रेल्वे प्रवाशांना शस्त्राच्या धाकावर चालत्या गाडीत लुटले

0
195

•दोघांना अटक, तीन फरार • लोहमार्ग पोलिसांची कारवाई
तभा वृत्तसेवा
वर्धा, २७ जानेवारी
मालखेड-तळणी रेल्वे स्टेशनदरम्यान ५१२८५ क्रमांकाच्या रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना पाच ते सहा तरुणांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दोघांना अटक केली, तर तिघे फरार आहेत. ही घटना २६ जानेवारीला सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार मालखेड-तळणी रेल्वे स्टेशनदरम्यान ५१२८५ क्रमांकाच्या चालत्या रेल्वेत प्रवाशांना लुटले. सदर रेल्वे प्रवाशांनी पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवल्याची माहिती लोहमार्ग पोलिस वर्धा यांना मिळाली. त्यावरून पुलगाव रेल्वे पोलिसांनी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. पुलगावचे उपनिरीक्षक आर. जी. निपसैया यांनी तपासणी सुरू केली. दरम्यान वर्धा लोहमार्ग पोलिस रस्त्याने पुलगावला रवाना झाले. पोलिसांनी चौकशी करीत मालखेड ते तळणी स्थानकादरम्यान पाच ते सहा युवकांनी धमकावून पैसे लुटले आणि ते सर्व पुलगावनजीक चालत्या गाडीतून उतरले. तसेच काहींच्या हातावर टॅटू, तर कानात बाळी होती, अशी माहीती प्रवाशांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान माहितीवरून वर्धा नदीजवळ आकाश सुरेश बर्वे (२१) रा. दत्त कॉलनी, अकोला व डोमनिक मैनफ्रेंड कोफ (१९) या दोघांना ताब्यात घेतले.
विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दोघांनाही पुलगाव रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये आणले. तेथे कसून चौकशी केली असता सहकारी सोहेल खान ऊर्फ इस्सू खान (२४) इर्शाद खान (२३), गोलू बोधडे (२१) सर्व राहणार अकोला यांच्या मदतीने रेल्वे गाडीत मारपीट करून लुटमार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विविध कलामान्वये गुन्हा दाखल करून अटक केली तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलिस निरीक्षक जी. नालट, उपनिरीक्षक आर. जी. निपसैया, श्याम निलमवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी केली.