पेकाटात लाथ हाणा त्या ऍमॅझॉनच्या!

0
135

जिथे लोकांच्या जिवावर करोडो रुपयांचा धंदा करता येतो, त्या देशातल्या नागरिकांच्या भावना कळत नाहीत त्यांना? या देशाचा तिरंगा पायपुसण्यांवर अन् महात्मा गांधींचे चित्र पायातल्या वाहाणांवर वापरताना जराशी लाज वाटली नाही त्यांना? ‘इंडियाज् लार्जेस्ट ऑनलाईन स्टोेअर’चा ठप्पा स्वत:च्या कपाळावर मारून घेत ‘इंडिया’मध्येच मोठ्या दिमाखाने मिरवणार्‍या अन् दिवसाकाठी कोट्यवधीचा गल्ला भरणार्‍या या कंपनीला भारतीय अस्मितेच्या प्रतीकांची किंमत कळू नये? या प्रतीकांचा त्यांना एवढाच तिटकारा आला असेल अन् पदोपदी त्यांचा अवमान करण्याचा निर्धार करूनच ते बेलगाम वागत सुटले असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी इथल्या सरकारने आणि त्याहीपेक्षा जनतेने उचलली पाहिजे. भारताकडे केवळ आणि केवळ एका बाजारपेठेच्या दृष्टीने बघणारी जमात ही. यांना अंतर्वस्त्रांवर छापायला भारतीय जनतेची आस्था असलेल्या देवी-देवतांची चित्रे लागतात अन् पायपुसण्यांवर वापरायला भारताचा तिरंगा! यावरून थोबाडीत हाणली गेली ती कमी होती की काय, म्हणून परवा त्यांनी महामा गांधींचे चित्र असलेल्या चपला विकायला आणल्या बाजारात!
कोण कुठली ऍमॅझॉन नावाची एक अमेरिकन कंपनी २०१३ मध्ये भारतात दाखल होते. तीन-साडेतीन वर्षांतच तिच्या कारभाराची व्याप्ती देशभर पसरते. इथल्या बाजारपेठांची प्रस्थापित व्यवस्था पुरती ध्वस्त करत, त्यात रुळलेली रोजगाराची परिपाठी पाऽऽर मोडीत काढत ऍमॅझॉनचा ‘बाजार’ उभा राहिला. स्पर्धेत आधीपासून अस्तित्व राखून असलेल्या स्नॅपडील अन् फ्लिपकार्डला धक्का देत इथली ऑनलाईन बाजारपेठ काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे आकारास येऊ लागले. इंटरनेटच्या वाढत्या वापराचा परिणाम असेल तो कदाचित, पण या ‘दुकाना’ला भारतीय जनतेचा पाठिंबा त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने मिळू लागला. अल्पशा कालावधीत विस्तारलेल्या त्याच्या व्यापात लोकांचे योगदान फार मोठे आहे. ‘आमच्या’च लोकांनी तयार केलेल्या वस्तू एकत्र करून आम्हालाच विकण्याची ‘त्यांची’ कल्पना का उगाच भन्नाट ठरली! यातून भारतीय जनतेबद्दल, नव्हे, एकूणच या देशाबद्दल आस्थेची, आदराची भावना तरी निर्माण व्हायला हवी ना त्यांच्या मनात? पण, इथे तर चित्र वेगळेच आहे. ज्यांच्या भरवशावर जगतोय्, ज्यांना लुबाडून आपला गल्ला भरतोय्, त्या भारतीय जनतेच्याच भावना पायदळी तुडवण्याचा उपद्‌व्याप चाललाय् त्यांचा. आमचा तिरंगा पायाखाली अन् गांधीही पायाशी हवाय् त्यांना.
कुणाच्या सडक्या मेंदूची पैदास आहे ही? कायम बाजारपेठ म्हणून वापर करत राहिलेत ते भारताचा अन् भारतीय जनतेचा ग्राहक म्हणून! त्यांना त्यांच्या देशाच्या नेत्यांचे, तिथल्या राष्ट्रध्वजाचे चित्र सापडत नाही असल्या वस्तूंवर टाकायला. जॉन केनेडींचा फोटो टाकलेल्या चपला कधी विकल्या आहेत ऍमॅझॉनने अमेरिकेच्या बाजारात? की तिथल्या राष्ट्रध्वजाचे चित्र टाकावेसे वाटले कधी त्यांना त्यांच्या दारातल्या पायपुसण्यांवर? मग भारतीय जनतेच्या नाकावर टिच्चून इथल्याच प्रतीकांची किंमत मातीमोल करायला का कायम सरसावलेले असतात ते?
अर्थात, त्यांची अशी हिंमत व्हायला आमची मानसिकताही तेवढीच कारणीभूत आहे. कुठल्या एका संस्थेच्या कॅलेंडरवरील चित्रात चरख्यावर सूत कातताना गांधींऐवजी मोदी दिसले, तर केवढा भडका उडाला काही लोकांचा! लागलीच कुणी कविता केल्या, कुणी काळ्या पट्‌ट्या लावल्या तोंडावर. कुणी निषेधाचा सूर आळवला, तर कुणी गांधींच्या तुलनेत मोदींचे खुजेपण सिद्ध करण्यात तोंडाची वाफ दवडली. पण, ऍमॅझॉनने थेट चपलांवरच गांधींचे चित्र छापून प्रत्येकाच्याच पायाखाली त्यांना तुडविण्याचे षडयंत्र रचले, वर पुन्हा धंद्याच्या नावाखाली त्याचे समर्थन करण्याचा निर्लज्ज प्रकारही केला, तरी इथे कुणाची माथी भडकल्याची वार्ता नाही. हाच अश्‍लाघ्य प्रकार त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाबाबतही करण्याचा प्रयत्न केला, तरी थोडाबहुत अपवाद वगळता कुणी त्याविरुद्ध चवताळून उठल्याचेही चित्रही कुठे बघायला मिळाले नाही. फारतर चार-दोन लोकांचा टिवटिवाट, एखाद्या मंत्र्यांचा इशारा, ‘यांच्यावर तर बहिष्कारच घातला पाहिजे,’ अशा मवाळ शब्दांतली कुणाची तरी मल्लिनाथी, यापलीकडे निषेधाचा धारदार सूर उमटलाच नाही कुठे. असल्या वागण्याचे ‘परिणाम’ त्यांना भोगावे लागणे तर सोडाच, उलट तमाम भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या आमच्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा मुद्दा त्यांच्या एका माफीनाम्यावर निकाली निघाला. आम्हीही उदार मनाने माफ केले त्यांना. आता गांधींचे चित्र असलेल्या चपलांचे उत्पादनही बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर करतील ते. अन् तमाम मुर्दाडांचे समाधानही होईल तेवढ्याने! ना त्यांच्या धंद्यावर कुठला परिणाम ना आमच्या व्यवहारावर. राष्ट्रभक्तीच्या संदर्भातील आमच्या भावनांचे परीघ एवढे मर्यादित असताना आम्हाला सहज टपली मारून निघून जाण्याची संधी कोण कशाला सोडेल? गांधींच्या जागी मोदींचे नुसते चित्र बघितले तरी भडकलेले लोक, गांधी चपलांवर बघून शांत कसे राहिले? त्यांनी तिरंगा पायपुसण्यांवर रंगवला तरी धमण्यांतले रक्त सळसळले कसे नाही त्यांच्या? की या मुद्यावर राजकारण करायला तितकासा वाव नसल्याने तोंडं शिवली गेलीत सर्वांची? अर्थात, त्यांच्या राजकारणाचा भाग सोडला, तरी या प्रकरणात क्षोभ व्यक्त करण्याची जबाबदारी काही त्यांच्या एकट्याची नाही. सारा देश पेटून उठायला हवा या प्रकरणी. आमच्या भावनांशी खेळण्याची पुन्हा कधी कुणाची हिंमत होणार नाही, असा धडा शिकवला गेला पाहिजे त्या ऍमॅझॉनच्या निलाजर्‍या अधिकार्‍यांना.
हा चमत्कार सर्वसामान्य नागरिकांनी उगारलेल्या बहिष्काराच्या अस्त्राद्वारेच घडू शकतो. आमच्या मानचिन्हांची किंमत त्यांना मान्य नसेल, तर पेकाटात लाथ हाणा त्यांच्या. पण ते घडणार कसे? कसे शक्य आहे ते? आम्हाला तर हाताच्या बोटांच्या हालचालीतून घरबसल्या हव्यात सार्‍या वस्तू. घरातून बाहेर पडून बाजारात जायला नको, की खरेदीसाठी आपला अमूल्य वेळ दवडायला नको. एका विदेशी कंपनीच्या या व्यवहारात आमच्या गावातल्या बाजारपेठेची पुरती वाट लागली, तरी आम्हाला कुठे सोयरसुतक आहे त्याचे! मग तिरंग्याचा अवमान झाला काय नि त्या महात्म्याचे चित्र वहाणांवर आले काय, कुणाचेच काहीच बिघडत नाही इथे. नाही म्हणायला चार-दोन लोकांनी केला थोडाबहुत कलकलाट. मंत्र्यांनी खडे बोल सुनावले त्यांना. मग त्यांनी माफी मागितली. प्रकरण मिटले. जनता मोकळी- पुन्हा ऍमॅझॉन नावाच्या त्या अमेरिकन कंपनीकडे ‘आपल्या’ मागण्या नोंदवायला! असंच होतं आपलं. दिशाहीन राजकारणात वाहावत गेलेल्या अन् स्वाभिमान गहाण टाकलेल्या लोकांची गर्दी सगळी. हा देश सुधरवायला इंग्रज अजून काही वर्षं इथं राहायला हवे होते, असं मनापासून वाटणार्‍या बेशरमांची जमात अजूनही शाबूत आहे इथे. त्यांच्या लेखी, तिरंगा आकाशात दिमाखानं उंच फडकला काय अन् दारातल्या पायपुसण्यांवर उमटला काय, कुणाला काय फरक पडतो? अशा छोट्या छोट्या गोष्टींची दखल घ्यायला फुरसत आहे कुणाला इथे? चित्रातल्या चरख्यामागे गांधींऐवजी मोदी दिसले म्हणून खवळलेली गर्दी, ऍमॅझॉनच्या चपलांवर गांधी बघून जेव्हा खवळेल अन् बोटांवरच्या मार्केटिंगमध्ये रमलेल्या तरुणाईला गावातल्या बाजारपेठेच्या अस्तित्वामुळे अबाधित राहिलेल्या अर्थव्यवस्थेचे मर्म जेव्हा कळेल, तो सुदिन! नाहीतर ऍमॅझॉनने केलेल्या अपमानाचे चटके आहेतच आमच्या वाट्याला…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३