ज्याचे त्यानेच ठरवावे!

0
150

कटाक्ष
एखादी दुर्दैवी घटना घडली की आम्ही विचलित होतो. दु:खी होतो. अस्वस्थही होतो. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया वैयक्तिकही असते अन् सामूहिकही. अनेकांना संतापही अनावर होतो. संतापाच्या भरात काही जण काहीबाही बोलतात. नंतर त्यांना आपल्या बोलण्याचा पश्‍चात्तापही होतो. कधी अपघात घडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात, तर कधी नदीत बोट उलटून अनेकांना जलसमाधी मिळते. कधी एखाद्या मंदिरात चेंगराचेंगरी होते, तर कधी सार्वजनिक कार्यक्रमात ढकलाढकली होऊन जीव गुदमरतो अन् मृत्यू येतो. कधी विषारी वायूमुळे जीव गुदमरल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात, तर कधी एखाद्या इमारतीत लागलेल्या आगीत आमचे बांधव होरपळून मरतात. या व अशा प्रकारच्या घटना घडल्या की आम्ही हळहळ व्यक्त करतो. वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित होतात. कधी सरकारच्या बेजबाबदारपणावर आसूड ओढले जातात, तर प्रसंगी ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चुकांवर बोट ठेवले जाते. पण, सगळ्यात दुर्दैवी बाब ही की या सगळ्यातून आम्ही काहीच धडा शिकत नाही. पुढची घटना घडेपर्यंत आम्ही बेसावध राहातो. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
माणसाला मन असते, मनात भावना असतात, या भावना कधी आनंद देणार्‍या असतात, तर कधी विचलित करणार्‍या. माणसाचं मन तसंही अस्थिर असतं. या अस्थिर मनाला आणखी अस्थिर करणार्‍या घटना घडल्यात की मग समाजापुढे एक नवे संकट उभे ठाकते. विचलित होणं, अस्वस्थ होणं हा माणसाचा स्वभावच आहे. आपण कधी आनंदी असतो, कधी दु:खी होतो, तर कधी आपल्या मनात संमिश्र भावना असतात. एकाच दिवसात आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो. असे असले तरी व्यक्तिश: प्रत्येकाने आणि संपूर्ण समाजाने एक निर्धार केला पाहिजे. जी घटना घडते, त्यातून बोध घेत त्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. नव्या प्रकारची घटना घडू शकते. तिला तोंड देण्याची आपली तयारी असली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे तर आम्ही घेतलेच पाहिजे. घडलेल्या घटनेतून बोध घेऊन पुढची वाटचाल करायला शिकले पाहिजे.
आपल्याकडे कचरा जाळण्यास मनाई आहे. कचरा जाळू नये असा निर्णय कोर्टानेच दिला आहे. कचरा जाळल्याने धूर होतो, त्यामुळे प्रदूषण होते, श्‍वास घेण्यास त्रास होतो, श्‍वसनाचे आजार होतात, त्यातूनच मग फुफ्फुस निकामी व्हायला सुरुवात होते. हे सगळे माहिती असतानाही आम्ही कचरा जाळतो, नियमांचे उल्लंघन करतो, धूर तयार करतो अन् प्रदूषण वाढवतो. राजधानी दिल्लीत सगळ्यात जास्त धुके असते. हे धुके हरयाणा आणि पंजाबमध्ये पिकांना पाणी दिले जात असल्याने निर्माण होते, असे सांगितले जाते. पण, त्याचबरोबर तिथल्या शेतांमध्ये जो कचरा जाळला जातो, त्याचा धूर दिल्लीपर्यंत येतो. दिल्लीच्या आकाशात प्रदूषण पसरते. या प्रदूषणाचा फटका सरतेशेवटी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाच बसतो. यंदाच्या मोसमात आपण पाहिलेच आहे की, धुके आणि धुरामुळे दृश्यता कमी होती. त्याचा परिणाम रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही झाला. दररोज अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या. विमानांची उड्डाणं रद्द झाली. रस्त्यांवर अपघात घडून त्यात निष्पाप लोकांचे जीव गेले. ज्यावेळी पंजाब-हरयाणातले शेतकरी पिकांचे अवशेष जाळत होते, त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर आम्ही तत्कालिक चिंता व्यक्त केली. पण, जसे धुराचे आणि धुक्याचे साम्राज्य दूर झाले, आम्ही पुन्हा निश्‍चिंत झालो. आमची बेचैनीही दूर झाली. आमची अस्वस्थताही संपली. आमची चिंताही मिटली. आमच्या चिंतेच्या सगळ्या भावना अनंतात विलीन झाल्या.
आता गेल्याच आठवड्यात पाटणा येथे नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत २० लोकांचा मृत्यू झाला. या २० लोकांच्या आत्म्याला शांती मिळण्याआधीच ही घटना आमच्या विस्मरणात जाईल. पण, बोटीची जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा जास्त लोकांनी त्यात बसू नये, हा धडा आम्ही यातून शिकत नाही. देशाच्या कुठल्यातरी भागात पुन्हा अशी एखादी बोट दुर्घटना होईपर्यंत आम्ही निश्ंिचत असतो. एखाद्या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडू शकते याचा अंदाज आम्हाला कधीच येत नाही. कारणही नाही. अशा ज्या दुर्घटना घडतात, त्या जर आम्ही स्मरणात ठेवल्या अन् त्यातून काही धडा घेतला तर अशा घटनांची पुनरुक्ती टाळता येऊ शकते. कधी वर्षभरापूर्वी बांधलेला पूल वाहून जातो, तर कधी वेगात धावणारी रेल्वे गाडी रुळावरून घसरते, तर कधी दुसर्‍या गाडीवर जाऊन आदळते. देशात अशी असंख्य गावे आहेत, जिथे दरवर्षी नद्यांना पूर येतो आणि ही गावे पाण्याखाली जातात. पुराची दृश्ये आम्ही टीव्ही वाहिन्यांवर बघत असतो. बघताना आमच्या काळजाचा ठोकाही चुकतो. काही क्षण आम्ही आमच्या सुरक्षित असलेल्या घरात जीव मुठीत घेऊन बसतो. पूरग्रस्तांविषयी चिंता व्यक्त करतो. पण, चार दिवसांनी सगळे काही विसरून जातो. पुन्हा पुढची घटना होऊन मन विचलित व्हावे, याची वाट तर आम्ही पाहात नाही ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
घटना घडल्यानंतर विचलित होणे आणि पुन्हा सर्व काही विसरून पुढली वाटचाल करीत नवी घटना घडल्यानंतर विचलित होणे ही आमची सामूहिक ओळख झाली आहे जणू. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताच्या अनेक घटना घडतात. दोन-तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ या रस्त्यावरून प्रवास करीत होत्या. त्यांच्या डोळ्यांदेखत एक अपघात होता होता राहिला. अपघात घडला असता तर दहापेक्षा जास्त बळी गेले असते, या भावनेनेच त्या संतप्त झाल्या. या रस्त्यावर टोल नाके आहेत. टोल वसूल केला जातो. तरीसुद्धा प्रवाशांच्या जीविताची काळजी का घेतली जात नाही, असा संतप्त सवाल सिंधुताईंनी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना केला. सिंधुताईंच्या भावना आपण जरूर समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या भावनांची कदरही केली पाहिजे. पण, एक प्रश्‍न उपस्थित होतो तो असा की- या रस्त्यावर अपघात होतात, याला फक्त हा रस्ताच जबाबदार आहे काय? गाडी चालविणार्‍यांची काहीच जबाबदारी नाही? आधी जे अपघात घडलेत, त्यावरून कोणीच काही धडा घ्यायचा नाही? गाडीचा वेग नियंत्रित करता येईल अन् गाडी सुरक्षित थांबविता येईल, एवढाच वेग असायला नको? गाडी चालवीत असताना आपण पूर्णपणे तंदुरुस्त असायला हवे, मदिरेच्या आहारी गेलेलो नसावे. आपण जे वाहन चालवीत आहोत, त्या वाहनाचा ब्रेक उत्तम आहे, टायर्स चांगले आहेत, इंजिनात कोणत्याही प्रकारचा बिघाड नाही, रात्रीच्या वेळेस वाहन चालवायचे असल्याने वाहनाला लागलेले लाईट्‌स ठीक आहेत काय, बॅटरी काम करते आहे का, या सगळ्या बाबी तपासून घेण्याची जबाबदारी कोणाची?
चार-पाच दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशात एक अपघात घडला. एटा जिल्ह्यातली ही घटना आहे. अपघात अतिशय भीषण होता. एक डझनापेक्षाही जास्त शाळकरी मुलं या अपघातात मृत्युमुखी पडली. मृत्यू अकाली असल्याने मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळला. जग पाहण्याआधीच ही मुलं आपल्यातून निघून गेली. कुटुंबीयांसोबतच संपूर्ण समाजमनही हळहळलं. या घटनेमुळे प्रत्येकाला दु:ख झालं. समाजमन विलचित झालं. आता ही घटनाही आपल्या विस्मरणात जाईल. कारण, तोपर्यंत एखादी नवीन घटना घडलेली असेल. आपला जन्म फक्त विचलित होण्यासाठीच आहे काय, याचा विचार आता गांभीर्याने करावा लागणार आहे. विचलित होऊन आपण त्यातून काहीच शिकणार नसू, तर सतत विचलित होत राहू आणि निष्पाप जीव गमावत राहू. दुसरे काय? एटा जिल्ह्यात घडली, तशा अनेक घटना यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. त्यावरून जरी बोध घेतला असता, तरी एटाची घटना टाळता आली असती. पण, बोध घ्यायचाच नाही असा निर्धार आम्ही केला असेल, तर ईश्‍वरही आम्हाला वाचवू शकत नाही.
आम्ही कोणत्याही घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया देतो. समाजमन भडकविण्याचा प्रयत्न करतो. अराजकता निर्माण होण्यास हातभार लावतो. अव्यवस्था निर्माण करण्यासही आम्हीच कारणीभूत असतो. आम्हीच उन्मादही माजवतो. आम्हीच गोंधळही करतो. गदारोळही आम्हीच माजवितो. आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल. राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही अतिशय ओंगळवाणे प्रदर्शन घडवितो. जेवढे म्हणून नियमांचे उल्लंघन करता येईल, तेवढे आम्हीच करतो. मरणशीलता आम्हीच ओढवून घेतो. आमची समाजव्यवस्था आम्हीच बिघडविली आहे. सगळीकडे अस्तित्वासाठी संघर्ष चालला आहे. जिवंत राहाण्यासाठी लढाई चालली आहे. जे दुर्बल आहेत, ते या लढाईत पराभूत होणार नसले, तरी त्यांचे जीवनमान निश्‍चितपणे कमी गुणवत्तेचे असणार. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. योग्य निर्णय घेतला. काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. पण, काही नतद्रष्टांनी या निर्णयाला विरोध करून देशभर गदारोळ माजविला. अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी विरोध केला. त्यांनी असे करण्यामागे काय हेतू होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे प्रगतिपथावर वाटचाल करायची की स्वत:ला अधोगतीच्या खाईत लोटायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
– गजानन निमदेव