मोदींची अलक्ष्मी नि:सारण मोहीम!

0
134

रविवारची पत्रे
वर्षाचे बाराही महिने आम्ही त्या त्या विशिष्ट तिथीचे सण/उत्सव साजरे करतो. पण आश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार्‍या दीपोत्सवाची मजा काही वेगळीच. त्यातही अमावास्येचे महत्त्व अनन्यसाधारण. अन्य अकरा अमावास्या शुभकार्यासाठी वर्ज्य किंवा अशुभ समजल्या जातात. दिवाळीची आवस मात्र याला अपवाद. ही तिथी शुभ असते. त्या दिवशी सायंकाळी आम्ही लक्ष्मी-कुबेर पूजन करून अलक्ष्मीचे नि:सारण करतो. तिला जीवनातून हद्दपार करतो. श्रीलक्ष्मीदेवी आणि कुबेर या सुख, समृद्धी, संपन्नता देणार्‍या देवतांचे आवाहन करून विधीपूर्वक पूजन करून त्यांना मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद श्रद्धापूर्वक भक्षण करतो. दीप प्रज्वलन, सभोवती विजेच्या दिव्यांच्या माळा लावून घर आणि परिसर सुशोभित करतो.
अलक्ष्मी ही विष्णुपत्नी लक्ष्मीची सख्खी भगिनी. पण दोघींच्या स्वभावात महदंतर. लक्ष्मी शुभ, मंगल, सुबत्ता देणारी, तर अलक्ष्मी अवलक्षणी, अपशकुनी, नकारात्मक ऊर्जा पसरवणारी, दु:खदा, ज्याच्या घरी तिचा वास असेल त्याचे वाटोळे करणारी आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. शांती नष्ट होते. तो द्रव्यप्राप्तीसाठी अनीतीच्या मार्गांचा अवलंब करतो आणि अखेर मोठ्या संकटात सापडतो. त्याची जगात अपकीर्ती होते. संभावित माणसाला अकीर्तीही मरणाहून अधिक त्रासदायक ठरते. (संभावितस्यच अकीर्ति: मरणाादपि अतिरिच्यते) अशी बयेची किमया. म्हणून तिच्याशी विवेकी माणसाने कधीही सख्य वा दुष्मनी करू नये. कारण, म्हणतात ना, दुर्जनेन सह सख्यं, द्वेषंचापि न कारयेत्‌| उष्णो दहति चाङ्‌गार: शीत: कृष्णायते करम्‌॥
लक्ष्मीपूजनाच्या दुसर्‍याच दिवशी बलिप्रतिपदा येते. ही तिथी सुद्धा माणसाचे भले करण्यास मदत करते म्हणूनच ‘इडापिडा टळो अन् बळीचे राज्य येवो’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.
अवलक्षणी अभद्र अलक्ष्मीचे गेल्या तीस ऑक्टोबर रोजी घराघरातून नि:सारण झाल्याच्या आठच दिवसांनी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर तिचे उच्चाटन करण्याचा संकल्प सोडला. तो सुद्धा पूर्ण विचाराअंती. या निर्णयाच्या परिणामांचा साकल्याने, साधकबाधक अंदाज घेऊन आणि तो जागतिक इतिहास घडविणारा निर्णय त्यांनी जाहीर केला. तद्नुसार ८ नोव्हेंबर २०१६ पासून ५०० आणि १००० रु. च्या नोटा चलनातून निष्कासित करण्यात आल्या. तेव्हा या दळभद्र्या अलक्ष्मीचे स्वामी हादरले. पण मोदींनी त्यांचाही सहानुभूतीने विचार करून हरामची, अवैध कमाई-संपत्ती घोषित करण्याच्या बदल्यात शासनाने त्यांना काही सवलती उपलब्ध करून दिल्या. यापुढे स्वत:च्याच देशात चोरासारखे तोंड लपवून दिवाभितासारखे फिरण्यापेक्षा काही अटी स्वीकारून (काळ्यावर हेवी टॅक्स काही रक्कम सरकारच्या योजनांमध्ये गुंतवणे आदी) काळ्याच्या पापापासून मुक्त होण्याची त्यांना अखेरची संधी मिळाली. अनेकांनी तिचा लाभ घेऊन ते चिंतामुक्त झाले. पण काही निगरगट्ट तरीही बधले नाहीत. त्यांनी विपक्षाच्या मदतीने मोदींविरुद्ध काहूर माजवले. पण जनसेवेचे कंकण बांधलेल्या नरेंद्र मोदींनी विसाव्या शतकातील नरेंद्र विश्‍वनाथ दत्त यांनी (जणू स्वामी विवेकानंदच ते) ‘इंडिया व्हर्सेस ब्लॅक मनीचे’ आपले अभियान अधिक नेटाने चालवले, लोकहिताच्या नवनवीन योजना सुरू केल्या. कारण ‘वरं जनहिते ध्येयं न केवला जनस्तुति:’ या सावरकरांच्या उक्तीवर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. त्यांच्या प्रयत्नांना लोकांकडून उत्तम प्रतिसादही मिळत आहे. अलीकडील निवडणुकांत भाजपाला मिळालेले भरघोस यश याची साक्ष देत आहे. अत्युच्च ध्येयाने झपाटलेल्या या महामानवाला सर्वतोपरी साह्य करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. कारण त्याचा लाभ आपल्यालाच होणार आहे. मोदीजी तर ‘अनपेक्ष: शुर्चिदक्ष:’ असे फकीर आहेत.
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०७२७

लोक काय म्हणतील…
मंदा माझी गृहकृत्ये करणारी मदतनीस! अल्पशिक्षित पण टापटिपीने राहणारी, नीटनेटके घर ठेवणारी सुजाण व्यक्ती. साधारणपणे निम्नमध्यमवर्गीयांमध्ये अभावानेच आढळणारा मंदाचा एक गुण माझ्या लक्षात आला जेव्हा तिच्या मुलाचे लग्न ठरले.
तिने मोजून ५० लोकांना आमंत्रित केले तेही तोंडी. त्यामुळे पत्रिकेचा खर्च वाचला. आर्य समाज पद्धतीने लग्न, त्यानंतर वर्‍हाडी मंडळींना साधे जेवण व एक गोड पदार्थ! सुनेला दोन छान साड्या आणि एक मणिमंगळसूत्र, मुलाला नवीन कपडे व बूट! सगळ्यांनी आपआपले नवीन कपडे केले. कोणतेही देणे-घेणे नाही! मात्र, ज्या मंडळींनी आग्रह धरला की ‘आम्हाला नवविवाहित जोडप्यास काही द्यायचे आहेच’ त्यांना सांगितले की त्या पैशातून एक लॅपटॉप घेऊन द्यावा जेणेकरून त्या दोघांनाही त्याचा कामाकरिता उपयोग करता येईल. तिने दोन्ही पक्षांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविले.
बहुतांशी आपण लोक काय म्हणतील या भावनेने पछाडलेले असतो. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या उक्तीप्रमाणे तुम्ही काहीही केले तरी… असो. या एका वाक्यापायी आपण सण समारंभात झेपणार नाही एवढा खर्च करीत असतो. या अट्टहासापायी सध्या लग्नसमारंभ ४-५ दिवस साजरे होतात. कुळाचार, मेहंदी, संगीत, सीमान्त पूजन, लग्न, रिसेप्शन! त्यात रंगसंगती असलेला ड्रेस कोड, मेन्यूमध्ये १५-२० पदार्थ, ४-५ गोड पदार्थ अशी रेलचेल असते. कधी कधी भजन संध्या व कॉकटेल पार्टीचा जल्लोषही असतो. यामध्ये कोणत्याही बाजूचा का असेना पैशाचा धूर होतो.
तर मंडळी! हौस-मौज करू नये असे नाही किंवा या मंगलप्रसंगांच्या आठवणी नसाव्यात असेही नाही. मात्र, खर्चाचा व सार्‍या हौसमौजेचा एक ताळमेळ असावा.
छोटेखानी समारंभ आवश्यक विधी-संस्कार जरूर करावेत. मात्र, देणे-घेणे, मान-पान, परतीचा अहेर वगळल्यास समारंभ सोपा सुटसुटीत होतो. या सार्‍या जंजाळातून उभय पक्षाची मुक्तता होते आणि खर्‍या अर्थाने एक नव-विवाहित जोडप्याला त्याचे नवीन आयुष्य कसे जगायचे याचा वस्तुपाठ दिला जातो. तर परिवर्तनाची मशाल हातात असणार्‍या सावित्रीच्या लेकींनो चला, उठा या दिशेने दमदार पावले टाकू या!
रश्मी वाघमारे
९९७०१७५२८०

रागावर नियंत्रण हवे
पत्नीच्या हातातून चहा सांडला व पतीने तलाक शब्द तीन वेळा म्हणून तलाक दिला. लहान मुलाचा अंगावर चहा सांडला. राग आला असेल, परंतु त्याने मुलासह पत्नीला हाकलून दिले. नंतर त्याला वाईट वाटले. परंतु धनुष्यातून बाण सुटला होता. रागामुळेच कैकेयी वाईट ठरली. पतिसुखाला पारखी झाली. पती-पत्नीचे नाते इतके तकलादू आहे का, की तीन शब्दांमुळे ते संपुष्टात येऊ शकते. सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया व्रत-वैकल्ये, उपास-तापास करतात. असे असताना, तिचे संसारातून तीन शब्दाने अस्तित्व संपते? पत्नीमुळे संसार फुलतो. दोन वेळ ताजे जेवण मिळते. ती क्षणाची पत्नी असली तरी जन्माची माता आहे. तुमच्या जीवनाचा, संसाराचा ती आधारस्तंभ आहे. सरकारने कितीही कायदे केले तरी जोपर्यंत आपण ते अमलात आणत नाही तोपर्यंत त्या कायद्याला अर्थ नाही. रागावर नियंत्रण नसल्यामुळे कुटुंबात, समाजात अनेक दुर्घटना घडतात. म्हणूनच राग आला तर उलटे पाढे म्हणावे असे सांगतात. जीवनाला अध्यात्माची जोड द्यावी. राग विनाशाला कारणीभूत ठरतो. होत्याचे नव्हते करतो. म्हणूनच रागावर नियंत्रण हवे.
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

डोके ठिकाणावर आहे का?
महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर समजल्या जाणार्‍या, पुरोगामी विचारसरणी असणार्‍या पुणे शहरातील संभाजी उद्यानात महाराष्ट्रातील प्रख्यात नाटककार व साहित्यसम्राट राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडला आणि त्याचे मुठा नदीपात्रामध्ये विसर्जन केले. ही घटना राजकारणातील असहिष्णुता किती खालच्या स्तरावर जात आहे, याचा प्रत्यय एक मराठी नाट्यरसिक म्हणून माझ्या मनाला उद्विग्न करणारी आहे. नाटककार गडकरी यांचा पुतळा तोडण्याचे कारण काय तर म्हणे, गडकर्‍यांनी त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातून संभाजी राजांचा अपमान केला, असा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे. ‘राजसंन्यास’ हे नाटक गडकरी यांनी १९१७ साली लिहिले होते. आज २०१७ म्हणजे तब्बल १०० वर्षांनी त्या नाटकातील अपमानजनक शब्दांची जाणीव कार्यकर्त्यांना झाली, याचे मला फार आश्‍चर्य वाटते. संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात गडकर्‍यांचा पुतळा तोडून आपला राग शांत केला. हे कृत्य त्यांनी राग शमवण्यासाठी केले की निव्वळ प्रसिद्धीसाठी केले हे एक न उलगडणारे कोडे आहे; असे मला वाटते. ज्या पापी औरंगजेबाने संभाजीराजांना हालहाल करून मारले, त्यासंबंधी संभाजी ब्रिगेड का बोलत नाही? रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राच्या प्रतिभासंपन्न साहित्यसम्राटाचा पुतळा हटवितात तेव्हा अशा कार्यकर्त्यांची मला कीव करावीशी वाटते. हे कृत्य करणार्‍या लोकांचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्‍न माझ्यासारख्याच्या मनात निर्माण होतो.
प्रा. नरेश तम्मेवार
नागपूर

स्त्री-शक्तीचा जागर
प्रपंच, परंपरा जोपासून प्रबल इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्तीच्या बळावर देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य करणारी मातृशक्ती, हे या भारत देशाचं वैभव आहे. स्त्री ही कुटुंबाची, समाजाची अन् पर्यायाने राष्ट्राची विश्‍वस्त आहे. याची प्रचीती, अनुभूती प्रतापनगरातील श्री दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थानातील अनमोल स्त्री सहभागातून प्रकर्षाने जाणवत आहे.
परिस्थितीनुसार प्रापंचिक जबाबदार्‍या सांभाळून सहजसुलभ व सहजसाध्य अशा ईश्‍वरसेवेतून भगवंताशी अनुसंधान साधून मनाला शांती, समाधान व आत्मानंद देणारी भक्ती उपासना, साधना बघून इतरेजनांना क्षणभर का होईना, भावविश्‍वात गेल्याचा आनंद होतो. श्री दुर्गादेवी मंदिर हे आज ज्ञान-भक्तिपीठासोबतच स्त्री-शक्तीचे उल्लेखनीय केंद्र झाले आहे.
प्रमिला भांडारकर, मंगला भट, पद्मावती काळे, सुलभा पाठक, शोभना दिवे, मालती दिवाळे, लीलाताई वैद्य, विमल दक्षिणदास, मंदाकिनी पुरोहित या माता-भगिनींनी ३ वर्षांपूर्वी लावलेलं भक्ती उपासनेचं इवलंस रोपटं परिसरातील असंख्य स्त्री भक्तांच्या सक्रिय योगदानाने विशाल वृक्षात परिवर्तित झालं आहे. नवरात्र महोत्सव, देवतांचे वर्धापन दिन, इतर धार्मिक, आध्यात्मिक उपक्रमात श्रद्धाळू माता-भगिनी आपली निरपेक्ष, निःस्वार्थ सेवा मनोभावे, श्रद्धेने व निष्ठेने सदासर्वदा देत आहेत. मंदिराच्या दैनंदिन सुचारू व्यवस्थापनात माधुरी पडोळे, स्वाती साठे, स्नेहा काळे, सुषमा मुळे या महिला विश्‍वस्तांचा सिंहाचा वाटा आहे. भरीव योगदान आहे. दर मंगळवारी, शुक्रवारी, एकादशी महोत्सवात सर्व देवदेवतांना वस्त्रालंकाराने सुशोभित करणे, फुलांची सुबक-मोहक आरास करून देवतांच्या सौंदर्यात भर घालणे. प्रसन्न व विलोभनीय वातावरण निर्माण करणे. स्त्री भाविकांना पूजा-अर्चा-ओटी व भक्तीच्या इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या भक्तिभावनांना हळुवार जोपासणे या सेवा नित्यनियमाने सदासर्वकाळ तन्मयतेने व सेवाभावाने देत आहेत.
स्त्री-शक्तीचा आविष्कार येथेच थांबत नाही, तर नुकतेच स्वकर्तृत्वावर अभिनव अशा महिला भजन स्पर्धेचे यशस्वी रीत्या दिव्य व भव्य आयोजन, संचालन, व्यवस्थापन करून सर्वगुणसंपन्न मातृशक्ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा तसूभरही कमी नाही, याचा अभिमान वाटावा, असा अनोखा आगळावेगळा परिचय दिला आहे. याबद्दल या चारही संयोजिकांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक!
‘धन्य भारतीय नारी सर्व जगाला तारी’ सुसंस्कृत, संस्कारित, चारित्र्यंसपन्न भावी पिढीची ‘मातृशक्ती’ ही कृतार्थ माता होईल, यात तिळमात्र शंका नाही. या स्त्री-शक्तीला मानाची वंदना. अभिवादन!
दिगंबर शं. पांडे
९४०३३४३२३९

कमलाताईंना श्रद्धांजली
श्रीमती कमलाताई पांढरीपांडे यांची निधनवार्ता वर्तमानपत्रात वाचली आणि त्यांच्या सहवासातील सर्व स्मृती जागृत झाल्या. भंडारा येथील रा. से. समिती कार्याची धुरा सांभाळणार्‍या त्या एकनिष्ठ सेविका होत्या. माझा त्यांचा सहवास बैठकी आणि वर्गावर सर्वाधिकारी असताना जास्त व्हायचा. आठ दिवस एकत्र राहिल्यामुळे दिलजमाई पण चांगली व्हायची. त्या प्रेमळ, मनमिळावू, कष्टाळू, कवयित्री, शिक्षिका त्याही पुरस्कारप्राप्त आणि समितीप्रमुख. मग काय सततच लहान मोठ्या सेविकांचा त्यांच्या भोवती गराडा राहात असे. त्यांचे सर्वांशी नाते बहिणीचे किंवा मावशीचे असे. लोकप्रिय सेविका हेच बिरुद त्यांना द्यावं लागेल. इतकेच नव्हे तर वर्गावर मुलींचे येणारे पालक शिक्षित नसतील पण त्यांचे सहकार्य इतके असे की बघणार्‍याला असे वाटे यांचे संबंध किती वर्षांचे असावे. त्याचा प्रत्यय मला वर्गावर खूपदा आला. त्यांचा संवाद चालू असे- कमलाताई सांगायच्या वर्गाला तांदूळ, पोहे, मुरमुरे, कणीक यांची गरज आहे. लगेच त्या पालकांच्या तोंडून निघत असे ‘सांजच्याले पाठवतो ना जी. किती पाहिजे तेवढं सांगा.’ मी तर या गोष्टी ऐकून अवाक् होत असे आणि मनात विचार यायचा काय जादू आहे कमलाताईंजवळ. तोंडून निघायचीच देर की लोक द्यायला तयार असत. कमलाताई पण मुलींवर खूप मेहनत घेत असत. त्यांचे जीवन तर कष्टाचे गेले, पण पुढील पिढीकरिता संस्कारांची शिरोदी त्यांनी भरपूर दिली असं वाटतं. या कार्याकरिता भंडारा आता पोरका झाला. आम्ही दोघी वर्गावर सात दिवस एकत्र राहात होतो. त्यामुळे समिती कार्याचा विचारविनिमय, हास्य, विनोद, यात दिवस केव्हा संपत याचा पत्ताच लागत नव्हता. वर्गावर देखील वेळेचे नियोजन, बौद्धिकचे विषय आणि हस्तकला यावर त्यांचे विशेष लक्ष असे. त्यांच्याबरोबर जोगळेकर, किंजवडेकर, पदवाड, दिवाकर यांचाही सहभाग तितकाच असे. मागच्या वर्षी नागपूरला मी आणि माई दाबके भेटून आलो त्यावेळी अशी वेळ येईल म्हणून कल्पना देखील आली नाही. त्यांची दृष्टी क्षीण झाल्यामुळे त्या आता बाहेर जात नसत म्हणून आम्हीच भेटून आलो. ‘उपजे ते नासो…’ हा नियम सर्वांसाठीच आहे. त्याकरिता साश्रू नयनांनी ही शब्द पुष्पांजली समर्पण.
डॉ. वनमाला क्षीरसागर
नागपूर