आरक्षण आणि संघाची भूमिका

0
196

मंथन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी आरक्षणाबाबत एक भूमिका मांडली. काही विषय असे आहेत की, देशातील कोणत्याही निवडणुकांच्या तोंडावर त्या विषयाबाबत वाद निर्माण करण्याची प्रसारमाध्यमांना खुमखुमीच असते. विशेषत: रा. स्व. संघाच्या कुणी जर त्या विशिष्ट विषयाबद्दल कोणतेही विधान कोणत्याही बाजूने केले तरी त्या विधानाला वादग्रस्त बनवून देशभर आपल्याला हवा तसा वाद उत्पन्न करण्यात प्रसारमाध्यमे अत्यंत हिरिरीने पुढाकार घेतात. महाभारत युद्धात ‘नरो वा कुंजरोवा’ असे युधिष्ठिराने म्हणत असताना ‘नरो वा’ या शब्दानंतरचे पुढचे शब्द ऐकूच येता कामा नयेत यासाठी गदारोळ उठविला गेला. तसा गदारोळ आताही संपूर्ण सत्य समाजासमोर येता कामा नये यासाठी केला जातो. संघ आणि आरक्षण हा विषय अशाच पद्धतीने अर्धवट सत्य समाजासमोर घेऊन जात गदारोळ उठवून आपल्याला हवा तसाच लोकांसमोर वाद विषय बनवून मांडण्याचा आटापिटा चालला आहे.
डॉ. मनमोहन वैद्य यांनी दोन गोष्टी मांडल्या होत्या. एक म्हणजे, ‘‘जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत आरक्षण समाजात असलेच पाहिजे, पण आरक्षण ही काही कायमची व्यवस्था नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा ही बाब समाजातील वंचितांना समान संधीची स्थिती निर्माण होईपर्यंत असावी असे म्हटले होते.’’ दुसरा विषय त्यांनी मांडला तो अल्पसंख्यकांना आरक्षण देण्याबाबतचा. त्यात ते म्हणाले की, ‘‘अल्पसंख्यकांना आरक्षण देता कामा नये. ते दिल्यामुळे फुटीरतावादाला प्रोत्साहन मिळेल.’’
यातील अर्धसत्यच प्रसारमाध्यमांनी आधी सनसनाटी बातमी म्हणून पुढे आणले. निवडणुका समोर दिसू लागल्या की, संघविरोधक आणि सनसनाटीच्या मागे लागलेली माध्यमे संघाला वाद विषय करता येईल काय, यासाठी टपून बसलेले असतात. संघाला वाद विषय बनविले की त्याचा त्रास, नुकसान भारतीय जनता पक्षालाच होणार किंवा तसे ते नुकसान झाले पाहिजे, अशा दिेशेने हा वाद रंगविला जातो. डॉ. मनमोहन वैद्य यांच्या विधानाला असे अर्धवट, विकृत स्वरूपात समाजासमोर गदारोळ करत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वादविषयाचे दोन पैलू आहेत. दोन्हीबाबत संघाची भूमिका ठाम आहे. या वाद विषयात नंतर संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे व स्वत: डॉ. मनमोहन वैद्य यांनी नेमकी भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र, माध्यमे गैरसमज पसरविण्यात जास्त रस घेत असल्याने गैरसमज दूर करणारी विधाने, पत्रकार परिषदा, स्पष्टीकरण याला फारसे स्थान आणि महत्त्व देत नसतात. तसाच प्रकार या वाद विषयातही घडला आहे.
आरक्षण या विषयाचे दोन भाग आहेत. एक भाग आहे तो हिंदू समाजातील जो मागास वर्ग आहे त्यांना आरक्षण देणे आणि दुसरा भाग आहे तो अल्पसंख्यक म्हणून मुस्लिम, ख्रिश्‍चन यांची आरक्षणाची मागणी. या दोन भागातील व्यक्त झालेली दोन मते एकमेकात अर्धवट रीत्या घुसवून वाद निर्माण केले जात आहेत. या वादानंतरच्या पत्रकार परिषदेत आणि त्यापूर्वीही संघाने आरक्षणाबाबत एक भूमिका सतत स्पष्ट, नि:संदिग्ध आणि आग्रहीपणे मांडली आहे ती ही की, हिंदू समाजात एकेकाळी जन्मावर आधारित भेद करून दलित, ओबीसी, भटके यांना विकासापासून दूर ठेवले गेले. त्यामुळे समाजात विषमता, असमानता निर्माण झाली. यातील मागासवर्गाला अन्य समाजासोबत आणून ठेवण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. सामाजिक दोषामुळे निर्माण झालेेले भेद जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत मागासवर्गाला आरक्षण हे चालूच राहिले पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे. असे असले तरी आरक्षण शेवटी भेद संपेपर्यंतची एक तात्पुरती व्यवस्था आहे हे म्हटले तर आज आरक्षण बंद करण्याची संघाची इच्छा आहे, असे त्यातून ध्वनित होत नसते.
मात्र, संघ आरक्षणाच्या विरोधात आहे आणि जर संघाच्या विचारांचे लोक सत्तेमध्ये विराजमान झाले तर हे आरक्षण रद्द करणार, अशा प्रकारचा बागुलबोवा उभा करून त्यांना राजकीय गणितामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करायचा, हा माध्यमांचा आवडता छंद आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत संघाचे अधिकारी काहीही बोलले असले, तरी याच दिेशेने त्याला प्रसिद्धी देताना संघ आरक्षण विरोधात आहे, अशा प्रकारेच गदारोळ निर्माण करायचा, यासाठी माध्यमातील ही मंडळी टपलेलीच असतात. मनमोहन वैद्य यांच्या विधानातील बाकीचे संदर्भ टाळून फक्त आरक्षण हे तात्पुरते आहे, इतकाच विषय माध्यमांनी अत्यंत भडक पद्धतीने मांडण्याला सुरुवात केली. हा एकच वाद करून भागणार नाही असे लक्षात घेऊन दुसर्‍या विषयातही वाद उभा राहील, अशी चतुराई करण्यात आली. अल्पसंख्यकांचे आरक्षण याला संघाचा विरोध सुरुवातीपासून आहे. आरक्षणाच्या मूळ भूमिकेला हरताळ फासून केवळ निवडणुकांमधील तात्पुरते फायदे लक्षात घेऊन मल्टीकम्युनल राजकीय पक्ष अल्पसंख्यकांना आरक्षण देण्याची आश्‍वासने देतात, घोषणा करतात आणि घटनादत्त नसल्याने न्यायालयात टिकणार नाही हे माहीत असूनही तसे निर्णयही घेतात.
आरक्षणाची मूळ भूमिका, ज्यांच्यावर जन्मावर आधारित भेद करून संधी नाकारली गेली, समान सन्मान व संधी मिळाली नाही, अशा बांधवांना बळ देऊन आपल्या बरोबरीने समाजात प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण आहे. अल्पसंख्यक मुस्लिम यात कुठेही बसत नाहीत. एकेकाळी मोगल, आदिलशाही काळापासून ते रझाकारांच्या काळापर्यंत यांनी समाजावर अन्याय केले. सुलतानीच्या टाचेखाली समाजाला चिरडण्याची निर्दयी कृती हे मध्ययुगीन काळापासून करत आले. यांनी इतरांना विशेषत: हिंदूंना संधी नाकारली. अगदी अलीकडे हैदराबादच्या निजामाच्या कारकीर्दीत हैदराबाद संस्थानच्या क्षेत्रात लोकसंख्येचे प्रमाण हिंदूंचे जास्त होते, पण प्रशासनातील अधिकार्‍यांपासून सामान्य कर्मचार्‍यांपर्यंत नेमणुकात मुस्लिमांना मोठी संधी आणि नगण्य प्रमाणात हिंदूंना संधी होती. शिवाय रझाकारासारख्या लोकांनी तर लोकांना धमकावले, मारहाण केली, लुटले. त्यांना आरक्षण देण्याचा विचार करणे, घोषणा करणे हे अत्यंत चुकीचे आहे. याशिवाय गेली अनेक वर्षे देशासमोरची नव्हे, तर जगासमोरची एक महत्त्वाची समस्या बनलेला दहशतवाद कुणामुळे निर्माण झाला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘‘सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत, पण सगळे दहशतवादी मुस्लिम आहेत,’’ असे एक वाक्य संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी उच्चारले होते. यामुळे मुस्लिमांना आरक्षण देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणे आहे, अशी संघाची भूमिका आहे. मात्र, डॉ. मनमोहन वैद्य यांनी याच गोष्टी सांगताच संघ आरक्षणाच्या विरोधात आहे, असे भासविण्यासाठी संघ म्हणतो आरक्षण हे तात्पुरते आहे, असा गदारोळ केला. गदारोळाचा दुसरा भाग दोन स्वतंत्र विधाने अर्धवट जोडून आरक्षणामुळे दहशतवाद वाढतो, असे वाक्य तयार करण्यात आले. दलितांवर दहशतवादाचे खापर फोडत त्याला आरक्षणाचे कारण संघ जोडतो आहे, असा भास निर्माण करण्यात आला. वास्तविक, दलितांसाठी आरक्षण आणि मुस्लिमांसाठी आरक्षण हे दोन स्वतंत्र विषय आहेत. दलितांसाठी आरक्षण भेद संपेपर्यंत चालू राहिले पाहिजे, ही संघाची भूमिका आहे. ही भूमिका मांडून फक्त संघ गप्प बसत नाही, तर दलित बांधवांसाठी अनेक सेवाकार्ये करून आत्मीयतेने ही विषमता नष्ट करण्याच्या भूमिकेमागील प्रामाणिकता संघाने कृतीतून दाखवून दिली आहे. मात्र, तरीही संघ फक्त उच्चवर्णीयांचाच आहे आणि त्याचा आरक्षणाला विरोध आहे, असा गैरसमज पसरविण्याचा आटापिटा केला जातो. मुस्लिमांसाठी आरक्षणाला संघाचा विरोध आहे. मात्र, दोन विषयांची गल्लत करत संघाचा दलित आरक्षणाला विरोध असल्याचे, प्रचंड गदारोळ करून संघाच्या माथी मारण्याचे प्रयत्न केले जातात. डॉ. मनमोहन वैद्य काहीही विपरीत, चुकीचे बोलले नसतानाही त्यांची दोन स्वतंत्र विषयातील वाक्ये अर्धवट ठेवून, जोडून हा वाद निर्माण करण्यात आला. नंतर डॉ. मनमोहन वैद्य आणि दत्तात्रेय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाचा दलित आरक्षणाला विरोध नाही. उलट हे आरक्षण भेद संपेपर्यंत चालू राहिले पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे, हे स्पष्ट केले. मुस्लिम आरक्षणाला संघाचा विरोध आहे आणि दहशतवाद, आरक्षणाबाबतचे संघाचे मत मुस्लिम आरक्षणाशी संबंधित आहे, असे स्पष्ट केले आहे. मात्र, माध्यमे हा खुलासा बाजूला ठेवून गैरसमजाची, गदारोळाची अवस्था कायम ठेवण्याच्या प्रयत्नाला लागली आहेत. संघाची नि:संदिग्ध, नेमकी भूमिका समाजासमोर घेऊन जाण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनाच करावे लागणार आहे.
निवडणुका आल्या की, संघाच्या अधिकार्‍यांची विधाने विपर्यस्त करून त्यामधून राजकीय मतनिश्‍चितीवर परिणाम करण्याचा हा आटापिटा जनतेच्या लक्षात आणून दिला पाहिजे. तो एकदा लक्षात आला की, मग असली कारस्थाने यशस्वी होणार नाहीत.
– बाळ अगस्ती