खरं सुख…

0
266

रात्रीचे ९॥ वाजले होते. उद्विग्न मनाने मीना गणपतीच्या देवळात बसली होती. सकाळपासून तिने काही खाल्लं नव्हतं. घराच्या अगदी बाजूलाच हे देऊळ होतं. आई-बाबांचं बोलणं ऐकून ती खूप उदास झाली. काय करावं, काय नको तिला सुचत नव्हतं. ‘‘जेवून घे’’ आईने एक-दोनदा म्हटलं, पण त्यात आग्रह, आर्जव, प्रेम नव्हतं. आजकाल घरात असे वाद जास्तच ऐकायला येत होते. आज ३२ वर्षांची झाली ही पोर! किती स्थळं दाखविली, पण हा काय काळा, हा काय बावळट, कोणाची बोलण्याची पद्धत चांगली नाही, तर कोणी स्मार्ट नाही म्हणून अनेक स्थळं हिने नाकारली. आता मुलांचं येणं बंद झालं. ‘‘ही स्वत:ला काय अप्सरा समजते की काय?’’- आई तावातावाने बोलत होती. ‘‘मीसुद्धा आता थकत चाललो. सेवानिवृत्त झालो. साठवलेले पैसे किती दिवस पुरणार? लग्न, हुंडा याकरिता खर्च तरी किती करणार? जरा तडजोड नाही. एक-एक मुलगा नाकारत तिशी ओलांडली.’’ आई-बाबांचा संवाद कानावर पडला. ती खोलीत आली. सहज तिची नजर आरशावर पडली आणि ती दचकलीच. कसे दिसतो आहोत आपण! चेहर्‍यावरची, शरीरावरची तारुण्याची झळाळी उतरली. डोळ्याभोवती काळी वर्तुळं आली. शरीरावर अतिरिक्त चरबी जमली. किती फरक पडला आपल्यात! कॉलेजमध्ये असताना किती सुंदर दिसायचो आपण! आकर्षक बांधा, उजळ, तजेलदार कांती, पण हा तर भूतकाळ झाला. चटकन ती आरशापुढून बाजूला झाली. सगळं कसं नकोसं वाटायला लागलं. जेवणावरची वासना उडाली. आईने एकदाच जेवायला बोलावलं. नाही म्हटल्यावर आग्रह केला नाही. मीनाच्या वागण्याने दोघेपण दुखावली होती. हिला कोणता राजकुमार पसंत पडणार कोण जाणे? लग्न तरी होईल का हिचं? इथपर्यंत आई-बाबांचे विचार आलेत. मन शांत करण्याकरिता ती देवळात येऊन बसली. ‘‘अगं! एवढ्या रात्री इथे काय बसलीस’’- शेजारच्या रघूच्या बोलण्याने ती भानावर आली. ‘‘मुलींनी असं रात्री-अपरात्री घराबाहेर राहू नये. जेवण झालं कां तुझं.’’ तिने नकारार्थी मान हलविली. त्याच पावली रघू माघारी वळला. १० मिनिटांत एका डिशमध्ये ४ इडल्या, चटणी, सांबार घेऊन आला. ‘‘खाऊन घे. बरं वाटेल तुला. उपाशी राहू नको.’’ त्याच्या बोलण्यातील प्रेमाने, आर्जवाने मीनाच्या मनावर हळुवार फुंकर घातली. इतक्या प्रेमाने आजकाल तिच्याशी कोणी बोलतच नव्हतं. तिच्याही नकळत तिचे हात प्लेटकडे वळले. ती इडली खाऊ लागली. रघू तिच्याकडे पाहात होता. खाताना मधूनच तिचे डोळे भरून येत होते. खाणं झालं. रघूने तिला पाणी दिलं. ‘‘रघू मला खरंच खूप भूक लागली होती. मन थार्‍यावर नव्हतं. काय होतंय् ते कळत नव्हतं, पण आता बरं वाटत आहे.’’ ‘‘घरी चल बरं आणि आता काही विचार करायचा नाही. शांतपणे शहाण्या मुलीसारखं झोपायचं समजलं!’’ तिने मान हलवली. दार उघडून घरात गेली. सर्व घरातील दिवे बंद झाले होते. आई-बाबा झोपले होते. कॉटवर तिने अंग टाकलं. तिला वाटलं रघू किती छान बोलला आपल्याशी. त्याचं प्रेमाने बोलणं, आर्जव आपण टाळू शकलो नाही. रघू दक्षिणेकडील लहान गावातून आलेला पदवीधर. नोकरीकरिता शहरात आला, पण नोकरी मिळाली नाही. विधवा आई आणि लहान भावाची जबाबदारी होती, पण तो स्वस्थ बसला नाही. छोट्याशा जागेत त्याने नाश्ता पॉईंट दुकान लावले. सकाळी ७ वाजता तो इडली, चटणी, सांबार करायचा. बारा वाजेपर्यंत सर्व वस्तू संपायच्या. नंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि दुकान ओळीत तर रात्री ९ वाजेपर्यंत कलेक्शन करायचा. दुसर्‍या दिवशी बँकेत भरायचा. बँकेतून मिळणारं कमिशन आणि दुकानातून मिळणारा पैसा आईला पाठवायचा. तरुण, मेहनती, प्रामाणिक आणि निर्व्यसनी रघू सर्वांनाच आवडायचा. शांत आणि प्रेमळ स्वभाव हे गुणविशेष अधिक स्पष्टपणे जाणवायचे. त्याच्या विचारात मीनाला केव्हा झोप लागली हे कळलंच नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळपासून तिचा मूड चांगला होता. आईला आपणहून स्वयंपाकात मदत केली. नंतर खोली आवरली. कपड्यांचं कपाट आवरायला घेतलं आणि एक फोटो टपकन साडीच्या घडीतून खाली पडला. ती आणि तिच्या दोन मैत्रिणी लता आणि आशा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला हा फोटो काढला होता. प्रत्येकीजवळ त्याची १-१ कॉपी होती. किती सुंदर दिसत होतो आपण! कॉलेजच्या आठवणीत मन रमून गेलं. तीन वर्षे या तिघी सोबत होत्या. कॉलेजात हे त्रिकूट प्रसिद्ध होतं. कॉलेजचे रंगीत दिवस… मुलं-मुली एकत्र वावरणं, नकळत एखादी छबी मनात ठसणं, त्यावरून एकमेकींना छेडणं. तिघीही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली शेवटच्या वर्षाला गेल्या तशा घरातून वरसंशोधन सुरू झालं. ‘‘मला नवरा कसा सुंदर, स्मार्ट, भरपूर पगारवाला, मर्यादित कुटुंबातील हवा. एनआरआय पण चालेल’’- मीना म्हणाली. ‘‘अगं पण सगळंच कसं मनासारखं मिळणार?’’- आशाचा प्रश्‍न. ‘‘का नाही मिळणार? मी सुंदर आहे. माझा फॉर्म सुंदर आहे. अपेक्षा केली तर वाईट काय?’’ चर्चा रंगायची, अर्थात निष्पन्न निघत नसे. पण, वास्तव मात्र नेमकं उलटं असतं. फायनलच्या परीक्षा झाल्यात. आता तिघींचं वारंवार भेटणं कमी झालं. डोअरबेल वाजली. मीनाने दरवाजा उघडला. ‘‘हाय! कशी आहेस लता?’’- तिने घट्ट मिठी मारत विचारलं. खूप दिवस मध्ये गेले होते. लता छान उजळली होती. चेहरा आनंदी दिसत होता. ‘‘माझी एन्गेजमेंट आहे या रविवारी. तुला यायचं आहे.’’ ‘‘अभिनंदन’’- मीना म्हणाली. ‘‘कोण राजकुमार मिळाला कळू तरी दे.’’ लताने पर्समधून फोटो काढला. फोटो ठिकठाक होता. ‘‘ए, पण तुझ्यापेक्षा डावा आहे हं!’’ लता काही बोलली नाही. ‘‘काय करतो गं तुझा सपनो का राजकुमार?’’ ‘‘प्रायव्हेट कंपनीत आहे. घरी आई, १ बहीण, १ भाऊ आहे.’’ ‘‘अगं इतक्या व्यापातील स्थळ तू पसंत तरी कसं केलंस? भावंडाचं करण्यात तुमचं अर्ध आयुष्य निघून जाईल. तारुण्य ओसरून जाईल. नोकरीतील कमाई बहीण-भावाच्या शिक्षण-लग्नात संपून जाईल. काही आयुष्यातील मौजमजा लुटणार की नाही? कसं गं तू हो म्हटलं. आपलं कॉलेजमध्ये काय ठरलं होतं?’’- लताचा शांत चेहरा पाहून मीनाने तिला हलवत विचारलं. लता शांतपणे म्हणाली, ‘‘स्वप्न आणि वास्तव भिन्न असतं. आपण कॉलेज जीवनात पाहिलं ते स्वप्न होतं आणि आज हे वास्तव आहे. इथे परिस्थितीचं भान आहे. माझ्या पाठच्या दोन बहिणी लग्नाच्या आहेत. मी जर नखरे करत स्थळं नाकारली तर बहिणींची लग्न कशी व्हायची? आणि मुलगा जरी मध्यमवर्गीय असला तरी निर्व्यसनी आणि प्रामाणिक आहे. आई आणि भावंडाची ओढ असणारा कुटुंबवत्सल आहे. सुरुवातीला माझ्या मनातही असेच विचार आलेत, पण आईने वास्तवाचे भान दिले. व्यवहार, जगराहटी समजावली. लग्न करताना नेमक्या कोणत्या गुणांना प्राधान्य असावे, हे सांगितले आणि खरं सांगू मला ते पटले. जमिनीवर राहून विचार करायला शिकले आणि आहे तेच छान वाटले. होकार दिला. नंतर दोन-तीनदा आम्ही भेटलो, फिरायला गेलो. त्याच्या संगतीत मला फार सुरक्षित आणि आश्‍वस्त वाटलं.’’ ‘‘अगं पण…’’ मीनाचं वाक्य अर्ध्यावरच तोडत ती म्हणाली, ‘‘पण-बीण काही नाही. तुला एन्गेजमेंटला आणि नंतर पुढे लग्नाला पण यायचं आहे.’’ चल बाय म्हणत ती निघालीसुद्धा. तिची अधीर पावलं जणू प्रियकराला भेटण्यास उतावीळ झाली होती. पावलातील उत्साह थक्क करणारा होता. नवर्‍याचं गुणवर्णन करताना फुललेला चेहरा मीना पाहतच राहिली. लग्न ठरल्यावर एवढा आमूलाग्र बदल होतो? ‘‘जेवायला ये गं. पानं वाढली. काल पोर उपाशीच होती’’- आईच्या हाकेने मीना भानावर आली. जेवणं आटोपली. मागचं सर्व मीनाने आवरलं. आई तिच्याकडे आश्‍चर्याने पाहत होती. मीनातील बदल तिला जाणवत होता. तिची चिडचिड कमी झाली होती. सरसकट सर्वांना नावं ठेवण्याकरिता उघडणारं तोंड बंद होतं. चेहरा शांत होता. संध्याकाळी छान तयार होऊन ती बागेत फिरायला गेली. ‘‘अगं मीना का तू?’’ ओळखीचा आवाज आणि स्वत:चं नाव ऐकून तिने मान वळविली. ‘‘अगं आशा तू केव्हा आलीस? काही फोन नाही की, निरोप नाही आणि हे काय घरी पण आली नाहीस.’’ ‘‘अगं हो हो किती प्रश्‍न विचारतेस? दोन दिवसांपूर्वी आली. आज बाहेर पडली. तुझं कसं काय चालू आहे. ए, घरी चल नं. छान आरामात गप्पा करू’’- मीनाने आग्रह केला. दोघी घरी आल्या. येताना ‘‘रघू, दोघींकरिता इडल्या पाठव प्लीज!’’ ‘‘‘यस मॅडम’’- रघू हसत उत्तरला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. ‘‘ए, स्वानंदीला सोबत नाही आणलं?’’ ‘‘अगं ती मामाबरोबर सर्कस पहायला गेली म्हणून तर एकटी बाहेर पडली.’’ ‘‘काय म्हणतात तुमचे नवरोजी?’’ ‘‘सुरेश ठीक आहे. आताच प्रमोशनवर बदली झाली आहे म्हणून सुुटी नाही मिळाली. डेली अप-डाऊन करतो. सासूबाई घरी आहेत म्हणून ठीक आहे. त्यामुळे चार दिवस माहेरी तरी येता आलं, नाही तर त्याच्या काळजीने घर सोडणं कठीण होतं.’’ इडल्या आल्या आणि खाऊन झाल्यात. मीनाने चहा केला. पुन्हा भेटण्याचा वादा करून आशाने निरोप घेतला. तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत मीनाच्या मनात विचार आला. लग्न चांगलंच मानवलं आहे हिला. चांगली घेरदार दिसते आहे आणि चेहर्‍यावर एक वेगळंच तेज, समाधान, तृप्ती आणि सुरक्षितता जाणवते आहे. एकदम वेल सेटल्ड वाटते. लग्नामुळे इतका आमूलाग्र बदल होतो? मीनाच्या मनात पुन्हा तोच विचार आला. कॉलेज जीवनातील जोडीदाराबद्दलच्या कल्पना त्यातील अगदी अभावानेच पूर्ण झाल्या तरीसुद्धा लता आणि आशा किती सुखी, आनंदी आणि तृप्त दिसतात आणि आपण… नकळत तिचंं मन स्वत:चं अंतर्मन चाचपू लागलं. आपल्याला सगळंच कसं नीरस वाटतं. मनात एक अनामिक रितेपण जाणवतं. सारखी चिडचिड होते. या मनाला नेमकं काय हवं आहे ते नीट कळत नाही. सतत अपुरं-अतृप्त असतं. काय शोधत असतं ते नेमकं? काय मिळालं म्हणजे ते सुखी, आनंदी होईल, याचा ती अगदी मनाच्या तळापर्यंत खोलवर जाऊन विचार करीत होती. त्याचा शोध घेत होती. आणि दुसर्‍या दिवशी नकळत तिची पावलं रघूच्या दुकानाकडे वळली. रघूची भेट झाली. कधी नव्हे ती जास्त वेळ त्याच्या समोर घुटमळली. बरंच मोकळेपणाने बोलली. तो पण फुरसतीत होता. मोकळेपणाने बोलत होता. काल तू आग्रह करून खायला लावलंस ते छान वाटलं. खरं म्हणजे खूप भूक लागली होती, पण कोणीतरी आग्रह करावा, समजूत घालावी, दुखर्‍या मनावर हळुवार फुंकर घालावी, असं मनापासून वाटत होतं आणि तू आलास; छान वाटलं. ‘‘तुला कसं रे नेहमीच चांगलं वागणं, बोलणं जमतं? मला तर जरा मनाविरुद्ध झालं की, लगेच राग येतो. रागाने तडतड बोलल्या जातं. त्यामुळे समोरचा पण रागाने बोलतो आणि सगळंच बिघडत जातं. थोडा वेळ निघून गेला की, शांत झाल्यावर जाणवतं की, आपण किती क्षुल्लक गोष्टीवरून इतका वाद घातला, पण तेव्हा समोर ती व्यक्ती नसते. त्यामुळे त्याला सॉरी पण म्हणता येत नाही. म्हणजे आपणच निर्माण केलेल्या गुंत्यात आपणच अडकतो. पण, तू कसं इतकं सगळं शांतपणे घेतो. मानावंच लागेल तुला.’’ ‘‘अगं मुद्दे पटले नाही, तर ते शांतपणे खोडून काढता येतात. उलट शांतपणे बोललं तरच ते समोरच्याच्या गळी उतरता येतं. अन्यथा आपले शब्द धबधब्याप्रमाणे वेगाने कोसळत गेले तर सर्वच वाहून जातात. त्या बोलण्याचा उपयोग होत नाही आणि समजा एखाद्याला आपली मतं पटली नाही तरी काय होतं?’’ रघूच्या प्रश्‍नार्थक चेहर्‍याकडे पाहताना तिला हसू आलं. ‘‘आनंदात असली म्हणजे किती छान हसते नाही मीना!’’ नकळत रघूच्या मनात हा विचार चमकून गेला. आता येता-जाता रघूच्या आणि मीनाच्या भेटी होऊ लागल्या. सुरुवातीला फक्त इडली आणून देणे आणि पैसे घेऊन जाणे एवढाच व्यवहार होता, पण वेळ असेल तेव्हा ती रघूकरिता चहा पण करू लागली. त्याच्याशी बोलताना त्याला सद्यःस्थितीची अगदी राजकारण, समाजकारण याची चांगली माहिती होती, हे मीनाला जाणवायला लागलं. घराबद्दल बोलताना आई-भावाविषयी अत्यंत प्रेमाने बोलायचा. गावच्या आठवणी सांगताना रंगून जायचा. मनाने तो केव्हाच गावाला पोहोचलेला असायचा आणि त्या वेळेस त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहणं, वाचणं याचा मीनाला छंद लागला होता. दोघांच्या भेटी, बोलचाली मीनाच्या बोलण्यात रघूचा विषय सारखा असायचा. आई-बाबांच्या अनुभवी नजरेतून ते सुटलं नव्हतं. एकदा मीनाचा चांगला मूड पाहून आईने विचारलंच- ‘‘रघू आवडतो का गं तुला?’’ अचानक आलेल्या प्रश्‍नाने मीना गोंेधळली. चेहर्‍यावर लज्जा स्पष्टपणे दिसत होती. ओठावरचं हसू गालावर पसरलं आणि डोळ्यातून चमकत स्पष्ट झालं. आईचे अनुभवी मन, डोळे मीनाचं मन समजून गेले. ‘‘विचारू का रघूला?’’ ‘‘चल तुझं आपलं काहीतरीच’’ म्हणत मीना तिथून लगबगीने निघून गेली. पळतच आपल्या खोलीत गेली आणि हे काय आज तिचं हृदय एका अनामिक जाणिवेने वेेगाने धडधडत होतंं. ती धडधड तिला स्पष्टपणे ऐकू येत होती. हातापायाला हलकासा कंप जाणवत होता. हे काय होतंय आपल्याला? यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. नकळत या क्षणीसुद्धा तिची पावलं शेजारच्या देवळाकडे वळली. गणपतीसमोर ती शांतपणे बसली. हळूहळू तिचा श्‍वास नॉर्मल झाला. धडधड कमी कमी होत आली. खरंच मला रघू आवडतो का? तोच माझ्या जीवनाचा सखा-सोबती-सांगाती असेल का? रघूचं नाव, त्याचा विषय निघाला की आपली अवस्था अशी का होते? काळजाचा ठोका का चुकतो? रघूला सारखं भेटावसं का वाटतं? त्याच्याशी बोलावसं, त्याच्या समोर मन मोकळं करावसं का वाटतं? मध्ये दोन दिवस तो गावी गेला तेव्हा किती एकटं एकटं वाटलं. त्याच्याशिवाय आपल्याला करमेनासं झालं. नेमकी कोणती भावना रघूविषयी आपल्या मनात आहे. त्यालाही असंच काही वाटतं का आपल्याबद्दल? मनात विचारचक्र सुरू होतं. मन स्थिर करण्याचा, शांत करण्याचा ती प्रयत्न करीत होती. काही वेळाने ती घरी गेली. रात्री जेवून गादीवर अंग टाकलं आणि रघूच्या शांत चेहर्‍याने, त्याच्या विचाराने तिच्या मनाचा ताबा घेतला. शांतपणे ती झोपी गेली.
आई-बाबांमध्ये विचारविनिमय झाला. या विषयावर मीनासमोरच ती दोघं रघूशी बोलले. त्याचा विचार घेतला. मीनाबद्दल त्याच्या मनात प्रेम होतं. तिच्याशी विवाह करण्यास तो तयार होता. मीनाचा पण होकार होता. आई-बाबा-रघू आणि मीना रघूच्या गावी गेले. रघूचं घर छोटसं, पण छान होतं. त्याच्या आईला पण मीना सून म्हणून पसंत होती. देण्याघेण्या, मानपान, हुंड्याच्या काही अटी नव्हत्या. कोर्ट मॅरेज करून मीना आणि रघू विवाहबद्ध झाले. रघूची आई आणि भाऊ चार दिवस मीनाकडेच राहिले. मीनाकडेच लग्नाची एक छोटीशी पार्टी जवळच्या नातलगांना आणि मित्रपरिवाराला दिली. आई सुनमुख पाहून आनंदी झाली. रघूचे दोनाचे चार हात झाले. आई प्रेमळ आशीर्वाद देऊन गावी परतली. रघूचा लहान भाऊ आता गावात नोकरीला लागला. आईच्या घराच्या बाजूच्या दोन खोल्यांत मीनाचा संसार सुरू झाला. नाश्ता पॉईंटमध्ये आता डेली नीड्‌स टाकून दुकान मोठं झालं. घर, दुकान मीना सांभाळू लागली. बँकेचं कलेक्शन आणि व्यापार्‍यांकडे रघू हिशोब लिहिण्याचं काम करू लागला. रात्री भावी आयुष्याची सुखद स्वप्न रंगविण्यात दोघं गुंग असायची. कॉलेजमधील स्वप्नरंजनापेक्षा हे वास्तव कितीतरी पटीनं जास्त चांगलं होतं. याने जीवनाला स्थैर्य आणि दिशा मिळाली. रघूचे भरभरून मिळणारे प्रेम, त्याचा प्रेमळ सहवास त्यामुळे तिच्या स्वभावात शांतपणा आला. सगळं जग कसं सुदर, छान दिसून लागले. तिचं हवं नकोपण पाहणारा, तिची काळजी करणारा, काळजी घेणारा, तिच्या भोवती सतत रुंजी घालणारा, मनाला ओढ लावणारा रघू, त्याचं प्रेम यालाच खरं सुख म्हणतात ना! आता प्रत्येक रात्र चांदणी रात्र झाली आणि प्रत्येक दिवस सोनेरी झाला होता.

सुनीता गोखले/९८२३१७०२४६