भरधाव वाहनाने पहाटपक्ष्यांना चिरडले

0
176

•दोघांचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर
•मद्यधुंद वाहनचालकास अटक
•ऊर्जानगर मार्गावरील अपघात
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, २२ जानेवारी
नित्यनियमाने पहाटे फिरायला गेलेल्या सात ते आठ जणांना मद्यधुंद वाहनचालकाने भरधाव वाहन चालवून उडविले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. उर्वरितांना किरकोळ दुखापत झाली असून, ही घटना रविवार, २२ जानेवारी रोजी पहाटे चंद्रपूर-ऊर्जानगर मार्गावरील पर्यावरण चौकात घडली.
प्रवीण बारधनवार व विठ्ठल दडमल अशी मृतकांची नावे असून, जखमींमध्ये भाष्कर मुसळे, किशोर ठाकरे, सुनील तुप्पेवार, साईनाथ शेंडे यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी त्याच परिसरातील ऊर्जानगर वसाहतीत वास्तव्य करतात. वसाहतीमधील कर्मचारी दररोज पहाटे फिरायला जातात. रविवारीही हे कर्मचारी रस्त्याने फिरायला जात असताना चंद्रपूर येथून ऊर्जानगरमार्गे औष्णिक विद्युत केंद्राकडे एक भरधाव वाहन जात होते. या चारचाकी वाहनचालकाचा वाहनावर ताबा नव्हता. त्याचे नियंत्रण सुटले आणि वाहनाचा वेग अधिकच वाढला असता, रस्त्यावरील नागरिकांना जबर धडक देत, ते वाहन समोर पुलावर जाऊन आदळले. धडक भीषण असल्याने जागीच दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले.
तेथे उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मृतक, जखमी व वाहनचालकही औैष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक सचिन विजय येलमुलेला अटक केली आहे. घटनेचा तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.