रविवारीच पत्रे

0
155

धरती येे बलिदान की
गणतंत्र दिनाचे औचित्य साधून मनी बी व सोमलवार शिक्षण संस्थेने धरती ये बलिदान की या संगीत-कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणतंत्र दिनाच्या निमित्ताने अनेक संस्था अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असतील. परंतु मनी बी व सोमलवार शिक्षण संस्थेच्या या कार्यक्रमात मेजर गौरव आर्य उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून चीन व पाकिस्तान भारताविरुद्ध करीत असलेल्या कुरापतींचं चित्र उभं केलं. त्यात कुठेही अतिशयोक्ती नव्हती. अतिशय शांतपणे त्यांनी आपलं प्रतिपादन केलं. त्यांनी मांडलेलं चित्र अतिशय स्पष्ट होतं व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची आवश्यकता त्यातून प्रतिपादित होत होती. चीन व पाकिस्तानची ही रणनीती शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर प्रकर्षाने मांडली गेली पाहिजे; ज्यामुळे चिनी वस्तूंवरील बहिष्काराला बळ मिळेल. शिवानी दाणी यांनीही मणिपूरमधील वास्तविकता आपल्या निवेदनातून स्पष्ट केली. पूर्वोत्तर राज्यांमधील सरकारे भाजपा अस्थिर करीत आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु या राज्यांमधील सरकारे का अस्थिर होत आहेत, याची कारणे शिवानी दाणींच्या या निवेदनातून मिळतात. मणिपूरमध्ये काही गावे इतकी दुर्गम आहेत की त्यासाठी १२ किलोमीटरचे जंगल पार करावे लागते. त्या गावातील एखाद्या रुग्णाला मोठ्या रुग्णालयात दाखल करायचे असेल, तर हे एवढे मोठे अंतर जंगल पार करून यावे लागते. गेल्या ७० वर्षात ही गावे रस्त्याने जोडली जाऊ शकली नाहीत. श्री. नितीन गडकरींच्या कानावर ही बाब गेली. त्यांनी २४ तासांत तेथील रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली व कामांना गती मिळाली की नाही, याचा पाठपुरावा ते सातत्याने करीत असतात. त्यामुळेच तेथील लोकमानस आता बदलत आहे. नेशन फर्स्टच्या दिशेने या राज्यांची वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार किती योग्य प्रकारे काम करीत आहे, याचेच हे द्योतक आहे.
मनी बी व सोमलवार शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना अधिक व्यापकता देण्याची गरज आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हिरो, त्यांचे आकर्षण भारतीय सैनिक ठरावे, एवढी ताकद अशा कार्यक्रमांत आहे. त्या दृष्टीनेही मनी बी च्या टीमने नियोजन करावे, अशी त्यांना विनंती आहे. गणतंत्रदिनी मनी बी व सोमलवार शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पिनाक दलाल
नागपूर
सडलेली २५ वर्षे
युतीमुळे शिवसेना २५ वर्षे सडली, हे वाक्यच भयानक आहे. युती म्हणजे विष नव्हे, पण हे होताना मुंबई किती वर्षे विकासाच्या माध्यमातून मागे गेली याचे आत्मपरीक्षण करणे पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले असते. स्व. बाळासाहेब, अटलजी यांच्या विचारकल्पकतेची दृष्टी सध्या कोणाकडेही नाही. तरतूद केलेल्या निधीची कामे जर केली नाहीत, तर मराठी काय कोणत्याच भाषकांची मते पारड्यात ओढणे कठीण आहे. सडण्याच्या क्रियेतून २५ वर्षात आपण बाहेर पडावे असा विचार न येणे ही उत्तम विचारसरणी म्हणायची का? खिशात राजीनामा घेऊन फिरतो आहोत म्हणणारी मंडळी चाचपणी कशाची करीत आहेत? काहीही असो, बीजेपी -शिवसेनेने महाराष्ट्र चालवावा ही समस्त जनतेची अपेक्षा आहे. त्याचा भंग हसत हसत दुःख व्यक्त करणारे असतील त्यांच्या हातात हात घेऊन करू नये. कारण अजूनही मोदींना ७१ टक्के लोकांचा पाठिंबा असल्याचे इंडिया टुडे व कार्वी इन्साइट माध्यमाने घोषित केलेले आहे.
अमोल करकरे
पनवेल
ढेपाळलं गड्या दिग्दर्शन
एका सकस कथासंहितेचं ढिसाळ दिग्दर्शनाने कसं टायटॅनिक होतं याचा नमुना म्हणजे झी मराठीवरील सिरीयल… माझ्या नवर्‍याची बायको! राधिका शनायाची चांगली गाठ उतरवेल याची बिच्चारे दर्शक वाटच बघत राहिले! काय ते राधिकाचं पात्र. एक नंबरची आगाऊ… आरंभशूर वल्गना करणारी… डोळे झाकून विश्‍वास टाकणारी, भोळसट उत्साह दाखवत प्रसंगी स्वाभिमान सोडून अगतिक आर्जव करणारी… भारतीय नारी अशी कमी पडताना का दाखवायची?
राधिकाच्या समर्थक बघा तरी… पोरकट उपाय सुचवणारे माजी संपादक महाजनी, लुटुपुटुची खेळी करणारे नाना-नानी, कचखाऊ रेवती, मुखदुर्बल सोसायटीप्रमुख सुबोध गुप्ते आणि भरीस भर तो गॅरीचा भडकू बाप ढाण्या वाघ नसून चक्क कागदी वाघ निघाला की हो! गॅरीला बेदखल करून राधिकाच्या नावे प्रॉपर्टी केल्याचा डायलॉग तरी मारायचा…असो. शनायाने भूमिकेला बराच न्याय दिलाय् ही जमेची बाजू! टायटल सॉंगमधील दृश्य सिरीयलमध्ये कुठेच न येणे याला काय म्हणावे?
मुंबईच्या शनायापुढे नागपुरी राधिका दमदार दाखवायला अजूनही वाव आहे … जमेल?
मोहन बा. देशपांडे
चंद्रपूर
१२५ कोटी भारतीयांची फौज!
वैताग आलाय त्या सीमेवरील धुमश्‍चक्रींचा… किती हो संयम पाळायचा आम्ही? एकतर्फी शांततेचे, चांगल्या संबंधांचे, शेजारधर्माचे बंधन आम्हीच पाळायचे का? कितीदा ठणकावून सांगायचे तुम्हाला? नुकतंच पाहिलं ना, आमच्या देशाच्या एका आव्हानाने एकटे पडलात तुम्ही. १२५ कोटी देशभक्तांची फौज तुटून पडेल ना एके दिवशी! आमच्याच देशाने कितीदा संयम पाळायचा? तुमच्याकडे जेवढे युद्धसाहित्य आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त साहित्य आम्ही गणराज्य दिनाच्या कार्यक्रमात प्रदर्शनीत ठेवतो. सार्‍या जगाचे लक्ष तेव्हा आमच्या वैभवाकडे असते. शांतता, संयम आमची संस्कृती असली, तरीही आमच्या शौर्यगाथा इतिहासात अजरामर आहेत, हे विसरलात का? तेव्हा गणराज्य दिनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते, आमच्या देशाच्या संयमाचा अंत पाहू नका, शेजारधर्म पाळा अन्यथा आमच्या प्रत्येक सैनिकामागे १२५ कोटी भारतीयांची फौज समर्थपणे उभी आहे, हे विसरू नका!
अखिल सु.देशपांडे
अकोला
सिद्धूचे कॉंग्रेसवासी होेणे…
क्रिकेटजगतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू, वाक्पटू, शायरीबाज, राजकारणातील अनुभव घेतलेले व छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटी नवज्योत सिद्धू नुकतेच कॉंग्रेसवासी झाले व कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत. कॉंग्रेस पक्षात गेल्यामुळे त्यांना ‘स्वर्ग-वासी’ झाल्यासारखे वाटत असावे. कारण मूळ पिंड कॉंग्रेसचाच! -इति सिद्धूजी. त्यामुळे ते कॉंग्रेस पक्षात गेल्यामुळे घरवापसी झाली. मग मध्यंतरी भाजपाच्या रांगेत येऊन राज्यसभा सदस्य म्हणून भाजपाची तारीफ, हिंदुत्वाची डरकाळी फोडण्याचे कारण काय? भाजपात घुसमट होत होती काय? कारण भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष, नैतिकतेबद्दल सजग. त्यामुळे छोट्या पडद्यावर हास्यविनोदात, शेरोशायरी करण्यावर बंधन येत असल्यामुळे शिस्त मानवली नाही की काय? की केलेल्या अपराधाला भाजपाकडून माफी मिळणार नाही व बेछूटपणे वागता येणार नाही, याची भीती वाटली की काय? आपले राजकीय मत, शेरोशायरीमधून लोकांच्या मनाचा ठाव घेणारे वक्तव्य एकदम शेळीसारखे मवाळ होऊन पक्षबदल करते कसे झाले? कॉंग्रेस पक्ष आता कमजोर झालेला आहे. कोणी तडफदार नेता पक्षात उरला नाही, मग आपली वर्णी सहज लागेल व मंत्रिपदावर आरूढ होता येईल, या स्वार्थ हेतूने तर पक्षबदल नाही ना! सिद्धू ज्या आशेने पक्षबदल करते झाले, ती आशा फलद्रूप होवो व लोककल्याणासाठी त्यांचे कार्य यशस्वी ठरो, ही शुभेच्छा!
मधुसूदन भावे
वरोरा
ऑनलाईन व्यवहारासाठी जागरूकता आवश्यक
नोटाबंदीच्या निर्णयानंतर समाजाच्या विविध स्तरांतील लोकांनी ऑनलाईन व्यवहाराबाबत उत्सुकता दाखवण्यास सुरुवात केली. कार्ड स्वाईप करून वा पेटीएमसारख्या ऍपचा वापर करून व्यवहार करण्याकडील कल वाढला. देशात कॅशलेस व्यवहाराला चालना मिळू लागली. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने देशात ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली. हे योग्यच आहे.
पण ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ किमान चार-सहा महिने तरी शहरी मध्यमवर्गालाच होणार, हे स्पष्ट आहे. कारण ग्रामीण भागात या सवलती जाऊन, त्या सुरू होऊन लोकांनी स्वीकारणे, तसेच उपयोगात आणणे याला बराच काळ लागणार आहे. तोपर्यंत शहरी उच्च उत्पन्नाच्या लोकांना अनुदानित सुविधा आणि ग्रामीण भागाला मात्र अशा सवलतींचा अभाव, असे चित्र समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरे तर शहरातील छोट्या उद्योगांपासून शेती आणि ग्रामीण भागातील उद्योग यांच्यापर्यंत ही नवीन प्रणाली पोहोचत नाही आणि रुळत नाही तोपर्यंत त्यांना नगदी रकमांनी व्यवहार करणे अपरिहार्य होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ग्रामीण भागातील बहुतांश जनता बँकिंग व्यवहाराबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकांवर अवलंबून असते. ग्रामीण भागातच ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या प्रत्येक घरी सरकारी बाबूंना पाठवून डिजिटल प्रणाली समजावून सांगितली पाहिजे.
आपल्या सरकारचे चलन वाचवून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे म्हणजे डिजिटल माध्यमातून जास्तीत जास्त वित्तीय व्यवहार करण्याचे उद्दिष्ट हे एक प्रगतीचे पाऊलच आहे, यात संशय नाही. परंतु सरकारने त्यासाठी पुरेशी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय तयारी करण्याची आणि कोणतीही डिजिटल प्रणाली असो, ती सुरक्षित आणि पारदर्शी असली पाहिजे.
प्रा. मधुकर चुटे
नागपूर
भारतीय शिक्षण मंडळाचा उपक्रम
शिक्षणात व पाठ्यक्रमात परिवर्तन व्हावे असे सर्वच पालक, अध्यापक व विद्यार्थी या सर्वांनाच वाटत आहे. त्याला अनुसरून भारतीय शिक्षण मंडळाने पाठ्यक्रम व शिक्षण पद्धतीत भारतीयता असावी, या दृष्टीने या वर्षापासून नवीन पाठ्यक्रम निर्माण करण्याचे कार्य प्रारंभ केले आहे. हे कार्य करण्यासाठी प्रत्येक प्रांतातील विभिन्न विषयांच्या विशेषज्ञांना समाविष्ट करून समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून असे पाठ्यक्रम तयार केले जाणार आहेत. पाठ्यक्रम व शिक्षण पद्धतीची निर्मिती अशा प्रकारची असावी की, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा समग्र व्यक्तित्व विकास व राष्ट्रीय एकात्मतेसोबत त्याचा भावनात्मक विकास निश्‍चितपणे होऊ शकेल. सत्त्व व रजसला त्यांच्या जीवनात प्राधान्यता राहील. निष्काम भावनेने करण्याच्या कार्याला समजून समाजाभिमुखतेने संपूर्ण कर्तव्यभावनेने करण्याची प्रेरणा या पाठक्रमातून निर्माण होईल असा सर्वस्पर्शी पाठ्यक्रम निर्माण केला जाईल. हा पाठ्यक्रम १६ विद्या व ६४ कला यात कमीतकमी एक विद्या व एक कला यात प्रावीण्य निर्माण होईल असा असेल. अशा पाठ्यक्रमासाठी खालील विषय निवडण्यात आले असून, असा पाठ्यक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करावयाचा आहे. त्यासाठी निवडण्यात आलेले विषय याप्रमाणे-
इतिहास, समाजशास्त्र, दर्शनशास्त्र, राज्यशास्त्र, मनोविज्ञान, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यूहरचनात्मक अभ्यास, शिक्षण व शिक्षण पद्धती, मानवकर्तव्य व अधिकार, भूगोल, हिंदी साहित्य, इंग्रजी साहित्य, संस्कृत साहित्य, क्षेत्रीय साहित्य, नाट्यकला, नृत्यकला, संगीत व गायन, चित्रकला, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भारतीय तंत्रज्ञशास्त्राचा इतिहास, कम्प्युटर प्रोग्रॅममध्ये संस्कृत, मानवशास्त्र, खाद्यविज्ञान, गृहविज्ञान, कृषिशास्त्र, पर्यावरण विज्ञान, संशोधन पद्धती, पर्यटन, आपात्कालीन सेवा प्रबंधन, उद्योजकता विकास, पत्रकारिता व संचार, वित्तीय प्रबंधन, नैतिकशास्त्र, स्थापत्य व वास्तुकला, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि विधिशास्त्र.
विशेषज्ञांना विनंती आहे की, त्यांनी आपले योगदान देण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
डॉ. गोविंद नि. हडप
शरद यादव यांची मुक्ताफळे…
मुलींच्या अब्रूपेक्षा मते महत्त्वाची, असे शरद यादव म्हणाले. नंतर कितीही सावरासावर केली, तरी ‘बुंदसे गयी वो हौदसे नही आती’ यादवसाहेब! तुम्हाला मुलगी आहे. अब्रू म्हणजे काय, हे माहीत आहे. अब्रू वाचविण्यासाठी पद्मिनीने जोहार केला होता. अनेक स्त्रियांनी कुंडात, विहिरीत उड्या घेतल्या. आजही अनेक स्त्रिया अब्रूसाठी आत्महत्या करतात. शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रियांच्या अब्रूला धक्का लावणार्‍या लोकांना मृत्युदंड होता. याउलट, निवडणूक हारलो तरी चालेल, परंतु माता-भगिनींच्या अब्रूला कुणाला हात लावू देणार नाही, या वाक्याने अर्धी निवडणूक जिंकली असती. ५० टक्के महिला मतदान करतात. त्यांच्या अब्रूचे तुम्ही धिंडवडे काढले. धिक्कार आहे तुमचा. स्त्रीची अब्रू तिच्यापुरती मर्यादित नाही. त्यावर कुटुंब, समाज, राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे.
यत्र नार्यस्तू पूजन्ते… हे तुम्हाला माहीत नसावे. जो स्त्रीच्या अब्रूपेक्षा मत श्रेष्ठ समजतो, त्याला स्त्रियांचे मत नाही. भारतीय स्त्री कुटुंबाची, समाजाची, राष्ट्राची, मान व शान आहे. जे स्त्रियांना मान देत नाहीत, ते राज्यकारभार काय चालविणार? शरद यादवजी, तुम्ही निवडणुकीपूर्वीच बाराच्या भावात गेलात! आमच्या अब्रूचे मोजमाप करणारे तुम्ही कोण? तुम्ही आमच्या अब्रूचे मोजमाप केले, आम्ही तुम्हाला मतदान न करता तुमचे मोजमाप करू.
निर्मला गांधी