उत्तरप्रदेशातील तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार?

0
167

दिल्लीचे वार्तापत्र
पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत असल्या तरी सगळ्यांचे लक्ष उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. राज्यात यावेळी तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपा, बसपा आणि कॉंग्रेस व समाजवादी पार्टी आघाडीत ही लढत होणार असली, तरी यात बाजी कोण मारणार, हे सांगणे अवघड आहे.
कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाली असली, तरी ती सहजासहजी झाली नाही. कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीतील आघाडीत बिघाड निर्माण झाला होता. मात्र, कॉंग्रेसतर्फे प्रियंका गांधी वडेरा आणि समाजवादी पार्टीतर्फे डिंपल यादव यांनी पुढाकार घेतल्यामुळे आघाडीला मूर्तरूप आले.
प्रियंका गांधी वडेरा या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधी यांच्या भगिनी आहेत, तर डिंपल यादव या समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि लोकसभेच्या खासदार आहेत.
या आघाडीचा फायदा आज तरी कागदावरच्या आकडेवारीनुसार कॉंग्रेस आणि सपा या दोन्ही पक्षांना मिळणार आहे. प्रत्यक्षात काय होणार, ते मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यातील पाच विधानसभा निवडणुकांचा आढावा आपण घेतला, तर कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी यांची आघाडी आज तरी भक्कम दिसते. १९९३ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २९.१३ टक्के, तर समाजवादी पार्टीला ३२.१२ टक्के मते मिळाली होती. यावेळी दोन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी ६१.२५ होती.
१९९३ मध्ये राज्यात कॉंग्रेसची स्थिती बर्‍यापैकी चांगली होती. कारण, तोपर्यंत कॉंग्रेस राज्यात सत्तेवर होती. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसची मतांची टक्केवारी झपाट्याने घसरत ८.९९ टक्क्यांवर आली. यावेळी समाजवादी पार्टीच्या मतांच्या टक्केवारीतही घट होत ती २६.२७ टक्क्यांवर आली. यावेळी दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी ३५.२६ होती.
२००२ मध्ये राज्यात समाजवादी पार्टीला २५.३७ टक्के मतांसह १४३ जागा जिंकता आल्या. २००७ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला २५.४३ टक्के मतांसह ९७ जागा मिळाल्या. कॉंग्रेसला ८.८४ टक्के मते मिळाली. यावेळीही दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी ३४.२७ होती.
२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने २९.२९ टक्के मतांसह २२४ जागा जिंकत सत्ता मिळवली. तर कॉंग्रेसला १३.२६ टक्के मते मिळाली. दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी ४२.५५ टक्के होती. विशेष म्हणजे या पाचही निवडणुकींत समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये आघाडी झाली नव्हती. दोन्ही पक्ष परस्पंराविरुद्ध दंड थोपटून उभे होते.
गणितात दोन अधिक दोन चार होत असले तरी निवडणुकीच्या राजकारणात दोन अधिक दोन कधीच चार होत नाही. कधी ते पाच होतील, तर कधी तीनही होऊ शकतात. म्हणजे आघाडीचा दोन्ही पक्षांना कधी फायदा मिळू शकतो, तर आघाडीमुळे नुकसानही होऊ शकते.
राज्यातील ४०३ जागांपैकी समाजवादी पार्टी २९८ तर कॉंग्रेस १०५ जागांवर निवडणूक लढत आहे. याचाच अर्थ समाजवादी पार्टीने ज्या १०५ जागा कॉंग्रेससाठी सोडल्या तिथे समाजवादी पार्टीतील इच्छुक उमेदवार एकतर बंडखोरी करतील वा बंडखोरी केली नाही तर किमान समाजवादी पार्टीची मते कॉंग्रेसला मिळणार नाहीत, यादृष्टीने व्यवस्था करतील.
अशीच स्थिती समाजवादी पार्टीच्या २९८ जागांवरही होईल, या मतदारसंघात कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार एक तर बंडखोरी करतील वा कॉंग्रेसची परंपरागत मते समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला मिळू नये, यासाठी काम करतील.
कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीला सर्वात मोठा धोका शिवपाल यादव आणि अमरसिंह यांचा राहणार आहे. या दोघांमध्ये कदाचित आपला उमेदवार निवडून आणण्याइतपत ताकद नसेल. मात्र, अखिलेश यादव यांचे काही उमेदवार पराभूत करण्याची क्षमता नक्कीच राहू शकते. शिवपाल यादव आणि अमरसिंह ही जोडगोळी अखिलेश यादव यांना सुखासुखी ही निवडणूक जिंकू देणार नाही. त्यांच्या मार्गात वेगवेगळ्या पद्धतीने अडथळे आणल्याशिवाय राहाणार नाही. त्यामुळे आज कागदावर ही आघाडी मजबूत वाटत असली तरी नक्की काय होईल, याचा अंदाज करता येणार नाही.
कॉंग्रेससोबत झालेल्या आघाडीचा जेवढा फायदा समाजवादी पार्टीला होणार नाही, त्यापेक्षा जास्त फायदा समाजवादी पार्टीसोबतच्या आघाडीचा कॉंग्रेसला होऊ शकतो. कारण आज राज्यात कॉंग्रेसजवळ गमावण्यासारखे काही नाही. याउलट समाजवादी पार्टीकडे गमावण्यासारखे खूप काही आहे. कारण हा पक्ष आज सत्तेत आहे.
स्वबळावर राज्यातील ४०३ जागा लढवण्याची घोषणा करताना कॉंग्रेसने शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारही जाहीर करून टाकले. पण नंतर राज्यातील आपल्या ताकदीची कल्पना आल्यानंतर कॉंग्रेसला समाजवादी पार्टीच्या आघाडीच्या कुबड्या सोबत घ्याव्या लागल्या. कारण स्वबळावर कॉंग्रेसने निवडणूक लढवली असती, तर १० ते १५ पेक्षा जास्त जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या असत्या. आता समाजवादी पार्टीसोबत १०५ जागांवर लढताना कॉंग्रेस नक्कीच २५ ते ३० जागा जिंकण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यदाकदाचित राज्यात समाजवादी पार्टीचे सरकार आले तर आघाडीच्या सरकारमध्ये बिहारमध्ये मिळाला तसा सत्तेच्या भाकरीचा तुकडा कॉंग्रेसला मिळू शकतो. त्यामुळे समाजवादी पार्टीला कॉंग्रेससोबतच्या आघाडीची जेवढी गरज होती, त्यापेक्षा जास्त गरज कॉंग्रेसला समाजवादी पार्टीसोबतच्या आघाडीची होती. त्यामुळे कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीत आघाडीची चर्चा सुरू असताना अलाहाबादमध्ये प्रियंका गांधी वडेरा आणि समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांचे अनेक होर्डिंग्ज लावण्यात आले होते.
समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते आपल्या मुलांमुळे त्रस्त आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आपल्या मुलाकडे म्हणजे राहुल गांधी यांच्याकडे सत्तेची सूत्रे सोपवायला तयार असताना पक्षातून त्याला विरोध होत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा राहुल गांधींच्या नेतृत्वाला विरोध होत आहे. याला कारण राहुल गांधी यांची मनमानी वागणूक, प्रगल्भतेचा अभाव आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे.
याउलट समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आपल्या मुलाकडे पक्षाची सूत्रे सोपवायला तयार नसताना त्यांच्या मुलाने म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वत:कडे खेचून घेतले. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांच्या या कृतीला समाजवादी पार्टीतील बहुतांश ज्येष्ठ नेत्यांचा आणि जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार आणि खासदार यांचा पाठिंबा आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या तुलनेत अखिलेश यादव खूपच प्रगल्भ जाणवतात. समाजवादी पार्टीतील अंतर्गत सत्तासंघर्षात अखिलेश यादव यांची संयमी वागणूक आणि मुत्सद्दीपणा नजरेत भरला. आपल्या वडिलांशी सत्तासंघर्ष सुरू असतानाही अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यादव यांच्याबाबत बोलताना कधीच अनादर व्यक्त केला नाही. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी मुलायमसिंह यादव यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याकडे आहे, असे चित्र त्यांनी निर्माण केले. आपल्या वडिलांची म्हणजे मुलायमसिंह यादव यांची साधना यादव, शिवपाल यादव आणि अमरसिंह या त्रिकुटाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी अखिलेश यादव आपल्या वडिलांशी लुटुपुटुची लढाई लढले, असा संशय घ्यायला पूर्ण जागा आहे.
-श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७