‘त्या’ महिलांविरोधात अफवा

0
130

पसरविणार्‍यांवर कारवाई करू
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, २४ जानेवारी
२० जानेवारी रोजी पोलिस-नक्षल चकमकीनंतर पकडलेल्या दोन संशयित महिलांची सोमवारी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून त्यांना त्यांच्या स्वगावी पाठविण्यात आले. परंतु नक्षल फ्रंटल ऑर्गनायझेशनचे काही सदस्य चुकीच्या अफवा पसरवून त्या दोघींची गोपनियता व प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याऐवजी त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जो कोणी त्यांच्या गोपनियतेचा व प्रतिष्ठेचा भंग करेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूच्या निरीक्षणाखाली या दोन्ही महिलांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यावेळी त्या महिलांच्या आईसह ३ महिला नातेवाईक व एक महिला पोलिस अधिकारी उपस्थित होते. सदर वैद्यकीय चाचणीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. सोमवार, २३ जानेवारी रोजी त्या दोन्ही महिलांना रुग्णालयातून मोकळीक देण्यात आल्यानंतर महिला कार्यकारी दंडाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या यांच्यासमक्ष त्यांचे बयाण नोंदविण्यात आले. या बयाणात त्या दोघींनी पोलिसांबाबत कोणतीही तक्रार केली नाही. उलट शीला गोटा व तिचे पती सैनू गोटा यांनी अफवा पसरवून बदनामी केल्याने आम्हाला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे सांगून त्यांच्याविरोधात या महिलांनी तक्रार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
रविवार, २२ जानेवारी रोजी शासकीय रुग्णालयाच्या आवारात काही लोक नातेवाईक असल्याचा देखावा करीत होते. यात दारू पिऊन असलेले ऍड. जगदीश मेश्राम आणि त्यांच्यासोबत सैनू गोटा व आणखी काही इसम वैद्यकीय कामकाजात बाधा निर्माण करीत होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी रुग्णालयातून ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरोली पोलिस यामध्ये काहीही लपविण्याचा प्रयत्न करीत नसून, या प्रकरणात त्या दोन महिलांविषयी गोपनियता व प्रतिष्ठेचे संरक्षण करीत आहेत. जो कोणी त्यांच्या गोपनियतेचा व प्रतिष्ठेचा भंग करेल, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.