स्मरण आणि विस्मरण

0
152

प्रासंगिक
विसर पडणे ही बाब सहज आहे असे अनेकांना वाटते. मोबाईल, चष्मा, पर्स, छत्री इत्यादी वस्तू हरवितात म्हणजे नेमके काय होते? तर या वस्तू ठेवल्यावर घाईगडबडीत परत घेण्याचा विसर पडतो. काही चष्मेवाले तर अधिक गोंधळी असतात. चष्मा डोक्यावरील केसांवर विसावलेला असतो आणि हे घरातील सर्वांना चष्मा शोधण्याच्या कामी जुंपतात.
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेला गृहपाठ करून आणण्याचा अनेकदा विसर पडतो. विसर पडण्याचे बाबतीत सरकारी कर्मचारी अगदी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकतील इतके पक्के असतात. कालच्या पत्राची ओसी (कार्यालयीन प्रत) आज मागितली तर मिळत नाही, असे अनेकदा घडते. लाभार्थी समोर दिसला की, अनेक कर्मचारी विसर पडल्याचे भासवतात. परंतु, त्यांच्या नाकात कोर्‍या नोटांचा वास गेला की, संंबंधित फाईल कुठे ठेवली आहे, हे त्यांना पटकन आठवते. काही नवरोबा (बावळट असले पाहिजे) बायकोचा वाढदिवस विसरतात. बायकोचा वाढदिवस विसरणे याची शिक्षा नवरोबाला कोणत्या स्वरूपात मिळते ते ईश्‍वर आणी विसराळू नवरोबाच जाणोत! विसर पडू नये म्हणजे स्मरणशक्ती वाढविणे हे ओघाने आलेच. औषधी उत्पादकांनी याचा फायदा घेतला नसता तरच नवल! स्मरणशक्ती वाढविणारी अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविणार्‍या औषधींचा यात समावेश आहे. काही जणांना तर स्मरणशक्ती वाढविणारे औषध नियमित घेण्याचीही आठवण राहात नाही, हे विशेष. आता तर या औषधींची जाहिरात करण्यासाठी मोठमोठे अभिनेते सरसावले आहेत.
स्मरण का राहात नाही किंवा विस्मरण का होते? याची अनेक उत्तरे आहेत. स्मरणशक्ती वाढविण्याकरिता प्राणायाम करा, सूडबुद्धीला थारा देऊ नका, सकाळी लवकर उठा, व्यसन करू नका, संतुलित आणि योग्य आहार, त्यात हिरव्या पालेभाच्या आणि फळे यासारखे अनेक उपाय सांगितले आहेत.
राजकारणात तर तीव्र स्मरणशक्तीची आवश्यकता असते. कोणता मुद्दा, कधी काढायचा, समोर श्रोतृवर्ग कोण आहे इत्यादी बाबी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात. काही वेळा घराणेशाहीमुळे पक्षात मोठे पद मिळते. मात्र, भाषण करता येत नसेल तर काही वेळा आक्रित घडते. असे लिहिलेले भाषण ऐकून अनेकांचे मनोरंजन झालेले आहे. आपल्या एका माजी परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात हिंदुस्थानच्या वतीने बोलताना अन्य एका देशाने त्या देशाकरिता लिहिलेले भाषणच वाचले व स्वत:सोबत देशाचेही हसे केले. एका राजकीय पक्षाच्या उच्चपदस्थ व्यक्तीला शोकसंदेश लिहिताना काय लिहावे याचे स्मरण न झाल्याने त्यांनी मोबाईलमध्ये सेव्ह केलेला भलताच मजकूर कॉपी करून पाठविला आणि पुढे त्याचे हसे झाले.
ज्यांचे दैनंदिन आचरण नियमित असते त्यांची स्मरणशक्ती चांगली असते, असे सांगितले जाते. स्त्रियांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी असते. भूतकाळातील घटना त्यांच्या स्मरणात तपशीलवार असतात. याचा वापर प्रामुख्याने त्या आपल्याच नवर्‍याच्या चुका काढताना करतात, अशी नवरे मंडळींची (केविलवाणी) व्यथा असते.
औषधाची गोळी घेतली की नाही याबाबत ज्येष्ठांना स्मरण राहात नाही. ज्येष्ठांच्या या विस्मरणातून अनेकदा घरात गोंधळ उडतो.
विस्मरण घडले तरी योग्य पद्धतीने स्मरण करून देणे हे सुज्ञांचे कर्तव्य ठरते. हनुमानालादेखील स्वत:च्या शक्तीचे विस्मरण झाले होते. मात्र, त्याला त्याच्या शक्तीचे स्मरण किंवा जाणीव करून देताच हनुमानाने तो महाबली असल्याचे सिद्ध केले.
भारतीय समाजाची अवस्था शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानासारखी झाली आहे. पुढील काही वर्षांत जगाचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत हिंदुस्थान येऊ शकेल अशी दिशा मिळाली आहे. दिशा योग्य आहे तरी प्रयत्न अधिक करण्याची आवश्यकता आहे. देशाला परम् वैभवाला नेण्याच्या प्रयत्नात प्रत्येक सुज्ञ भारतीयाला स्वत:चे योगदान देण्याचा विसर पडू नये, ही परमेश्‍वराला प्रार्थना.
– हेमंत पुरुषोत्तम कद्रे
९४२२२१५३४३