खैरलांजी हत्याकांड पीडित भय्यालाल भोतमांगे यांचे निधन

0
203

तभा वृत्तसेवा
भंडारा, २० जानेवारी
२००६ साली जिल्ह्यात झालेल्या खैरलांजी हत्याकांडातून बचावलेले कुटुंबप्रमुख भय्यालाल भोतमांगे यांचे आज २० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने नागपूर येथील श्रीकृष्ण इस्पितळात निधन झाले.
आज दुपारी २ वाजताच्या सुमारास भय्यालाल यांना हृदयविकाराचा झटका आला. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस शिपायांकडून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना भय्यालाल याचा मृत्यू झाला.
२९ सप्टेंबर २००६ रोजी मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या गावात भय्यालाल भोतमांगे यांच्या घरावर जमावाने हल्ला करून घरातील चौघांची हत्या केली होती. यात त्याची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका, मुलगा रोशन व सुधीर यांचा समावेश होता. या हत्याकांडातून बचावलेल्या कुटुंबप्रमुख भय्यालाल याला शासनाकडून मदत मिळाली. घटनेनंतर २ वर्ष भय्यालाल वरठी येथे आश्रयाला होता. नंतर भंडारा येथील शासकीय वसतिगृहात नोकरी आणि घर शासनाकडून मदत स्वरूपात देण्यात आले होते. म्हाडा कॉलनी भागात भय्यालाल मागील काही वर्षांपासून भंडारा येथे वास्तव्यास होते.