राहुलची राजनीती न्यारी, हतबल आई बिचारी!

0
124

नियतीचा खेळ किती विचित्र असतो बघा. क्षणात होत्याचं नव्हतं अन् नव्हत्याचं होतं करण्याची अकल्पित महान किमया केवळ दैवगतीच करू शकते. सत्ता, वैभव, सार्वभौम अधिकार, सामाजिक, राजकीय, आर्थिक सुपन्नावस्थेत दैवयोगाने जन्माला आलेल्या राहुल गांधीचं भाग्य २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या झंझावातात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयी त्सुनामीत क्षणार्धात भुईसपाट झालं. नशिबी आली वणवण, भटकंती अन् व्यर्थ वायफळ वटवट. राजकीय पटलावरील नौटंकी. या विपन्नावस्थेला कारणीभूत असलेल्या नरेंद्र मोदींचा विद्वेष व आकस. अत्यंत असभ्य, अश्‍लाघ्य, असंस्कृत, संस्कारहीन. पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची अवहेलना करणार्‍या अशोभनीय शब्दांत मोदींवर आगपाखड, हा राहुलबाबांचा नित्याचा व्यवसाय झाला आहे. भारतीय संस्कृतीत ईश्‍वरप्राप्तीसाठी नवविधाभक्तीची सात्त्विक व तात्त्विक उपासना प्रचलित आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी राहुलने मात्र अनोखी मोदी विरोधभक्तीची कास धरली आहे.
लोकशाहीत सत्तापक्षावर टीका-टिप्पणी अभिप्रेत आहे. नव्हे ते सशक्त, परिणामकारक प्रभावी गमक आहे. लोकशाहीत सत्तापक्षावर अंकुश ठेवण्याचे महान अस्त्र आहे. या घटनात्मक अस्त्राचा विधायक उपयोग करण्याचे तारतम्य विरोधकांना असणे आवश्यक आहे. त्याला राजधर्म, सभ्यता, शिष्टाचार, प्रतिष्ठा व लोकतंत्राच्या परिसीमा अभिप्रेत आहेत. नेमकी याचीच उणीव राहुल गांधी यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामतः त्यांच्या विरोधाचे गांभीर्य बोथट होत आहे. राहुल गांधी यांचा मेळावा हे करमणुकीचे साधन झाले आहे. राहुललीला झाली आहे.
नाताळाच्या सुटीचा आस्वाद, आनंद घेऊन विदेशातून परतल्यावर, निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणार्‍या राजकीयदृष्ट्या (अ)परिपक्व राहुल यांनी, उत्तराखंडातील हृषीकेश येथील प्रचारसभेत वेगळ्याच अंदाजात नरेंद्र मोदींवर टीका केली. आपल्या बालिशपणाचे ओंगळवाणे प्रदर्शन जनसभेत केले. पांढर्‍याशुभ्र, परीटघडीच्या कुर्त्याच्या खिशात हात घालून फाटके कपडे जनतेला दाखविले. ‘‘बघा, माझे कपडे फाटतात, पण मोदींचे फाटत नाहीत. चकाचक किमती कपडे घालून मोदी गरिबांचे राजकारण कसे काय करू शकतात?’’ असे विधान करून आपल्या अज्ञानाचे, अल्प बुद्धीचे, अव्यवहार्यतेचे जाहीर प्रकटीकरण केले. राहुल, यालाच दैवयोग म्हणतात!
पंतप्रधान मोदींचे भाग्य फळफळले. भाग्यविधात्याचा त्यांना कृपाप्रसाद लाभला आहे. दिल्लीचे राजसिंहासन प्राप्त झाले आहे. परंतु, नियतीच्या अवकृपेने तुमच्या कुकर्माचे फळ म्हणून तुमच्या दुर्दैवी जीवनप्रवासाला सुरुवात झाली आहे. यालाच म्हणतात दैवयोग! भविष्यात आपल्या अंगावर कमीत कमी चांगले कपडे तरी राहावे, अशी भाग्यविधात्याकडे प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. नाहीतर तुम्ही कोणत्या थराला जाल व काय नौटंकी कराल, याचा काही भरवसा नाही. तुमचा पोरकटपणा भारतीयांना नवीन नाही. लाडा-कौतुकात वाढलेल्या तुमच्या जीवनाचा तो स्थायीभाव आहे. अविभाज्य अंग आहे.
कॉंग्रेसची सत्ता असताना तो नित्यनियमाने चालत होता. तुम्ही काहीतरी पोरखेळ करावा आणि तत्कालीन कॉंग्रेस सत्ताधार्‍यांनी, स्वजनांनी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करावे, हा नित्याचा परिपाठ होता. आता तुमच्या दुर्दैवाने देशात सत्तांतर झाले आहे. कॉंग्रेसने सत्ता गमावली आहे. कर्मठ-कर्तव्यदक्ष ‘जनसुखाय-जनहिताय’ सदासर्वकाळ कार्यरत असणारे पंतप्रधान मोदींचे भाजपाप्रणीत सरकार आले आहे. जनकल्याण व देशविकासाला प्राधान्य आहे. व्यक्तिमाहात्म्याचा अध्याय संपला आहे. तुमच्या पोरकटपणाकडे लक्ष द्यायला, कौतुक करायला त्यांना कुठे वेळ आहे? याची जाणीव एव्हाना व्हायला हवी होती. फाटक्या कपड्यांनी किंवा गरिबांच्या झोपडीत भोजन केल्याने, खाटेवरील बैठकांनी गरिबांचे हितचिंतक होता येत नाही. त्यासाठी अंतःकरणात गरिबाविषयी संवेदनशीलता, तळमळ, मायेचा ओलावा, ऊब असायला हवी. राजकीय मंचावरील या राहुललीला आता थांबवा. वास्तवतेची जाण ठेवा. जबाबदारीने वागा. त्यातच पक्षाचे व आपले हित समाविष्ट आहे. कॉंग्रेसच्या सत्ताकाळात गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर समाजघटक व्यापक प्रमाणात उपेक्षित राहिला. कॉंग्रेसजवळ गांधी घराण्याबाहेरचे प्रभावी सक्षम, कर्तृत्ववान नेतृत्व अद्यापतरी उदयाला आले नाही. उदयाला येऊ दिले नाही. ‘कॉंग्रेस का हाथ गरिबों के साथ’ ही एक फसवी वल्गना राहिली. प्रत्यक्षात कॉंग्रेसच्या हाताने गरिबांच्या खिशावर डल्ला मारला. त्यांना दारिद्र्यरेषेवर उभे केले तेव्हा हे राजकीय नक्राश्रू कुठे दडले होते?
हीच दुर्गती १३० वर्षांचा प्रतिष्ठित वारसा, उज्ज्वल परंपरा लाभलेल्या कॉंग्रेस पक्षाची आज झाली आहे. नेहरू-गांधी घराण्यातील असूनही राहुल गांधी सातत्याने अपयशी ठरले आहेत. कॉंग्रेसजवळ गांधी घराण्याबाहेरचे प्रभावी, सक्षम, कर्तृत्ववान नेतृत्व उदयाला आले नाही. नव्हे, बुद्धिपुरस्सर उदयाला येऊ दिले नाही. पक्षाने राष्ट्रीयत्व गमावले आहे. पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावर उभा राहू शकत नाही, अशी विकलांग अवस्था झाली आहे. स्थानिक, प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घेऊन अस्तित्वासाठी धडपडत आहे. बिहारमध्ये महागठबंधनाचा आधार घेऊन पक्ष जिवंत आहे. जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या उत्तरप्रदेशात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा उसणा आत्मविश्‍वास गळून पडला आहे. पारिवारिक यादवीने ग्रासलेल्या सपापुढे शरणागती पत्करून आघाडी केली आहे. तीदेखील आत्मसन्मानाशी तडजोड करून- सपाच्या अटीवर व ध्येय-धोरणावर! कॉंग्रेसची ती एक राजकीय अगतिकता होती. विफलता होती. कॉंग्रेसचा जनाधार सर्वत्र घसरला आहे. पक्ष नामशेष होऊ पाहत आहे. स्थानिक पक्षही कॉंग्रेससोबत आघाडी करण्यास विशेष उत्सुक नाहीत. कॉंग्रेसबरोबर आघाडी घातक व स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतल्यागत असल्याची धास्ती त्यांना सतत भेडसावीत आहे. नेहरू, गांधी घराण्यामुळे कॉंग्रेस पक्ष जिंकतो, हा समज आजमितीला कालबाह्य झाला आहे. सध्या कॉंग्रेसची स्थिती दयनीय झाली आहे. पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जवळपास गमावली आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाने निष्ठावंतांची तशी कदरही केली नाही. देशाच्या बहुतेक राज्यांतून आणि केंद्रातूनही कॉंग्रेस सत्ताभ्रष्ट झाली आहे.
कॉंग्रेसच्या या अधोगतीला जबाबदार कोण? जनतेचा विश्‍वास पुन्हा कसा प्रस्थापित करता येईल, कॉंग्रेस नेता व कार्यकर्त्यांचे मनोबल कसे उंचावेल, या संबंधात संघटनात्मक, रचनात्मक, ध्येय-धोरणात्मक गांभीर्याने विचार करण्याची नितान्त गरज आहे. ज्या पक्षाने नेहरू-गांधी घराण्याला प्रदीर्घ काळ सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थैर्य, मानसन्मान दिला, त्या पक्षाला पुनर्जीवित करणारा कर्तबगार, सक्षम, सर्वमान्य, राजकीय नेता आजतरी गांधी घराण्यात किंवा कॉंग्रेस पक्षात नसावा, ही फार मोठी शोकांतिका आहे.
राहुलच्या या पोरकट चेष्टांनी अथवा पंतप्रधान मोदींची विरोधभक्ती करून गमावलेला आत्मसन्मान, विश्‍वास परत मिळविता येणार नाही. कॉंग्रेस पक्षाची सर्वत्र व सर्व स्तरावर होत असलेली ससेहोलपट, विफलता, अवमान बघून ‘राहुलची राजनीती न्यारी, हतबल आई बिचारी!’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे…
दिगंबर शं. पांडे,९४०३३४३२३९