मातेच्या विद्यापीठात जगातील सर्वोत्तम शिक्षण, संस्कार : मीरा कडबे

अंबादेवी संस्थान व्याख्यानमाला

0
175

तभा वृत्तसेवा
अमरावती, १९ जानेवारी
मातेच्या विद्यापीठात जे शिक्षण, जे संस्कार मिळतात ते इतरत्र कुठेही मिळत नाहीत. अनेक मान्यवर व्यक्तींच्या देदीप्यमान आयुष्यामागे त्यांच्या मातेकडून मिळालेले संस्कार व प्रेरणा आढळते, असे प्रतिपादन नागपूरस्थित ओलावा महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्ष, तरुण भारतच्या संचालक, राज्यपाल पुरस्कारप्राप्त मीरा अरविंद कडबे यांनी केले. स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजामाता जयंतीनिमित्त श्री अंबादेवी संस्थान ग्रंथालयात आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना मीरा कडबे बोलत होत्या.
संस्थानच्या उपाध्यक्ष विद्या देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
व्याख्यानात बोलताना मीरा कडबे म्हणाल्या, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ४०० वर्षे महाराष्ट्रातील क्षात्रतेज जणू लुप्त झाले होते. काही तुरळक ठिकाणी जे होते ते संघटित न होता परकीय शासकांचेच बळ वाढवण्यात धन्यता मानत होते. विदर्भकन्या जिजाबाई ह्यांचे सासर आणि माहेर बलाढ्य असले तरी आपसातील वैमनस्यामुळे एकमेकांचे पाय ओढण्यात सामर्थ्य, वेळ वाया घालविला जात होता. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर सबंध देशात होती. तिकडे रजपूत राजे हेच करीत होते. त्यामुळे परकीय सत्ता बळकट होत गेली. अशा परिस्थितीत द्विधा परिस्थिमुळे अंत:करणात खळबळ उडालेल्या तेजस्वी जिजाबाईंमधील गर्भस्थ शिवरायांना सुभद्रेच्या गर्भातील अभिमन्यूप्रमाणे आईकडूनच अन्यायाविरुद्ध त्वेषाने उठून जगण्याचे संस्कार मिळत गेले. जिजाबाईंचे मातृत्व एका आईचा पराक्रम, संपूर्ण विपरीत परिस्थितीतूनही एक समर्थ, जाणता व दूरदृष्टी असलेला सामर्थ्यवान राजा, शककर्ता पुत्र घडविण्यामागचे तिचे विचार, आचार, संस्कार, कर्तृत्व, गाथा सप्तशतीत वर्णन केलेली स्त्रीची सर्व रूपे-विद्या, धृती, शक्ती, क्षमा, शांती यांचे अर्थ उकलून दाखवीत होते. बाल शिवरायांना त्यांनी कसे घडविले हा एक शिक्षणाचा फार मोठा आणि महत्त्वाचा पैलू आहे. २१ व्या शतकात गंभीर झालेल्या सामाजिक परिस्थितीवर मात स्त्रीच करू शकते. स्त्री कशी असावी हे शिवकाळानंतर रमाबाई पेशवे, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि कित्येक समर्थ स्त्रियांनी आपल्या आचरणातून प्रत्ययास आणले, असे मीरा कडबे म्हणाल्या.