शहीद संजय खंडारे व आनंद गवई

0
284

तभा वृत्तसेवा
अकोला,२७ जानेवारी
काश्मीर खोर्‍यातील बांदीपोरा येथे २६ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या प्रचंड हिमवादळात भारतीय लष्कराचे १४ जवान शहीद झालेत त्यात अकोला जिल्हयातील दोन जवानांचा समावेश आहे. अकोल्यातील आनंद गवई व जिल्हयातील माना येथील संजय सुरेशराव खंडारे अशी त्या जवानांची नावे आहेत.
बांदीपोरा भागात हिमवादळा नंतर जोरदार हिमस्खलन झाले आणि त्यात १४ जवान शहीद झालेत त्यात माना येथील जवान संजय खंडारे यांनाही हौतात्म्य आले आहे.अकोला जिल्ह्यातील माना गावचे संजय खंडारे सात वर्षांपूर्वी लष्करात शिपाईपदी दाखल झाले होते. जवान संजय खंडारे हिमस्खलनात शहीद झाल्याचे वृत्त माना येथे येताच गावात व परिसरात शोककळा पसरली. संजय खंडारे यांच्या कुटुंबावर या वृत्ताने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे वडील सुरेशराव, आई सुलोचना, पत्नी शीतल, मुलगा आदर्श व मुलगी परी असा परिवार आहे. शहीद संजय यांच्यावर माना येथे अंतिम संस्कार करण्यात येतील असे त्यांचे काका नाजुकराव यांनी सांगितले.
या हिमस्खलनात अकोला येथील शहीद झालेले दुसरे जवान आनंद गवई, येथील पंचशीलनगर वाशीम बायपास मार्गावर राहतात. दु:खावेगामुळे त्यांचे नातेवाईक काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते.