साप्ताहिक राशिभविष्य

0
512

रविवार, २९ जाने. ते ४ फेब्रुवारी २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, ३० जानेवारी : जमादिलावल (मुस्लिम) मासारंभ, महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिन, संत झेबुजी महाराज पुण्यतिथी यात्रा- जागजई (यवतमाळ), भगवान मार्कंडेय जयंती- अचलपूर, मंगळवार, ३१ जानेवारी ः तिलकुंद-विनायक चतुर्थी, अंगारक योग, श्री गणेश जयंती, वरद चतुर्थी, भद्रा १६.०९ ते २७.३८, श्री सिद्धेश्‍वर महोत्सव, सिद्धेश्‍वर वाडी- नागपूर, बुधवार, १फेब्रुवारी : वसंत पंचमी, विठ्ठल रखुमाई यात्रा- धापेवाडा, सखाराम महाराज पुण्यतिथी- इलोरा (बुलडाणा), गुरुवार, २ फेब्रुवारी : संत मारोतराव मालेगावकर पुण्यतिथी- नागापूर (नांदेड) , शुक्रवार, ३ फेब्रुवारी : रथसप्तमी, श्री नर्मदा जयंती, भद्रा प्रारंभ २२.४७, नानाजी महाराज दहीहांडी यात्रा- कापशी (वर्धा), नाथ नंगे महाराज यात्रा- डव्हा (अकोला), जागतिक सूर्यनमस्कार दिन, शनिवार, ४ फेब्रुवारी : दुर्गाष्टमी, भीमाष्टमी, भद्रा समाप्त ९.४५, भगवती येवलेकर स्वामी पुण्यतिथी- कोपरगाव, बेंडोजीबाबा यात्रा – भुईखेड (अमरावती).

मेष : आर्थिक पेच संभवतो
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशिस्वामी मंगळ व्ययस्थानात आहे. त्याच्या सोबतीला नुकताच शुक्र आलेला आहे. या दोघांवरही गुरूची शुभ दृष्टी आहे. शनि राश्यंतर करून भाग्य स्थानात आलेला आहे. चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर धन स्थानात येईल. मंगळ-शुक्र व्ययात असल्याने खर्चवाढ होऊन काहीशी आर्थिक ओढाताण सहन करावी लागू शकते. मान, सन्मान, प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न राहील, यामुळे अहंकार बळावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कार्यालयीन कामकाजात अडथळे, वादविवाद निर्माण होऊ शकतात. मनस्ताप वाढतील. प्रकृतीसंबंधी काही तक्रारी राहू शकतील.
शुभ दिनांक- ३०,३,४.
वृषभ : प्रवास योग संभवतात
आपला राशिस्वामी शुक्र नुकताच लाभ स्थानात मंगळासोबत आलेला आहे. येथे शुक्र स्वतःच्या उच्च राशीत आहे. आपला योगकारक शनी नुकताच राश्यांतर करून अष्टम स्थानात बुधासोबत आलेला आहे. चंद्र या आठवड्यात भाग्य स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर आपल्याच राशिस्थानात येईल. शुक्र-मंगळ धनलाभासाठी निश्‍चितच उत्तम असले तरी ते प्रकृतीला त्रास निर्माण करू शकतात. दगदगीची कामे, प्रवास योग संभवतात. कार्यालयात जबाबदारी सांभाळताना मेटाकुटीस याल. प्रकृतीसंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्यास दुर्लक्ष करू नका. आपसात मतभेद, गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथून : नोकरी-व्यवसायात प्रगती
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशिस्वामी बुध सप्तमस्थानात आहे. मात्र, लवकरच म्हणजे ३ फेब्रुवारीला तो राश्यांतर करून अष्टमातील मकर राशीत जाईल. शनी नुकतेच राश्यांतर करून तो आपल्या सप्तम स्थानी आलेला आहे. चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो व्यय स्थानात जाईल. कुटुंबात काहीसे मतभेद, जोडीदाराशी मतभिन्न्ता, जोडीदाराची तसेच घरातील ज्येष्ठ महिलावर्गाची प्रकृती सांभाळावी लागू शकते. गुरू मात्र नोकरी-व्यवसायात प्रगती दर्शविणारा आहे. स्वतंत्र व्यवसाय करणार्‍यांचा उत्कर्ष संभवतो. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी मात्र दक्षता घ्यावी. स्वतः सर्व व्यवहारांवर नजर ठेवावी. शुभ दिनांक- ३०,३१,२.
कर्क : कामाचा ताण वाढेल
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी सप्तम स्थानात रविसोबत आहे व आठवडाअखेर तो लाभ स्थानात येईल. राश्यांतरानंतर शनी नुकताच षष्ठ स्थानी बुधाच्या सोबतीला आलेला आहे. भाग्यस्थानात मंगळ व शुक्र विराजमान असून त्यांच्यावर गुरूची शुभकारक दृष्टी आहे. हा आठवडा आपणास काहीसा कसोटीचा असू शकतो. शनी आपल्याला प्रकृतीची काळजी घेण्यास सुचवत आहे. नोकरी-व्यवसायात तणावपूर्ण वातावरण राहील. प्रकृती साथ देणार नाही व कामाचा ताण वाढेल. अशा काळात सहकार्‍यांशी सलोखा ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. त्यांच्या मदतीने अडचणीतून मार्ग निघू शकेल. कुटुंबाचे सहकार्य मिळत राहील. शुभ दिनांक- २९,१,२.
सिंह : दगदग, मनस्ताप संभवतो
आपला राशिस्वामी रवि षष्ठात असून राशीस्थानी राहू आहे. धनस्थानात गुरू आहे. तर नुकतेच राश्यांतर करून शनी पंचमस्थानात येऊन बुधाची सोबत करीत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र षष्ठ स्थानात रविसोबत असून तो आठवडाअखेर दशम स्थानात येईल. नोकरी-व्यवसायात काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. भागीदारीत नुकसान संभवते. परदेश वारीच्या प्रयत्नात अडथळे येण्याची संभावना आहे. कोर्टाची कामे, सरकारी कामे यात अडथळे येतील. दगदग, मनस्ताप वाट्याला येऊ शकतो. या सार्‍यात आर्थिक बाजू सावरलेली राहील. खूप लाभ नसला तरी कमी देखील पडणार नाही. आर्थिक प्रतिष्ठा टिकून राहील.
शुभ दिनांक- २९,३०,३१.
कन्या : उत्साह टिकून राहील
आपला राशिस्वामी बुध या आठवड्याच्या सुरुवातीला सुखस्थानात असून नुकतेच राश्यांतर केलेला शनी त्याच्या सोबतीला आहे. राशिस्थानात गुरू मुक्कामास आहे. चंद्र पंचम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो भाग्यस्थानात जाईल. दरम्यान, बुध तो ३ फेब्रुवारीला राश्यांतर करून पंचम स्थानात जाणार आहे. साधारण अनुकूल अशी ही ग्रहस्थिती आपल्या कामकाजात प्रगती, नोकरी-व्यवसायात उद्दिष्टपूर्ती करून उत्साह टिकून राहील. तथापि कौटुंबिक वातावरणाला तडा द्यायचा प्रयत्न होऊ शकतो. प्रिय व्यक्तींशी कलह टाळा. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. भागीदारीच्या व्यवसायात मात्र सावध राहा.
शुभ दिनांक- २९,१,२.
तूळ : आर्थिक व्यवहारात सावध
आपला राशिस्वामी शुक्र नुकतेच राश्यांतर करून षष्ठ स्थानात आलेला आहे. जवळपास त्याच्यासोबत राश्यांतर करणारा शनी पराक्रम स्थानात आहे, तर व्ययस्थानात गुरू आहे. चंद्र या आठवड्याच्या सुरुवातीला सुखस्थानात असून तो आठवडाअखेर अष्टम स्थानात जाईल. विरोधकांच्या कारवायांना काहीसा जोर चढू शकतो. त्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न करा. जमीन-जुमल्याची कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार सावधपणे करावीत. मोठे आर्थिक व्यवहार पूर्णतेस नेताना सावध राहावे. प्रकृतीविषयक अल्पशी चिंता निर्माण होऊ शकते. काहींना लांबच्या प्रवासाचे योग यावेत. विदेश गमनाची इच्छा बाळगणार्‍यांनी प्रयत्नांचा वेग वाढवावा.
शुभ दिनांक- ३०,३१,१.
वृश्‍चिक : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष
आपला राशिस्वामी मंगळ पंचम स्थानात नुकतेच आगमन झालेल्या शुक्रासोबत आहे. नुकतेच आपल्या राशीतून बाहेर पडलेला शनी धनस्थानी आहे. गुरू आपल्या लाभस्थानात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आपल्या पराक्रम स्थानात असून तो आठवडाअखेर सप्तम स्थानी येणार आहे. उत्कर्षाच्या मार्गातील सार्‍या अडचणींचा निपटारा करण्यास समर्थ असे योग या आठवड्यात लाभले आहेत. मात्र, मध्यात काही अडचणी डोके वर काढू शकतात. पण त्या अल्पजीवी ठरतील. सहकार्‍यांशी सहयोग कायम ठेवा. शत्रूच्या कारवायांवर वेळीच अंकुश घाला. आर्थिक आघाडीवर समाधानाचे वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
शुभ दिनांक- ३१,१,२.
धनू : आर्थिक आघाडीवर समाधान
आपला राशिस्वामी गुरू दशम स्थानात असून बुध आपल्या राशीत कायम आहे. नुकतेच राश्यांतर करून शनी व्ययस्थानातून आपल्या राशीत आलेला आहे. तर सध्या आपल्या राशीत असलेला बुध ३ फेब्रुवारीला राश्यांतर करून धनस्थानात जाणार आहे. चंद्र धनस्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर षष्ठात येणार आहे. या आठवड्यातील ग्रहयोग पाहता काहींना आरोग्य व नोकरीबाबत काही त्रास उत्पन्न होऊशकतात. पोटाचे त्रास, एखादी छोटी-मोठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. आर्थिक आघाडीवर मात्र समाधानाचे वातावरण राहील. मंगल-शुक्र सहवास कुटुंबात अचानक काही मंगलक्षण घेऊन येऊ शकतात. शुभ दिनांक- २,३,४.
मकर : व्यवसायात सावकाश प्रगती
आपला राशिस्वामी शनी नुकतेच राश्यांतर करून व्ययस्थानात आलेला असून राशिस्थानी रवि आहे. पराक्रम स्थानात योगकारक शुक्र व मंगळ आहेत तर भाग्य स्थानात गुरू आहे. अष्टमस्थानात राहू अनिष्ट कारक आहे. राशीतून चंद्र भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर पंचम स्थानात येणार आहे. कुटुंबात मतभेद, नोकरी-व्यवसायात संघर्ष, वादविवाद, घरापासून दूर असे प्रसंग उद्भवतात. व्यवसायात सावकाश प्रगती होऊ लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासयोग यावा. काहींना पदोन्नती, अधिकारवाढ मिळू शकते. कुटुंबात एखादे मंगलकार्य घडावे. मित्र-पाहुण्यांच्या सहवासात कुटुंबातील वातावरण सौहार्द्रपूर्ण होण्यास हातभारच लागेल.
शुभ दिनांक- २९,३०,३.
कुंभ : सर्वांशी जुळवून घ्या
आपला राशिस्वामी शनी नुकताच लाभस्थानात आलेला असून राशीत केतू आहे. गुरू अष्टमात आहे, तर योगकारक शुक्र मंगळाच्या सोबतीने धनस्थानात आहे. रविसोबत व्यय स्थानात असलेला चंद्र या आठवड्यातील भ्रमण सुरू करीत तो आठवडाअखेर सुखस्थानी जाईल. विशेषतः मुलांच्या संबंधाने काही काळजी किंवा मतभेदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मंगळ स्वभावात जरा तीव्रता निर्माण करणार असला तरी सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, तर काही त्रास आपच कमी होऊ शकतील. कोणाचेही मन बोलून दुखवू नका. कुसंगती, व्यसने टाळण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी. काही लाभ पदरी पडतील. शुभ दिनांक- २९,३०,३१.
मीन : कुटुंबातील वाद मिटावेत
राशिस्वामी गुरू सप्तमस्थानात असून राशिस्थानी मंगळ आणि नुकताच आलेला शुक्र आहे. शनि राश्यंतरानंतर दशम स्थानात आलेला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला रविसोबत असलेला चंद्र आपल्या लाभ स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो शेवटी पराक्रम स्थानात जाणार आहे. कुटुंबातील वाद, मतभेद सामोपचाराने मिटू शकतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समाधानाचे, आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विशेषतः युवावर्गाला मंगलकार्याचे योग संभवतात. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. व्यावसायिक स्पर्धेत आघाडी राहील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील. कौतुक-मानसन्मानाचा लाभ मिळेल.
शुभ दिनांक- १,२,३.