क्रांती-योगी (भाग-२)

0
205

टेहळणी
मुंबईत राहून वकिली आणि वैद्यकीचा अभ्यास करताना अहर्निशपणे स्वराज्याचा विचार अण्णासाहेबांच्या मनात असे. त्यासाठी काय करता येईल याच गोष्टीचा त्यांना ध्यास लागला होता. त्यातून एक मार्ग गवसला. तो म्हणजे एखादा प्रांत जर हाती आला, तर चळवळीत काम करणार्‍या लोकांना आणि क्रांतीकारकांना तिथे वसवता येईल. एक छोटा का होईना, पण स्वराज्याचा तुकडा निर्माण होईल आणि पुढे तो मोठ्या कामगिरीचे क्षेत्र बनू शकेल.
त्याच काळात ब्रिटीशांची कर्ज फेडू न शकल्यामुळे हैदराबादच्या निजामाने वर्‍हाड प्रांत तोडून दिला होता. कर्जफेड करण्यात आली तर तो प्रांत निजामाला मिळण्यासारखा होता. निजामाचा मुख्य दिवाण सालारजंग होता. त्याच्याकडे अण्णासाहेबांनी संधान साधले. उत्तर हिंदुस्थानातील काही धनिक लोकांशी बोलणी करून त्यांना आपल्या बेताला अनुकूल करून घेतले. हैदराबादेत एक बँक उभारून तिच्यामार्फत दहा-बारा कोटींचे कर्ज निजामाला द्यायचे आणि ते त्याने स्वतःच्या कर्जफेडीसाठी वापरून वर्‍हाड प्रांत सोडवून घ्यायचा, अशी ती योजना होती. त्या वर्‍हाड प्रांतात आपल्याला अनुकूल असलेले लोक हाताशी धरून देशकार्य करावे असे अण्णासाहेबांच्या मनात होते. वर्‍हाड प्रांत मोकळा होताच त्यांच्या ताब्यात देण्यास सालारजंगाने अनुकुलता दाखवली. एकदा वर्‍हाड प्रांताचा कारभार हाती आला की देशासाठी कार्य करणार्‍या लोकांची मोठीच सोय होणार होती आणि कार्याला गती मिळणार होती. निजाम सरकार मोठे कर्ज काढण्याच्या विचारात आहे ही गोष्ट सर्वत्र पसरली. अनेक श्रीमंत लोक पुढे येऊ लागले. तथापित्या कर्जाला कोणतीही ब्रिटीश सिक्युरिटी नको अथवा ब्रिटीश मध्यस्थीसुद्धा नको अशी सालारजंगची अट होती. त्यामुळे अनेकजण बारगळले.
अर्थात अण्णासाहेब हे कोणी संस्थानिक अथवा सरदार नसल्यामुळे सालारजंग साशंक होता. एका तरुण हायकोर्ट वकिलावर कितपत विश्‍वास ठेवावा आणि इतकी मोठी रक्कम उभी करून एखादी बँक निर्माण करण्याइतकी या माणसाची पत आहे का, असे प्रश्‍न त्याच्या मनात निर्माण झाले. अखेर त्याने परीक्षा पहायचे ठरवले.कर्ज देऊ इच्छिणार्‍यांना त्याने एकत्र बोलावले आणि अत्यंत निकडीच्या कामाकरता सरकारला दोन कोटी रुपये हवे असल्याचे सांगितले. बहुतेकांनी मालकांना विचारून सांगतो अथवा ब्रिटीश सिक्युरिटी चालणार असेल तर लगेच पैसे देतो असे सांगून वेळ मारून नेली. अण्णासाहेबांच्या हस्तकांनी मात्र लगेच पैसे मिळतील, असे बिनदिक्कतपणे सांगितले. आपल्या कर्तबगार मालकाच्या हिमतीवर विसंबून त्यांनी शब्द देऊन टाकला. ताबडतोब तार पाठवून पैसे मागवून घ्या आणि मगच येथून उठा,असे सालारजंगने सांगितले.अण्णासाहेब मेडिकल कॉलेजमधून घरी आले तोच तार मिळाली. क्षणात त्यांनी डॉ.स्मिथना गाठले कर्जरकमेबद्दल सांगितले. स्मिथने दलाली मिळणार असेल तरच हे काम जमेल असे सांगितले. त्याला होकार देऊन त्याच्यासोबत फ्रेंच बँकेतून दोन कोटी रुपये अण्णासाहेबांनी उभे केले आणि तारेने तसे कळवले. सालारजंग थक्क झाला. आता त्याचा विश्‍वास बसला. तूर्तास हे पैसे नकोत नंतर पाहू, असे त्याने कळवले. पण हा त्याचा खेळ अण्णासाहेबांना चांगलाच भोवला. त्यांना दलालीचे आणि थोड्या काळापुरत्या व्याजाचे दोन-चार लाखांचे कर्ज झाले. हीगोष्ट एकोणिसाव्या शतकातील आहे हे लक्षात घ्या, म्हणजे व्याजरक्कम डोंगराएवढी होती हे ध्यानात येईल. लवकरच इंग्रजांच्या काव्यामुळे सालारजंग कॉलरा होऊन मेला. कॉलर्‍याची साथ नसताना त्याला एकट्यालाच तो झाला. त्याच्या मृत्यूमुळे अण्णासाहेबांच्या बेताला सुरुंग लागला.पुढे १९०४ मध्ये लो.टिळकांनी गोवा प्रांत ताब्यात घेऊन आपले सरकार स्थापायचा गुप्त प्रयत्न केला तो बहुधा अण्णासाहेबांच्या या कार्यातून स्फूर्ती घेऊनच असावा. त्यांचाही प्रयत्न अयशस्वी झाला.
पुढे अण्णासाहेबांना तशीच संधी कारव्हाटनगर या मद्रासेतील संस्थानाकडून चालून आली पण त्या संस्थानिकाचाही अपमृत्यू झाला. मद्रास प्रांतात अण्णासाहेबांचा मुक्काम साडेतीन वर्षांहून अधिक झाला. ते परतले तेव्हा आमुलाग्र बदलले होते. अंतर्मुख झाले होते. आळंदीच्या श्रीनृसिंह स्वामींना ते प्रत्यक्ष देव मानत असत. त्यांच्या आज्ञेनुसार अण्णासाहेबांचे पुढचे जीवन अधिकाधिक विरक्तीकडे जाऊ लागले. धुळ्याचे बुवासाहेब महाराज यांनासुद्धा ते मानत होते.
दक्षः श्रियमधिगच्छति पथ्याशी कल्यतां सुखमरोगी|
अभ्यासी विद्यान्तं धर्मार्थयशांसि च विनीतः॥
(सावध असेल त्या माणसाला संपत्ती मिळते. पथ्याचे आणि सत्वयुक्त अन्नाचे सेवन करणार्‍याची तब्बेत चांगली राहते. सुदृढ माणूस सुखी असतो. अभ्यासूवृत्तीच्या माणसाचे शिक्षण पूर्ण होतं. विनीत आणि नम्र माणसाला संपत्ती,साफल्य आणि धार्मिकतेची प्राप्ती होते.)
पुण्याला आल्यावर त्यांनी समाजोपयोगी कामांकडे दुर्लक्ष केले नाही. महानगरपालिकेची निवडणूक लढवून ते सहज विजयी होत असत. पालिकेतील शिक्षणखाते त्यांच्याकडे होते. १८८४ नंतर पुण्यातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. गणेशोत्सवाबाबत पुढाकार अण्णासाहेबांचा होता. टिळकांनी तो उत्सव अधिक व्यापक केला. पुण्यातील प्लेगमध्ये जो हाहाकार माजला त्यावेळी पुणे सोडून न जाणारे दोन नेते म्हणजे टिळक आणि पटवर्धन होय.
हे सर्व करीत असताना त्यांची वैयक्तिक उपासना चालू होती. रोजच्या संध्येनंतर वासुदेव बळवंत आणि चापेकरांची आठवण ठेवून ते पाणी सोडत असत. त्यांची उपासना कठीण होती. मीन उपासना म्हणजे न मीअसा उलटा शब्द करायचा. याचा अर्थ मी पणा सोडणे होय. त्यांचे जेवण मुळात खूप कमी होते. रुग्णांच्या गर्दीमुळे कित्येकदा जेवायला वेळ मिळत नसे. अखेरच्या आठ-दहा वर्षात ते जेवतच नव्हते. दिवसभरात एखादा शेंगदाण्याचा लाडू, केळे अथवा एखादे फळ इतकाच आहार होता. वर्षातून केवळ चार वेळा ते जेवायचे, ते देखील उत्सवात.रात्रीचे कितीही वाजले तरी त्यानंतर गुंड गणपतीच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नेम त्यांनी कधीच मोडला नाही. नाडीपरीक्षा उत्तम असल्यामुळे ते स्वत:च रोगनिदान करायचे. बहुतेक वेळा काष्ठौषधी म्हणजे काढेच द्यायचे. रसौषधी अथवा भस्म हे रुग्णांना परवडणारे नाहीत आणि त्याच्या शुद्धतेची खात्री नाही, म्हणून त्यांची उपाययोजना काढ्यांचीच असे. त्यांनी कधीही फी आकारली नाही.
असा हा सात्विक माणूस सत्तराव्या वर्षी आपला देह सोडून १० फेब्रुवारी १९१७ ला निजधामाला गेला.त्यांच्या पार्थिवाला बसते करून त्यांची अंत्ययात्रा निघाली. योगायोग म्हणजे पुढे १९२० मध्ये टिळकांची देखील तशीच अंत्ययात्रा निघाली. खरे तर लिहिण्यासारखे खूप आहे पण ते शब्दमर्यादेत बसवणे कठीण आहे. प्रत्यक्ष लोकमान्य ज्यांना मानत होते त्या अण्णासाहेबांना पुण्यतिथी शताब्दीनिमित्त वंदन…!!
– डॉ. सच्चिदानंद शेवडे