संस्कृत व संस्कृतिसंवर्धनाला प्राधान्य

डॉ. माणिक पाटील यांची तभाशी बातचीत

0
125

तभा वृत्तसेवा
अमरावती, २८ जानेवारी
विश्‍व संस्कृत प्रतिष्ठानम् ही जागतिक स्तरावर संस्कृत प्रचार-प्रसाराचे काम करणारी संस्था असून संस्कृत व संस्कृती संवर्धनाला संस्थेने नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे संस्थेच्या विदर्भ प्रदेश प्रमुख प्राचार्य डॉ. माणिक पाटील यांनी तभाशी बोलताना सांगितले.
पॉंडेचेरी येथील अरविंदश्रम हे या संस्थेचे उगमस्थान आहे. माताजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून संस्कृतची १०० अधिवेशने भरविण्यात आली. १०१ वे अधिवेशन प्रयागराज येथे झाले. प्रयागच्या त्रिवेणी संगमावर २४ जानेवारी १९७९ च्या महाकुंभ मेळ्याच्या मुहूर्तावर संस्कृत अधिवेशन आयोजिण्यात आले होते. काश्मीर नरेश डॉ. कर्णसिंह हे त्यावेळी अध्यक्षस्थानी होते. या अधिवेशनातच विश्‍व संस्कृत प्रतिष्ठान ही संस्था नोंदणीबद्ध झाली. डॉ. कर्णसिंह यांच्या निर्देशानुसार काशीनरेश डॉ. विभूतीनारायणसिंह यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे डिसेंबर २००० पर्यंत त्यांनी अध्यक्षपद भूषविले. संस्कृत भाषा संवर्धनासाठी त्यांनी अखेरपर्यंत अविश्रांत परिश्रम घेतले. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची धुरा त्यांची विदुषी कन्या कृष्णप्रियाजी ह्या आजही समर्थपणे सांभाळत आहेत.
‘संस्कृताश्रिता’ हे या संस्थेचे ब्रिदवाक्य आहे. संस्कृतीचे रक्षण हे संस्कृत भाषेच्या रक्षणावरच अवलंबून आहे. या संस्थेच्या संपूर्ण भारतात प्रादेशिक शाखा आहेत. काश्मीर ते गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, विदर्भ प्रदेश इ.
विदर्भ प्रदेश प्रमुख म्हणून २००३ मध्ये माझी नियुक्ती झाली. वाराणसी येथील केंद्रिय कार्यालयाच्या कार्यकारिणीवरही उपाध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. विदर्भ प्रदेश समितीचे मुख्य कार्यालय अमरावतीला आहे. नागपूर व यवतमाळ येथे उपशाखा स्थापन केलेल्या आहेत. लवकरच विदर्भातील सर्व जिल्ह्यात उपशाखा स्थापन होतील. केंद्रिय कार्यालयाच्या घटनेनुसार व धोरणानुसार विदर्भ समिती कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ध्येय धोरण ः संस्कृत ही फक्त पंडितांचीच भाषा न राहता जनसामान्यात तिच्याबद्दल अभिरूची निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून कार्यक्रम केले जातात. आबालवृद्धांमध्येही आवड निर्माण व्हावी यासाठी निरनिराळे उपक्रम वयोगटानुसार आयोजित केले जातात. स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. निःशुल्क संस्कृत शिक्षा वर्ग सेवानिवृत्तांसाठी चालविल्या जातात.
३० जुलै २००७ पासून डॉ. वर्णेकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर यांनी आपले संपूर्ण जीवन संस्कृत संवर्धनासाठी समर्पित केले. ह्या संस्कृत प्रकाडपंडिताच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या साहित्याचा सर्वांना परिचय व्हावा, हा मूळ उद्देश त्या पाठीमागचा आहे. संशोधन व प्रशासकीय सेवा यासाठी मार्गदर्शन केले जाते. लेखन, वाचन, मनन व चिंतन या संस्कृत भाषेच्या चतुःसूत्रीवर आधारीत हे कार्यक्रम केले जातात, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
सहकार्याची अपेक्षा
संस्कृत व संस्कृतिसंवर्धनाचे संस्थेचे हे कार्य फक्त अधिवेशनापुरतेच सीमित नाही. त्यामुळे या कार्यासाठी ज्यांचे मनापासून आर्थिक योगदान राहील, अशा संस्कृत प्रेमी-जनांची आम्हाला अत्यंत गरज आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय त्याला गती येणार नाही. ही संस्था आयकर क्रमांक नोंदणीकृत आहे. देणगीदारांना आयकराची योग्य ती सवलत मिळू शकेल. आपली देणगी रोख, धनादेश, ड्राफ्ट किंवा नेट ट्रान्सफरच्याद्वारे द्यावी. संस्थेचे स्टेट बँक ऑफ इंडिया कॅम्प शाखा अमरावती येथे ‘विश्‍व संस्कृत प्रतिष्ठानम्’ विदर्भ प्रदेश समिती, अमरावती या नावाने खाते असून त्याचा क्रमांक ११०६२२६५३०७ असल्याचेही त्यांनी सागितले.