पॅसिफिकच्या निळ्या पाण्यात लाल ड्रॅगन!

0
2555

विश्‍वसंचार
अमेरिकेचं सगळं लक्ष अफगाणिस्तान, इराक, इराण आणि मध्यपूर्वेत गुंतून पडलेलं असताना, चीन शांतपणे आपलं बळ वाढवतो आहे. १९९१ साली अमेरिका-सोवियत यांच्यातलं शीतयुद्ध संपलं. जगभरच्या देशांनी आपापले संरक्षण अर्थसंकल्प हळूहळू आखडते घ्यायला सुरुवात केली. रशिया आणि अमेरिका यांनी एकमेकांच्या दिशेने सज्ज करून ठेवलेली शेकडो आण्विक आंतरखंडीय क्षेपणास्त्रं काढून घ्यायला सुरवात केली. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या कालखंडात अमेरिकन नौदलाने, पॅसिफिक महासागरातले अमेरिका आणि आशियाई देशांच्या दरम्यानचे सगळे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात आणले होते. शीतयुद्ध संपल्यामुळे अमेरिकन नौदल तिथेही जरा ढिलंच पडलं. पॅसिफिकपेक्षा त्यांचा हिंदी महासागर क्षेत्रातला हस्तक्षेप वाढला.
या सगळ्याचा अचूक फायदा चीनने उठवला; आजही उठवतो आहे. १९९० पासून आतापर्यंत दरवर्षी, वर्षाला १००० या प्रमाणात आंतरखंडीय क्षेपणास्त्र चीनमध्ये बनत आहेत. १९९५ पासून आतापर्यंत चीनने ३० पाणबुड्या बांधून सज्ज केल्या आहेत. पाणबुड्यांचे विविध वर्ग असतात. विशिष्ट वर्गातल्या पाणबुडीमध्ये विशिष्ट सोयी असतात. चीनच्या या ३० पाणबुड्या पाच वेगवेगळ्या वर्गांच्या आहेत. हे वैविध्य सध्यातरी अमेरिकावगळता जगातल्या दुसर्‍या कोणत्याही नौदलाकडे नाही. यात अर्थातच ‘जिन’ वर्गातली अण्वस्त्रधारी पाणबुडीही आहेच.
१९९८ साली चीनने ब्रिटनकडून हॉंगकॉंग बंदर परत मिळवलं. त्यानंतर त्याने पोर्तुगालकडून मकाब हे बंदरही परत मिळवलं. ही दोन्ही बंदरं दक्षिण चिनी समुद्र या नावाने ओळखल्या जाणार्‍या पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात येतात. मकावच्या दक्षिणेला हैनान नावाचं बेट आहे. त्या बेटावरच्या सान्या या ठिकाणी चीनने फार मोठा नाविक तळ उभारला आहे. वर उल्लेख केलेल्या विविध वर्गांच्या पाणबुड्या, शेकडो विनाशिका, शेकडो अत्याधुनिक झुंजी विमानं ही सगळी सामग्री सान्या तळावरून संचालित केली जाते. शीतयुद्ध समाप्तीनंतर जगभरच्या सर्व देशांनी आपापल्या संरक्षण खर्चात कपात करायला सुरवात केली, तर चीनने आपला संरक्षण अर्थसंकल्प वाढवला. विशेष म्हणजे भूदल आणि वायुदलापेक्षाही चीनने आपलं नौदल वाढवण्यावर, शक्तिशाली करण्यावर भर दिलेला दिसतो.
याचं कारण आशिया खंडाचा नकाशा पाहिल्यास आपल्या ध्यानात येतं. चीनच्या उत्तरेकडच्या सीमा कझाकस्तान, मंगोलिया आणि रशिया या देशांना भिडलेल्या आहेत. या तीनपैकी रशिया हाच काय तो प्रबळ देश आहे. पण, सध्यातरी चीनला त्याच्याकडून जमिनीवरून आक्रमणाचा धोका नाही. पश्‍चिमेपासून दक्षिणेपर्यंत किरगिजिस्तान, ताजिकीस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश उर्फ म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या देशांच्या सीमा चीनला लागून आहेत. यातला भारतवगळता इतर कोणताही देश चीनवर जमिनीवरून किंवा कोणत्याच स्वरूपात आक्रमण करण्याची सुतराम शक्यता नाही. भारताकडे क्षमता आहे, पण भारत मुळातच आक्रमक नाही, हे चीनला पुरेपूर माहिती असल्यामुळे तिथूनही धोका नाही. मग धोका कुठून आहे? तर दक्षिण चिनी समुद्रातला तैवान आणि पूर्व चिनी समुद्रातले दक्षिण कोरिया व जपान यांचा.
यापैकी तैवान आणि दक्षिण कोरिया हे देश म्हणजे अमेरिकेची बाहुली आहेत. वास्तविक, हे देश इतके छोटे आहेत की, अवाढव्य चीन त्यांचा एकच घास बनवू शकतो. पण, त्यांच्यामागे अमेरिकेचं प्रचंड सामर्थ्य उभं आहे. जपान हा तर डबल बॅरल बंदुकीसारखा आहे. म्हणजे जपानच्याही मागे अमेरिकन शक्ती आहेच. पण, खुद्द जपान आणि चीन यांचं फार जुनं हाडवैर आहे. एकेकाळी चिमुकल्या जपानने अवाढव्य चीनचा रणांगणावर पराभव केला होता, हे चीनही विसरलेला नाही आणि जपानही विसरलेला नाही.
आणि या देशांच्या पलीकडे, अफाट पसरलेल्या पॅसिफिक महासागरावर अमेरिकन नौदलाचं एकछत्री अधिराज्य आहे. अमेरिका आणि आशियाई देशांदरम्यानचे व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवण्याचं काम ते नौदल करतं. चीनला ही मक्तेदारी मोडून काढायची आहे. त्यामुळे नौदलाच्या वाढीवर भर देणं आवश्यकच होतं. चीनने अजून विमानवाहू नौका बांधलेली नाही. पण, आता तो केव्हाही ती बांधू शकेल, अशी त्याची तांत्रिक स्थिती आहे.
सारांश, अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता होण्याचा चीन सर्व बाजूंनी पूर्ण शक्ती लावून प्रयत्न करत आहे. म्हणजेच जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी गेली कित्येक शतकं चालू असलेल्या झगड्याची नवी आवृत्ती निघत आहे. मानवजातीच्या आधुनिक इतिहासानुसार अलेक्झांडरने सर्वप्रथम जगावर एकछत्री अंमल गाजवण्याचा प्रयत्न केला. तो ग्रीक होता. त्याच्यानंतर रोमन लोकांनी विशाल साम्राज्य निर्माण केलं. मग प्रथम ख्रिश्‍चन धर्माने आणि नंतर मुसलमानांनी जग जिंकण्याचा प्रयत्न केला. १७ व्या शतकापासून इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन या युरोपीय देशांचा जग जिंकण्यासाठी तीव्र लढा सुरू झाला. तो इंग्लंडने जिंकला. पण, प्रिन्स बिस्मार्कने जर्मनीची निर्मिती करून नवं आव्हान उभं केलं. हिटलरने त्या आव्हानाला विध्वंसक आक्रमण बनवलं.
त्याचा मोड होतोय तोवर साम्यवाद हे त्याच्याहीपेक्षा भयंकर तत्त्वज्ञान जग गिळून टाकायला उभं राहिलं. साम्यवाद संपतोय न संपतोय तोच इस्लामचं संपलेलं आव्हान पेट्रोडॉलर्सची ऊब मिळून पुन्हा भेडसावू लागलंय आणि त्याच वेळी साम्यवाद व भांडवलशाही या दोन्हींचा मिलाफ करून चीनचा साम्राज्यवाद भरारी घेतोय. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे सर्व प्रकारची घातक शस्त्रास्त्रं सगळ्यांनाच उपलब्ध आहेत. १९९० पासून दरवर्षाला १००० आंतरखंडीय क्षेपणास्त्रं उभी करणारा चीन, त्या क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्र ठेवणार नाही, असं नाही. अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटेगॉनच्या अधिकृत वृत्तानुसार सन २०२० पर्यंत चीनच्या किमान पाच अण्वस्त्रधारी पाणबुड्या सज्ज होतील.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीनंतर युरोपातल्या सर्वच राष्ट्रांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आली. त्यात अतिरिक्त राष्ट्रवादी किंवा खरं तर साम्राज्यवादी विचारसरणीची भर पडून त्यातून महायुद्धाचा भडका उडाला. आधुनिक काळात मानवजातीने कधीच अनुभवला नव्हता इतका भीषण नरसंहार आणि विध्वंस या महायुद्धात झाला. त्यामुळे जाणते लोक चिंतेत पडले. शस्त्रास्त्रांचे साठे वाढवू नका, सैन्यसंख्या वाढवू नका, असं कोण कुणाला सांगणार? आणि कोण कुणाचं ऐकणार? मग स्वार्थ आणि अहंकार यांना राष्ट्रवादाचं रूप देऊन वेगवेगळे देश आपसात भांडणार आणि एकमेकांना नष्ट करणार. हे कसं थांबवायचं? हे थांबवणं अशक्य आहे, पण निदान थोडा आळा तरी बसावा. या हेतूने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी पुढाकार घेऊन ‘राष्ट्रसंघ’ या संस्थेची निर्मिती केली. पण, ‘‘खबरदार, भांडाल तर!’’ असं ठणकावून सांगायला, सांगणार्‍याच्या मनगटात ताकद लागते; ती राष्ट्रसंघाच्या मनगटात कधीच निर्माण होऊ शकली नाही. किंबहुना, जगात शांतताबिंतता नांदावी, असं वुड्रो विल्सन सोडून कुणालाही प्रामाणिकपणे वाटतच नव्हतं. परिणामी, राष्ट्रसंघाचे युद्धविरोधी प्रयत्न म्हणजे ‘‘नका रे भांडू बाबांनो! शाणी मुलं ना तुम्ही?’’ असे गोड-गोड गोष्टी छाप झाले. पुन्हा एकदा झकासपैकी महायुद्ध झडलं नि त्यात पहिल्या महायुद्धाच्या दसपट लोक मेले.
मग जागतिक शांततेसाठी जुन्या राष्ट्रसंघाऐवजी संयुक्त राष्ट्रसंघ-युनायटेड नेशन्स- युनो ही संस्था अस्तित्वात आली, पण ती कायमच अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर राहत आलेली आहे. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या किंवा पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांचं पुनर्वसन, वैद्यकीय मदत, अन्नवाटप इत्यादी विधायक कामं संयुक्त राष्ट्रसंघ बर्‍यापैकी करत असतो. पण, राष्ट्रा-राष्ट्रांमधला युद्धखोरपणा थांबवणं, अण्वस्त्रांचे व अन्य शस्त्रास्त्रांचे वाढते साठे रोखणं, त्याला जमलेलं नाही.
त्यामुळे, चीनने अमेरिकेच्या तोडीस तोड महासत्ता बनू पाहणं, त्यासाठी आपल्या सैनिकी सामर्थ्यात प्रचंड वाढ करणं, हे कुणीही रोखू शकत नाही. अमेरिका जर वाटेल तशी शस्त्रास्त्रं बनवते आणि स्वत:ला स्वस्तात पेट्रोल हवं म्हणून इराकवर लष्करी आक्रमण करते, तर इतरांनी शस्त्रास्त्रं बनवू नयेत, हे अमेरिका कोण सांगणार?
आपल्या दृृष्टीने आवश्यक म्हणजे आपणही आपलं सामर्थ्य वाढवत राहायचं. चीनच्या वाढत्या बळाच्या दबावाखाली आपण न यावं, यासाठी आपली शक्ती वाढवणं, हेच आपलं धोरण असलं पाहिजे. बाकी जागतिक शांतता वगैरे गोष्टी फजूल बाता आहेत. राजकीय प्रयत्नांनी जागतिक शांतता निर्माण होणार नाही. मदोन्मत्त होऊन एकमेकांची डोकी फोडू पाहणार्‍या सांडांना लगामी लावणं, हे राजकारण्यांचं काम नव्हे, ते फक्त आध्यात्मिक महापुरुषांनाच जमू शकतं…
– मल्हार कृष्ण गोखले