मागणीप्रमाणे एसआरपी कॅम्प उपलब्ध करून देणार : आयुक्त सहारिया

0
53

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतला आढावा
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, २२ जानेवारी
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सुरक्षेसाठी एसआरपी कॅम्प उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी येथे केले.
जिल्हा परिषद गडचिरोली व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या आठ तालुक्याच्या निवडणुका १६ फेब्रुवारी रोजी घ्यावयाच्या आहेत व दुसर्‍या टप्प्यात २१ फेब्रुवारीला एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या चार तालुक्याच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. निवडणूक विषयक कामकाज सुरळीत व अचूक करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, निवडणूक विभागाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आंधळे, तडपाडे, टोनगांवकर, राममूर्ती, इटनकर, चांदूरकर, विजय मुळीक, निलावार, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नोडल अधिकारी आदी या बैठकीला उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. तसेच नोडल अधिकारी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांची नावे व त्यांच्या पदनामाची माहिती अवगत केली. जिल्ह्याच्या एकूण ग्रामीण मतदार संख्येबाबत माहिती देताना ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात मतदान करणारे ४ लाख ३६ हजार ५५२, तर दुसर्‍या टप्प्यात १ लाख ६० हजार २४७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी मतदान केंद्रावर नियुक्त करावयाचे अधिकारी, कर्मचारी व मनुष्यबळाची माहितीसुद्धा दिली. मतदार जनजागृतीकरिता जिल्हा परिषद गट क्षेत्रनिहाय जनजागृती मेळावे घेण्यात येत आहेत. सोबतच जिल्ह्यातील विविध भाषिक लोकांसाठी गोंडी, तेलगू, छत्तीसगडी, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेमधून मतदारांना जागृत करण्याचे काम पत्रकाद्वारे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील काही भाग अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांची महत्त्वाची भूमिका असून त्याअनुषंगाने काही मतदान केंद्र वेळेवर हलविण्यासाठी नियोजन केले असल्याचे ते म्हणाले. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.