एका चित्रपटाच्या प्रमोशनची शाहरुख स्टाईल!

0
140

हा किस्सा प्रसिद्ध सिनेकलावंत दिलीप कुमार यांच्या संदर्भातला आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानात गेलेले असताना त्यांना, पेशावरमध्ये जेथे त्यांचा जन्म झाला ते घर बघायचे होते. प्रचंड गोपनीयता राखून पाकिस्तान सरकारने त्यांच्यासाठी तशी व्यवस्था उभारून दिली होती. पूर्वजांच्या घराला ते देणार असलेल्या भेटीबाबत कमालीची गोपनीयता राखण्यात आली होती. पण कशी कुणास ठावूक, लोकांना कुणकुण लागलीच. दिलीप कुमार यांची गाडी पोहोचली तेव्हा त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी तिथे जमली होती. गाडी ‘त्या’ घरासमोर नुसती उभीच राहिली, तर लोकांनी गराडा घातला गाडीला. तेथे उपस्थित मोजक्या पोलिसांना ही गर्दी, प्रयत्न केले तरी आवरणार नाही, याची कल्पना येताच खालीही न उतरता गाडी तिथून काढून घेण्याची सूचना दिलीप कुमार यांनी त्यांच्या चालकाला केली. आपण तिथे थांबलो असतो तर अकारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असता, हे त्यांनी नंतर दिलेले स्पष्टीकरण आणि केवळ तेवढ्यासाठी आपले ‘पुश्तैनी’ घर बघण्याचा मोह आवरण्याची त्यांची भूमिका त्यांच्या प्रगल्भतेची साक्ष ठरावी अशीच आहे. कलावंतांनी राखावयाच्या सामाजिक भानाचे ते एक आगळे उदाहरण होते. एक कलावंत म्हणून जे दिलीप कुमार यांना त्या क्षणी उमजले ते शाहरुखला कळू देखील नये?
‘रईस’ नावाचा कुठलासा चित्रपट तयार करून या टीमने देशावर उपकार वगैरे केलेत की, देशहितार्थ नोंद व्हावी असा कुठला पराक्रम केला शाहरुख खानने? धंद्यासाठी म्हणून तयार केलेला स्वत:चा एक चित्रपट विकण्यासाठी त्यांनी स्वीकारलेली प्रचाराची ही कथित आधुनिक तर्‍हा स्वीकारार्ह कशी ठरवायची? सर्वसामान्य लोकांना आणि रेल्वेच्या इतर प्रवाशांना वेठीस धरून आपल्या उत्पादनाच्या प्रचाराचा त्यांनी मांडलेला तमाशा प्रशासनाच्या परवानगीने दणक्यात आयोजित व्हावा ही तर त्याहून दुर्दैवी बाब. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान आणि रईसची टीम मुंबईहून दिल्लीला रेल्वेने निघाली. शाहरुखच्या या प्रवासाची रीतसर घोषणा करण्यात आली. हो! त्याशिवाय लोक कसे जमले असते जागोजागी फलाटांवर? यांना बघण्यासाठी म्हणून जमलेल्या फुकटच्या गर्दीसमोर भाषण ठोकून हे लोक आपल्या चित्रपटाचा प्रचार करणार अन् मग कोट्यवधी रुपये कमावणार. पण त्या गर्दीमुळे इतर प्रवाशांचे हाल झाले, त्याची जबाबदारी कोणाची? वडोदरा स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एक तरुण दगावला, त्याला जबाबदार कोण? दिल्लीत पोहोचल्यावर त्या कुटुंबाप्रती चार शब्दात शोक संवेदना व्यक्त केल्याने संपली शाहरुखची जबाबदारी? या प्रवासादरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला. का मार खायचा चाहत्यांनी? कशाची शिक्षा दिली गेली या रसिकांना? शाहरुखसह, ‘रईस’ची निर्मिती करणार्‍या टीमला या देशातल्या कायदा आणि सुव्यस्थेशी काही देणेघेणे असण्याचा प्रश्‍नच नाही. कारण त्यांना त्यांचे गल्ले भरण्याशी मतलब. मग त्यासाठी अतिशय सुमार मार्गांचा अवलंब करण्यातही कुठला कमीपणा त्यांना वाटण्याचेही कारण नाही. पण असल्या फालतुगिरीसाठी त्यांना परवानगी देणार्‍या प्रशासनाचे काय? अशी परवानगी दिल्यानंतर पुरेशी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची काळजी न घेणार्‍या अधिकार्‍यांचे काय?
ज्याला वानखेडे स्टेडियमवरच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याशी कसे वागावे हे कळत नाही. अमेरिकेतील व्यवस्थेसमोर तोंड उघडत नसले तरी भारतातील सुरक्षा व्यवस्थेचा झालेला त्रास मात्र त्याला जराही खपत नाही आणि तरीही खिशात भरायला पैसे मात्र फक्त भारतातलेच हवे असतात, अशा एका कलावंताने सामाजिक भान जपण्याची अपेक्षा तर चूकच ठरेल कदाचित. पण, त्याने त्याच्या एका खाजगी व्यावसायिक उत्पादनाच्या प्रमोशनसाठी मांडलेला सार्वजनिक उच्छाद प्रशासनाने का सहन करावा? उद्या इतरांनी असाच धिंगाणा घातलेला चालणार आहे? मग शाहरुखला ही सवलत कशासाठी?
अलीकडच्या काळातील काही चित्रपटांनी कोट्यवधीचा धंदा केल्याचे सांगतात. यातील एकही चित्रपट कुठल्याही चित्रपटगृहात विक्रमी वेळेसाठी प्रदर्शित होत राहिल्याची बातमी मात्र कुठेच ऐकायला मिळाली नाही. या चित्रपटांनी रोैप्यमहोत्सव वगैरे साजरा केल्याची वार्ता तर दूरदूरपर्यंत ऐकिवात नाही. लोकांनी इतक्या उड्या घातलेला, लोकांना इतका आवडलेला चित्रपट थिएटरमध्ये मात्र फार दिवस प्रदर्शित होत नाही, हे जरा आश्‍चर्यच ना! याउलट ज्यांनी आपल्या काळात प्रदर्शनाचे विक्रम नोंदवले त्या बॉबी, शोले, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, जय संतोषी मॉं, या सारख्या गाजलेल्या अन् लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांना मात्र असल्या प्रमोशनची कधी गरज पडल्याचाही इथे कुणाला अनुभव नाही. रौप्य महोत्सव साजरा करणार्‍या चित्रपटांची मालिकाच रसिकांपुढे सादर करण्याचा ज्यांचा विक्रम गिनिज बुकात नोंदवला गेला, त्या दादा कोंडकेंनाही कधी अशा तद्दन फालतू मार्गाने आपल्या चित्रपटांचा प्रचार करावा लागला नव्हता. कथानकात ताकद असली, अभिनय-गीत-संगीत त्या तोडीचे असले, निर्मिती तेवढी दर्जेदार असली की रसिकांचा प्रतिसाद मिळतोच त्या निर्मितीला. शाहरुख तर सुपरस्टार म्हणवून घेतो स्वत:ला. त्याला का गरज पडावी असल्या टुकार मार्गाने स्वत:च्या चित्रपटाचा प्रचार करण्याची? की, चित्रपटात दम नाही असा अर्थ काढायचा याचा? त्याहीउपर, या देशातल्या चित्रपट कलावंतांनी काय फक्त लोकांच्या जिवावर स्वत:चे खिसे भरायचे? सामाजिक जबाबदारीशी काहीच घेणेदेणे नसावे त्यांना? नागरिकांच्या जिवाची पर्वा त्यांनी करायचीच नाही का?
चला मान्य करूया की आताशा दिवस बदलले आहेत. तंत्रज्ञानानेही प्रतिगामित्वाची कात टाकत आधुनिकतेची कास धरली आहे. त्यामुळे असले तमाशे करून चित्रपटाचा प्रचार करणे ही ‘काळाची गरज’ वगैरे काय म्हणतात ती झाली असेलही… पण माणुसकी? त्याचे काय? की तीही लयाला गेली काळाच्या ओघात? घ्यायची ना एखाद्या मैदानावर जाहीर सभा अन् तिथे करायचे प्रमोशन आपल्या चित्रपटाचे. आधीच सोयींचा अभाव आणि दर्जाची बोंब असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का वेठीला धरायची त्यासाठी? आम जनतेची गैरसोय करून आपला धंदा करण्याची ही कुठली तर्‍हा झाली?
खरं तर लोकच मूर्ख आहेत. नाही तर काय? ज्याला रसिकांची काडीची किंमत नाही अशा कलावंताला बघण्यासाठी धडपडत गर्दी करणार्‍यांना आणखी काय म्हणायचे? सोबतच्या फोटोतला हा कलावंत बघा! हो! तुम्ही-आम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलेला शाहरुख खानच आहे तो. वाटते याला बघून हा सभ्य माणूस आहे म्हणून? ज्याला रेल्वेतल्या बर्थवर बसायचे कसे हे कळत नाही, ज्याला आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या माणसाशी वागायचे कसे हे कळत नाही, त्याला बघायला उड्या पडाव्यात लोकांच्या? याला बघण्यासाठी जीव गमावला फरीद खान नावाच्या तरुणाने त्या वडोदराच्या रेल्वे स्थानकावर? असं काय केलं या माणसानं या समाजासाठी, या देशासाठी की लोकांनी जीव ओवाळून टाकावा त्याच्यावर? फक्त चित्रपटात काम करणारा एक कलावंत म्हणून हा दर्जा बहाल करून बसलेत लोक शाहरुखला? एवढा एकच निकष उरला आहे या देशात लोकांच्या मनात स्थान मिळवण्याचा? असेल तसेच काहीसे कदाचित! म्हणूनच इथे लोक चित्रपटात काम मिळावे म्हणून धडपडतात अन् सैन्यात भरती होण्याची मात्र तयारी नसते कुणाची!
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३