बिल्ट कामगारांना वेतन द्या

0
156

•जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश
•भामसंच्या प्रयत्नाना यश
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, २७ जानेवारी
बल्लारपूर पेपर मिल कामगारांवर वेतनाअभावी उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, यासाठी भारतीय मजदूर संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलनाचा धसका घेत जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांनी कामगार प्रतिनिधी व बिल्ट व्यवस्थापनाची बैठक आयोजित केली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी कामगारांना किमान तीन महिन्यांचे वेतन तातडीने देण्याचे निर्देश बिल्ट व्यवस्थापनाला दिलेत.
कंपनी आर्थिक तोट्यात असल्याचे कारण सांगून बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाकडून कामगारांना पगार दिला जात नाही. गेल्या ५ महिन्यांपासून येथील कामगार वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतांश कामगारांच्या घरची वीज, पाणी कपात करण्यात आली असून, त्यांच्या मुलांना शाळेतून शुल्कासाठी त्रास दिला जातो. त्यामुळे भारतीय मजदूर संघाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
आंदोलनाचा धसका घेत जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी तातडीने बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी वीज व व नळ जोडणी न कापण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. शिवाय पालक व विद्यार्थ्यांना शुल्कासाठी त्रास देऊ नये, असे निर्देश शिक्षण विभागासह संबंधित शाळांना दिलेत. भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नाने सध्यातरी कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बैठकीला भामसंचे जिल्हाध्यक्ष ऍड. शैलेश मुंजे, संजय लुटे, प्रशांत बहिरम, घनश्याम नंदा, सय्यद हसन, शशीकांत गहलोत, कंपनी व्यवस्थापनाकडून व्यंकटेश वरलू यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.