‘मृत्यूनंतरही मला अजून जगायचंय्…’

0
192

•तब्बल ११०० किलोमिटरची अवयवदान वारी • वर्षभरात १ लाख दाते तयार करण्याची देशपांडे यांची जिद्द
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, १७ जानेवारी
अवयवदान व देहदानाबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकहून ११०० किलोमिटरचे अंतर पायी चालून ठिकठिकाणी ग्रामसभा, बैठका, महाविद्यालयीन विद्याथ्यार्र्ंना मार्गदर्शन करीत आनंदवनात पोहचणार्‍या सुनील देशपांडे यांच्याच कवितेच्या या ओळी आहेत. मृत्यूनंतरही जगायचे असेल, तर अवयवदान करा, असा संदेश देत या वर्षभरात १ लाख दाते तयार करण्याची जिद्द त्यांनी बाळगली आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याची सुरुवात उत्तमच झाली असून, ‘वेल बिगेन ईज हॉफ डन’ असे म्हणायला हरकत नाही.
नाशिकला राहणारे सुनील देशपांडे हे ६५ वर्षांचे गृहस्थ तसे व्यावसायिक आहेत. त्यांचे तेथे एक हॉटेल आहे. पण तरुणपणीच ते बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आयुष्याच्या सायंकाळी आपल्या हातून काहीतरी समाजसेवा घडावी यासाठी त्यांनी देहदान व अवयवदानाच्या जनजागृतीचे कार्य हाती घेतले. सुनील देशपांडे यांनी त्यांचे व्याही शरद दाऊतखानी व मित्र प्रियदर्शन बापट यांच्यासह २५ नोव्हेंबरला पदयात्रेला सुरुवात केली. नाशिक ते आनंदवन हे ११०० किलोमिटरचे अंतर त्यांनी ५२ दिवसांत पूर्ण केले.
दरम्यान, मार्गावरील शहरे व विशेषत: गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी सभा घेतल्या. रोटरी क्लबच्या कार्यकर्त्यांना देहदान व अवयवदानासंबंधीची पत्रके आणि संमतीपत्रे वाटली. येत्या वर्षभरात या माध्यमातून १ लाख संमतीपत्रे भरून घ्यायचा त्यांचा ध्यास आहे.
दररोज २५ किलोमिटरचे सरासरी अंतर पायी कापून काढत ते पुढे येईल त्या गावात मुक्काम करायचे. प्रत्येक गावात त्यांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे ते सांगतात. मात्र, अनेकांना अवयवदानाबाबत माहितीच नसल्याचा अनुभव त्यांना आला. मात्र, एकदा त्याचे महत्त्व सांगितले, तर लोक लगेच तयार होत असल्याचाही सुखद प्रतिसाद त्यांना मिळाला. ज्याला काहीच माहीत नाही, तो लवकर तयार होतो. पण ज्याला अर्धवट ज्ञान आहे, तो मात्र किस पाडतो आणि वेळ मारून नेतो, असाही देशपांडे यांचा अनुभव आहे.
या संपूर्ण मोहिमेत त्यांना रोटरी क्लबच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. शिवाय त्यांची तब्येत बघायला त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रंजना देशपांडे होत्या. अन्य काही स्नेहीगणही त्यांच्यासोबत गाडीत बसून साथ देत होते. वरोड्यात आल्यानंतर मुद्दामच देशपांडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पाला भेट दिली. तेथून परतताना ते चंद्रपुरात रोटरी क्लबच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला हॉटेल एनडी येथे आले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यावेळी एनडीचे संचालक अशोक हासानी व रोटरी क्लबचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.