तामिळ स्वाभिमानावर विदेशी प्रहार

0
161

अन्वयार्थ
आपल्या पाच हजार वर्षे जुन्या शेतकर्‍यांच्या सणावरील बंदीमुळे संपूर्ण तामिळनाडूत प्रचंड जनक्षोभ उसळला असताना देशातील अन्य भागांत याचे कुठलेही पडसाद उमटू नयेत, ही अतिशय आश्‍चर्याची बाब आहे. ही संवेदनशून्यता आहे की दाक्षिणात्य प्रांतांची उपेक्षा? शंकराचे वाहन असलेल्या नंदीला केंद्रस्थानी ठेवून तेथे जलिकट्टू म्हणजे बैलाच्या शिंगांवर टांगलेली पोटळी आणण्याचा उत्सव संक्रांतीनिमित्त साजरा करण्यात येतो. यावर सर्वोच्च न्यायालयाने प्राणी-अत्याचाराचा संदर्भ देत बंदी घातली. आणि याचिकाकर्ता होती विदेशात जन्मलेली पेटा संस्था, जी पशूंवरील अत्याचाराविरुद्ध लढा देत असते आणि अनेक चित्रपट अभिनेते, संवेदनशील लोक या संस्थेशी जुळलेले आहेत.
मी इतक्यातच चेन्नईहून परतलो. तेथे अनुसूचित जातीच्या कुटुंबांसमवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित सेवाभारतीच्या पोंगल उत्सवात सहभागी झालो, तसेच कांचीच्या परमाचार्यांना समर्पित एका अनोख्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात उत्तर-दक्षिण एकता यावर माझे भाषण झाले. दोन्ही कार्यक्रमांत जलिकट्टूवरील बंदी कशी दूर होईल, हाच मुख्य विषय होता. हा युवकांचा उत्सव आहे. गरीब, शेतकरी, ग्रामीण जनेतचा हा सण आहे. यात नंदीच्या शिंगांवर पुरस्काराची झोळी बांधून युवक त्याच्या पाठीवर चढून शिंगातून झोळी काढून ती उघडतात. हा थोड्याफार प्रमाणात गोविंदांच्या दहीहंडीप्रमाणे शौर्य व अंगभूत क्षमता दाखविण्याचा उत्साहाने भारलेला सण आहे.
सध्या तामिळ शेतकरी बैलांची स्वदेशी जात (वंश) वाचविण्याविषयी चिंतित आहेत. ते आपल्या बैलांवर पुत्रवत प्रेम करतात आणि बैलांच्या विदेशी वाणाच्या आक्रमक प्रचार व प्रभावामुळे ते भयग्रस्त झाले आहेत. ईदच्या वेळी लाखो प्राण्यांची कत्तल झाली तरी जे लोक गप्प बसतात, ख्रिसमसच्या वेळी टर्की नामक सुंदर पक्षाला गोळी घालून ठार करून त्याचे मांस खाल्ल्यानंतरही जे तोंडातून ब्र देखील काढत नाहीत, जे रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यतीत सहभागी होतात ते हिंदूंचा निर्दोष खेळ, उत्सवावर बंदी का आणत आहेत, याचा विचार हे शेतकरी करीत आहेत. नंदी हे शिवाचे वाहन आहे. आमच्या घरी नंदीवर समस्त शिवपरिवार विराजमान असलेले चित्र भिंतीवर लावलेले दिसते. मग पेटाच्या याचिकेवर शंकराला नंदीवरून उतरवून देण्यात येईल काय? कारण भगवान शंकर नंदीवर विराजमान झाल्यामुळे नंदीला केवढे कष्ट, त्रास होईल बरे! त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरायचा झाल्यास असे चित्र जणू बैलांवर अत्याचाराची प्रेरणाच देतात, नाही का?
चेन्नई, मदुराई, कोईम्बतूर, करुर, कांचीपुरम्, रामनाथपुरम् सारख्या शहरांमधून हजारो नवतरुण रस्त्यावर शांततापूर्वक आंदोलन करीत आहेत. चेन्नईच्या मरिना समुद्रकिनार्‍यावर हजारो आंदोलक युवक-युवती रात्रभर रेतीवर झोपले. मात्र, सातत्यपूर्ण आंदोलनात त्यांनी खंड पडू दिला नाही. लहान मुले, वृद्ध, महिला सर्वजण या विषयावर आंदोलनात सहभागी झाले आहेत. जलिकट्टूवरील बंदी म्हणजे तामिळ स्वाभिमानावर प्रहार, असे ते मानत आहेत आणि त्यातील काही अतिरेकी तत्त्व या मुद्याला उत्तर भारताचा साम्राज्यवाद, असे वळण देण्याचा अथवा जलिकट्टूवरील बंदी म्हणजे तामिळ अस्मितेवर प्रहार, असे प्रस्तुत करण्याचा विकृत प्रयत्न करीत आहेत.
कुठलेही, कुणाचेही नेतृत्व नसताना, कुठलीही संघटना पाठीशी नसताना, कुठलाही राजकीय पाठिंबा वा राजाश्रय नसताना तामिळ युवक स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या संख्येत या आंदोलनात उतरले आहेत. या माध्यमातून आपला संताप व्यक्त करीत आहेत. भारतातील एका महत्त्वपूर्ण क्षेत्रातील हिंदू सण, उत्सव न्यायालये ठरविणार काय? असे आदेश अन्य धर्मांच्या संदर्भात न्यायालये देऊ शकतील काय? जलिकट्टूबाबत न्यायालय जी चौकट आखून देईल, जी रूपरेषा ठरवून देईल वा ज्या अटी ठेवेल त्या मान्य करून त्याप्रमाणे सण साजरा करण्याची तयारी तामिळ समाजाने दर्शविली असताना त्यांना ती परवानगी का मिळत नाही?
सर्वोच्च न्यायालयाने दहशतवादी याकूबच्या वकिलांची बाजू ऐकून घेण्यासाठी मध्यरात्रीनंतरही आपली दारे उघडली होती. पण, संक्रांतीच्या वेळी साजरा होणार्‍या जलिकट्टू या मोठ्या सणासंदर्भात सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. स्वदेशी, ग्रामीण व इंग्रजी न जाणणार्‍या लोकांना न्याय मिळणे एवढे कठीण व अशक्यकोटीतले का करून ठेवण्यात येत आहे? याचे काय परिणाम होऊ शकतात, याची संबंधितांना कल्पना तरी आहे काय? या गोष्टीचे कुणाला भय वाटत आहे.
बैल अथवा नंदीची हिंदू पूजा करतात. याच्याशी महादेव, बलराम यांच्यासारख्या अवतारांचा संबंध आहे. बैलांचे पालनपोषण करून त्याला खेळासाठी तयार केल्याने बैलांची देशी जात बलवान होते. कारण स्वदेशी वाणाच्या बैलांमध्येच ती क्षमता असते. जलिकट्टू म्हणजे बैलांवर अत्याचाराचा खेळ असे जे समजतात त्यांना भारत म्हणजे काय हे समजलेच नाही, एवढेच नव्हे तर त्यांना या खेळाविषयी माहिती नाही. कारण, त्यांच्यावर पाश्‍चिमात्य राष्ट्रांचा मोठाच पगडा आहे. जे लोक अनिर्बंधपणे चिकन, मटन, गोमांस खातात त्यांना आपले सेक्युलर प्रयोग राबविण्यासाठी आणि विदेशात प्रसिद्धी मिळविण्यासाठी फक्त हिंदूंचे सण व त्यांचे विषयच दिसतात. अन्य धर्मातील अतिशय क्रूर अशा प्राणी-हत्येविषयी त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही.
भारतात विदेशी वंशाचे (वाण) बैल अधिकाधिक उपयोगात यावेत तसेच देशी बैलांऐवजी येथील शेतकर्‍यांनी यांत्रिक पद्धतीने शेती करावी या उद्देशाने विदेशी कंपन्या पेटासारख्या संस्थांचा उपयोग करीत असल्याचे तामिळनाडूतील ख्यातनाम शिक्षक राम सुब्रमण्यम यांनी सांगितले. जलिकट्टू किती प्राचीन खेळ आहे याचा अंदाज सिंधू नदीच्या खोर्‍यातील मोहेनजोदडो येथे आढळलेल्या अवशेषांवरून करता येऊ शकतो. येथे आढळलेल्या अवशेषांमध्ये जलिकट्टूची मुद्रा, नाणीही आढळली होती. इ. स. पूर्व दुसर्‍या शतकातील संगम साहित्यात जलिकट्टूची तपशीलवार माहिती आहे. शूर व धाडसी लोकांचा खेळ, असे वर्णन करीत ब्रिटिशांनी या खेळाला मान्यता दिली होती.
अशा परिस्थितीत देशातील अन्य भागातील जनतेने तामिळी जनतेच्या भावना समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे. वर्षानुवर्षे तामिळनाडू भाषा, प्रांतवाद आणि पृथकतावादाच्या आगीत होरपळत आहे. एवढीशी ठिणगी तेथे भयानक आगीचे रूप धारण करू शकते. गेल्या वर्षी महान तामिळ संत तिरुवल्लुवर यांचा पुतळा हरिद्वार येथे नेण्याविरुद्ध तामिळनाडूतील काही असामाजिक तत्त्वांनी उत्तर भारतीयांविरुद्ध भावना भडकविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोदी सरकार आणि जयललिता यांनी हस्तक्षेप केल्याने हरिद्वार येथे पुतळ्याची स्थापना झाली आणि प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले नाही.
भारतातील संतांनी देशाची एकता व अखंडता अबाधित राहील याची नेहमीच दक्षता बाळगली आहे. त्यासाठी देशाला नेहमीच शक्तिसंपन्न केले आहे. आद्य शंकराचार्य दक्षिणेतील होते. तर सुब्रह्मण्यम भारती, राजा चोल, चेर, पांडयन, कृष्णदेवरायच नव्हे भारतीय संगीत आणि मंदिरांची भव्य परंपरेचा दक्षिण भारत हाच स्रोत राहिला आहे. तेथील संवेदनशील मन एका परंपरेवरील विदेशी विचारांच्या आघातांमुळे तुटू नये याविषयी सावधनगिरी बाळगायला हवी. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होतील व ते राष्ट्रीय एकतेसाठी हानिकारक ठरतील.
– तरुण विजय