडळी विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचे विरोधक असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
शिक्षणातही राज्याने प्रगती केली आहे. आतापर्यंत देशात राज्याचा क्रमांक १३ वा होता. १७ हजार शाळांमध्ये आऊटकम लर्निंग हा प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यामुळे देशात राज्याची स्थिती सुधारली आहे. येत्या दोन वर्षात शिक्षणातही आपले राज्य अव्वल राहील, यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहे. शिक्षकांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुदानासारखे जिव्हाळ्याचे प्रश्‍न राज्य शासनाने निकाली काढले आहेत. पुढील काळातही हेच धोरण राबविले जाईल. देश बदलतोय्, महाराष्ट्र बदलतोय् असे सांगून मुख्यमंत्र्यांनी डॉ. रणजित पाटील यांनी मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी केला. माझ्या जवळ असलेल्या सर्व खात्यांचा कारभार डॉ. पाटील यांनी समर्थपणे सांभाळला. त्यामुळे मला इतर सर्व खात्यांच्या बैठका घेऊन चौफेर काम करणे शक्य झाले. उच्चशिक्षित, अभ्यासू असलेल्या डॉ. पाटील यांचा निश्‍चितच विजय होणार आहे. फक्त तो विक्रमी मतांनी व्हावा, अशी माझी प्रामणिक इच्छा आहे. इतरही मंडळींची यावेळी भाषणे झाली.
मेळाव्याला अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांतील पदवीधर मतदार व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यानंतर डॉ. रणजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे आमदार व पदाधिकारी होते.