आई-वडील नक्षली असले, तरी पोलिस बनणार!

0
104

सहलीदरम्यान व्यक्त केले नक्षल्याच्या मुलाने मत
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, २४ जानेवारी
गुन्हेगारांच्या मुलांचे भविष्य कसे असते, हे सर्वश्रूत आहे. या मुलांचा दोष नसताना समाज त्यांच्याकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत असतो. त्यातच ज्याचे आई-वडील कुख्यात नक्षलवादी आहेत, त्याच्यासमोर काळोखच. मात्र या परिस्थितीतूनही प्रकाशाची वाट तो शोधत आहे. आई-वडील नक्षलवादी असले, तरी मला मात्र पोलिसच बनायचे आहे, असा ठाम निश्‍चय त्याने व्यक्त केला आहे. नुकताच तो गडचिरोली पोलिसांसोबत ‘आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहली’ला गेला होता. यादरम्यान त्याने ठरविले की, आता जीवनात पोलिसच व्हायचे.
हे वास्तव आहे बालाजीचे (बदललेले नाव). तो अवघ्या १३ वर्षांचा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात त्याचे गाव असून, केवळ ५० ते ६० लोकांची तेथे वस्ती आहे. गावातील तिघेजण नक्षल दलममध्ये कार्यरत असून, त्यात त्याच्या आईचाही समावेश आहे. गत तीन वर्षांपासून त्याचे वडील चंद्रपूर कारागृहात आहेत.
सध्या बालाजी आश्रमशाळेत इयत्ता सातवीला शिकत आहे. गडचिरोली पोलिस विभागाच्यावतीने आयोजित १४ व्या महाराष्ट्र दर्शन सहलीत बालाजी सहभागी झाला होता. नागपूर येथे सहल आली असता, त्याने आपली कहाणी सांगितली.
आई-वडील नक्षलवादी असताना तू पोलिसांसोबत महाराष्ट्र दर्शन सहलीला आला, असे विचारल्यानंतर बालाजी म्हणाला, मला शाळेत सहलीबद्दल विचारण्यात आले. माझ्यासोबत इतरही मुले जाणार होती. मग घरी विचारले आणि पोलिसांनीही घरच्यांना विचारल्यावर सहलीला जाणे ठरले. आजी-आजोबा, काका-काकू आणि एक चुलत बहीण असा आमचा परिवार आहे. रोज मजुरीची कामे करून आमचे घर चालते. मागच्या वर्षी चंद्रपूर येथे जाऊन वडिलांची (नाव वसंत) तुरुंगात भेट घेतली. त्यांनी शिक्षणाबद्दल आणि घरच्यांबद्दल विचारपूस केली. तसेच आईला आत्मसमर्पण करायला सांग, असे वडील म्हणाल्याचे बालाजी सांगत होता.
आईची (कमला) शेवटची भेट कधी झाली, यावर तो म्हणाला, मी तेव्हा ६-७ वर्षांचा असेल. पूर्णपणे आठवत नाही, पण २०११ मध्ये ती घरी आली होती. त्यानंतर कधी भेट झाली नाही. आता गावातील चर्चेवरून समजते की, ती छत्तीसगड दलममध्ये आहे. मात्र मला त्याबाबत काही वाटत नाही. इतर मुलांप्रमाणे मलाही शिक्षण घ्यायचे आहे, असे बालाजीने सांगितले.
आमच्या गावाकडे पोलिस दिसतात, तर जेथे शिकतो तेथे शिक्षक. इतर शासकीय विभागांबद्दल जास्त माहिती नाही. आता पोलिसांसोबत महाराष्ट्र दर्शन सहलीला गेलो. पहिल्यांदाच गडचिरोलीच्या बाहेर निघालो व सहलीत पोलिसांना जवळून बघता आले. त्यांनी सर्वांचीच चांगली काळजी घेतली. आपण मुंबई, नागपूर, पुणे आदी शहरात जाऊन जंगलाबाहेरचे जग बघू शकतो, असे कधी वाटले नव्हते. मात्र पोलिसांनी बाहेरचे जग दाखविले. या सहलीच्या अनुभवातून आम्ही गडचिरोलीतील मुलेसुद्धा प्रगती करू शकतो, असा विश्‍वास आमच्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे सहलीदरम्यान मनात विचार केला की, भविष्यात पोलिस विभागात नोकरी करायची, असे बालाजीने शेवटी सांगितले.