पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ!

0
132

अखेर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती संपुष्टात आली. बरेच दिवस खल झाला आणि युती तुटल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केले. हे करत असताना त्यांनी बरीच आदळआपट केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेखात तर मित्रपक्षाला ‘ढेकूण’ म्हणण्यापर्यंत ही आदळआपट पोहोचली आहे. हे सर्व पाहताना, विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपा-सेना यांच्यात युती करण्याबाबत जी चर्चा आणि घटनाक्रम झाला होता त्याची पुनरावृत्तीच झाल्यासारखे सर्वकाही घडत गेले. त्याच तिकिटावर तोच खेळ पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. युती करण्याची आत्यंतिक गरज शिवसेनेला होती, असे दिसत होते. मात्र, ही गरज प्रत्यक्षात युती करताना बिलकूल दाखवायची नाही आणि आपलाच वरचष्मा ठेवायचा, अशी व्यूहरचना शिवसेनेने केली होती. मात्र, त्यांची ही व्यूहरचना उधळून लावत भाजपाने शिवसेनेलाच युती तुटल्याचे जाहीर करण्याची वेळ आणली!
विधानसभा निवडणुकीच्या आधी युतीची जी चर्चा झाली त्या वेळी भाजपाने १३५ जागा लढविण्यासाठी मागितल्या होत्या. मात्र, शिवसेनेने मित्रपक्षासह ११८ जागा देऊ करून भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला. आत्यंतिक गरज असूनही मिजास कमी न करता टेचात आपलाच वरचष्मा ठेवण्याचा हा प्रकार होता. युती तुटली. केंद्रात सत्तेत राहायचे आणि राज्य विधानसभेत युती तोडून ज्या पंतप्रधानांच्या सरकारमध्ये आपले मंत्री आहेत त्यांना ‘अफजल खान’ म्हणायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुकीत घेतली होती. असला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा चालबाजपणा सर्वसामान्य मतदारांना रुचत नसतो. याचे प्रत्यंतर विधानसभेच्या निकालात आले. भारतीय जनता पक्षाला शिवसेना जेवढ्या जागा लढण्यासाठी देऊ करत होती त्यापेक्षा जास्त १२२ जागा भाजपाने जिंकल्या आणि शिवसेना त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजे अवघ्या ६० जागा जिंकू शकली. तरीही स्वाभिमानाने विरोधी पक्षात न बसता शिवसेना फरफटत जात आगतिकपणे सत्तेत सहभागी झाली, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांची कालच्या, मुंबईतील भाषणातील आक्रमक भाषा ही केविलवाणी वाटत होती.
विक्रम आणि वेताळ या गोष्टीतील विक्रमादित्याप्रमाणे शिवसेनेने आपला हट्‌ट सोडलेला नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपाच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे. मंत्रिपदाच्या खुर्चीला ‘यह मजबूत जोड हैं, टुटेगा नही’ असे म्हणत असल्यासारखे घट्‌ट चिकटून बसायचे, मात्र रोज ज्या सत्तेत आहोत त्यांना शिव्या देत राहायच्या, असा दुटप्पीपणा चालूच राहिला. केंद्र व राज्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर अत्यंत सवंग भाषेत टीका करायचा सपाटा चालूच राहील. नोटाबंदीच्या काळात रोज विरोधकांपेक्षाही अधिक कठोर भाषेत सरकारवर टीका करण्यात आली. सर्वसामान्य माणसाची बाजू आपण मांडत असल्याचा आव आणला गेला. मात्र, प्रत्यक्षात त्याच काळात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला तिसर्‍या, चौथ्या क्रमांकाचे यश मिळाले. भाजपा मात्र पहिल्या क्रमांकावरचा पक्ष आहे, हे स्पष्ट झाले.
त्यानंतरही शिवसेनेने आपला हट्‌ट सोडलेला नाही. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हटली जाते. याचे कारण येथील जनता फारच सुज्ञ आहे. ती शांतपणे आपला निर्णय मतदानातून व्यक्त करते. जनतेने मतदानातून व्यक्त केलेल्या विचारांचा जर राजकीय पक्षांनी गंभीरपणे विचार केला नाही, तर मात्र अशा राजकीय पक्षांना जनता पुढेही कधी माफ करत नाही. शिवसेना एकामागून एक निवडणुकीत सर्वसामान्य जनतेची दखल घेतच नाही, असे दिसते आहे. केवळ आपला हट्‌ट आक्रमक भाषा वापरून मांडला की जनता आपल्या मागे राहील, अशा प्रकारचा भ्रम या लोकांना झालेला दिसतो आहे. जनता केवळ भाषा पाहात नसते, तर ती कृतीलाही महत्त्व देते, हे लक्षात घेतले जात नाही तोपर्यंत अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागणार आहे.
जनतेचे मत काय आहे आणि जनतेचा कौल काय आहे, याची परीक्षा करताना राजकीय पक्ष आपल्याला सोयीचे अहवाल देणार्‍या आपल्या तोंडपुज्या लोकांवर विसंबून न राहता, जरा लोकांच्या मनात खरे काय आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवसेनेत हा प्रयत्न कितपत केला जातो, याबाबत शंका घेण्यास पुरेशी जागा आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ‘मुंबई कुणाची? शिवसेनेची!’ ही शिवसैनिकांची आवडती घोषणा आहे. मुंबईतील गल्लीबोळात कोणीही अडचणीत आला, तर त्याच्या मदतीला धावून जाणारी वृत्ती शिवसैनिकात दिसत होती. त्यामुळे मुंबईकर सेनेमागे होते. आता ती तत्परता आहे काय? हा खरा प्रश्‍न आहे. आता मुंबई आणि शिवसेना असा विषय कुठेही चर्चेत आला, तर मुंबईतील रस्त्यांमधील खड्डे, प्रचंड खर्च, लोकांच्या हाती काहीही न लागणे असे विषय चर्चिले जातात. मराठी माणसाचा विषय हातघाईने सोडविण्याचा शारीरिक संघर्षाचा भडक मार्ग अमराठी लोकांना न रुचणारा आहे. त्यामुळे अमराठी लोकांची मुंबईतील वाढलेली मते शिवसेनेला अडचणीत आणणार आहेत. दोन्ही कॉंग्रेसची शक्ती मुंबईत अत्यंत कमी आहे. त्यात गटबाजी आणि परस्परांना धडा शिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे गट ही कॉंग्रेसची अडचण आहे.
सत्ताधारी पक्ष हा एक भारतीय राजकारणातील फार मोठा अनुकूल विषय भाजपाकडे आहे. जो सत्तेत असतो त्याचे प्रचंड आकर्षण भारतीय जनसामान्यांना असते. ‘राजा कालस्य कारणम्’ ही येथील माणसांची श्रद्धा आहे. त्यामुळेच नोटाबंदीनंतर भाजपाच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे, असे भासविण्याचा प्रयत्न तमाम माध्यमे आणि सेना करत असतानाही, नगरपालिका निवडणुकीत भाजपाला पहिल्या क्रमांकाचे यश मिळाले. त्यासाठी भाजपाने काही जीवतोड प्रयत्न केले, संघटनात्मक शक्ती पणाला लावली, आटापिटा केला असे काही दिसले नाही. मात्र, सर्वसामान्य माणसाला सत्ताधारी पक्षाचे जे आकर्षण आहे त्याचा परिणाम या नगरपालिका निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्यात दिसून आला. त्यानंतर आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याचे प्रत्यंतर अनुभवाला येऊ शकते.
राजकारणात आघाडी, युती या अपरिहार्य झाल्या आहेत. मात्र, या आघाड्या आणि युती करताना त्याला तात्त्विक आधार देण्याचा विचारही केला जात नाही. या आघाडी आणि युती तोडतानाही वैचारिक मुद्यांचा विचार केला जात नाही. फक्त राजकीय गणिते, निवडणुकांमधील डावपेच याचाच विचार करून पक्ष एकत्र येतात आणि नंतर विभक्त होतात. वास्तविक युती किंवा आघाडी म्हणून एकत्र येताना सामान्य जनतेच्या भावनेचा, प्रश्‍नांचा विचार केला गेला पाहिजे. युती आणि आघाडी तोडतानाही सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा हिताचा विषय घेऊन संघर्ष केला तर लोकांना कदाचित त्यामागची जनहिताची तळमळ दिसू शकेल. मात्र, तसे न होता अशा प्रकारच्या युती करताना आणि तोडताना तद्दन स्वार्थाचा विचार केला जातो. जनतेला आणि मतदारांना गृहीत धरले जाते. आपण कोणाशीही युती आणि आघाडी केली किंवा तोडली, तर आपल्या मतदारांवर त्याचा परिणाम होईल, असा विचारही या लोकांना शिवत नाही! कालपर्यंत आपण मित्रपक्षाच्या बरोबर होतो आणि आजही आपण सरकारमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून धोरणात्मक निर्णय घेण्यात सहभागी आहोत, हे माहीत असूनही आज ही मंडळी एकदम कठोर भाषा वापरतात, विरुद्ध राजकीय पक्षाची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेचा जो आक्रस्ताळेपणा कालच्या मेळाव्यात आणि आजच्या मुखपत्रात दिसतो आहे तो हेच सांगतो आहे. इतके आक्रस्ताळेपणाने आदळआपट करूनही शिवसैनिक असलेले खासदार, मंत्री, आमदार, राज्यातील मंत्री हे राजीनामे द्यायला तयार नाहीत! एकीकडे विरोधही करत राहायचे आणि दुसरीकडे सत्तेचा मलिदाही डोळे मिटून ओरपत राहायचे अशी ही चाल आहे. भारतीय सामान्य माणूस अशा प्रकारची राजकीय चालबाजी ओळखण्याइतका सुज्ञ आहे. या चालबाजीला बळी न पडण्याइतका समजदार आहे. या दृष्टीने येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक निर्णायक राहणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षाच्या निर्णयाचा कस या निवडणुकीत लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्यावेळच्या निवडणुकीच्या वेळी नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले होते. युती विरोधात सगळे राजकीय पक्ष, असा सामना होता. मात्र, ‘करून दाखविले’ अशा घोषणेसह शिवसेना-भाजपा युतीने त्या वेळी निर्विवाद विजय मिळविला. त्या वेळी शिवसेनेच्या मुखपत्रात पहिल्या पानावरचा मथळा होता, ‘ए नार्‍या, बोल, मुंबई कुणाची?’
आता हाच प्रश्‍न निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कोणी शिवसेनेला विचारू नये म्हणजे झाले!

व्यंकटेश बीडकर