सर्व पुलांची होणार नियमित तपासणी

सावित्री नदीचा धडा...

0
237

प्रफुल्ल व्यास
वर्धा, २० सप्टेंबर
महाड येथील सावित्री नदीवरील जीर्ण पूल वाहून गेल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून राज्य सरकारने राज्यातील ब्रिटीशकालीन आणि त्यानंतरच्या सर्व पुलांची नियमित तपासणी, देखभाल आणि नियमित सनियंत्रण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मात्र शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही, हे उल्लेखनीय!
राज्यातील ३.३७ लाख किमी रस्त्यांवर लहान मोठे १६,०८५ पूल असून त्यापैकी २५० पूल ब्रिटीशकालीन आहेत. यात ब्रिटीशकालीन मोठे पूल १०५ तर लहान पूल १४६ आहेत. या ब्रिटीशकालीन व ब्रिटीश काळानंतरच्या सर्व पुलांची नियमित तपासणी, देखभाल, नियमित स्वनियंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. या नवीन कामांसाठी शासनाच्या तिजोरीवर कोणताही भार पडणार नसल्याची माहिती वर्धा येथील भाजपा आयटी सेलचे अध्यक्ष प्रणव जोशी यांनी दिली.
राज्यातील पुलाच्या देखरेखीसाठी मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथे कार्यालय राहणार असून मुंबईत पुणे व कोकण, औरंगाबादमध्ये औरंगाबाद व नाशिक तर नागपूरमध्ये नागपूर व अमरावती या प्रादेशिक विभागाचा समावेश राहणार आहे.
सावित्री नदीवर झालेल्या अपघातात बसेससह अनेक वाहने वाहून गेली होती. अनेकांना प्राणही गमवावा लागला होता. विरोधकांनी ब्रिटीशकालीन पुलाचे सर्वेक्षण झाले नसल्याची ओरड केली होती. या सर्व बाबींचा सर्वंकष अभ्यास करून राज्य शासनाने राज्यातील सर्व लहान-मोठ्या पुलांची नियमित तपासणी, देखभाल करण्याचा निर्णय घेतल्याने भविष्यात असे मोठे अपघात होणार नाहीत.