कला पद्धती

0
187

कला पद्धतीचा विचार करताना कलेच्या स्वभाव-विशेषांचा विचार करावा लागेल. कला व जगाविषयीचा दृष्टिकोन यांचा संबंध व्यामिश्र स्वरूपाचा आहे. असे लक्षात येते की, या संबंधातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, कलावंताला, त्याच्या जगाविषयीच्या असलेल्या दृष्टिकोनाला, त्याच्या कलेतून प्रोत्साहन मिळते की, ती त्याच्या विरुद्ध दिशेने जाते. त्यामुळे कलावंताचा जगाविषयीचा दृष्टिकोन व कला-पद्धती हे महत्त्वाचे आहे की, प्रत्यक्ष जीवन व कला-पद्धती हे महत्त्वाचे आहे. कला-पद्धती ठरवताना प्रत्यक्ष जीवन व कला यातील संबंध यावरचा विचार महत्त्वाचा आहे, असे वाटते.
कला पद्धतीचे स्वरूप जाणून घेताना वस्तुनिष्ठता व व्यक्तिनिष्ठता यांचे युक्तिवादशास्त्र विचारात घेतले पाहिजे. कला-पद्धती म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या निश्‍चित झालेला एक आकृतिबद्ध विचार आहे. कला-पद्धतीची जडण-घडण खालील तीन गोष्टींवर अवलंबून असते.
जीवनाचे सौंदर्यशास्त्रीय वैभव
कलाकाराची सामाजिक पत आणि त्याचा जागतिक दृष्टिकोन तत्त्वज्ञान व कलेमुळे जी सामुग्री कलाकाराजवळ जमा झाली आहे त्याचा विनियोग सृजनशील कलाकृतीत एखाद्या आरशाप्रमाणे कलेचा उद्देश्य प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे दूरदृष्टीने विचार केल्यास कला-पद्धती एकप्रकारे कला-आशयाशी साम्यता असणारी गोष्ट आहे. याचा अर्थ कला-पद्धतीतून कलेचा आशय व्यक्त होत असतो. कलेच्या आशयात कलाकाराच्या दृष्टिकोनाची भर पडते. त्याच्या सृजनशील आकलनाची आशयाला जोड मिळते. त्यामुळे कला-आशय अधिक समृद्ध बनतो किंवा याच्या उलटदेखील होऊ शकते.
कलाकाराच्या सौंदर्यशास्त्रीय वैभवाचे प्रतिबिंब जेव्हा कलाकृतीत पडते तेव्हा हे वैभवच कलेचा उद्देश्य बनते. या सौंदर्यशास्त्रीय वैभवाचे घटक एकत्र होतात व आकृतिबद्ध विचारांमुळे तिला एक स्थिर रूप प्राप्त होते. याचा अर्थ कला-पद्धतीची निर्मिती कलात्मक वैचारिकतेचाच एक भाग आहे. सृजनशील प्रक्रियेचाच तो एक भाग आहे. ही निर्मिती कृत्रिमपणे होऊ शकत नाही. अशा प्रकारे सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनामुळे कला-पद्धती सहजपणे विकसित होते.
ऐतिहासिकदृष्ट्या विचार केल्यास कलेचा उद्देश्य, कलेतील आशय आणि कला-पद्धती यात लवचिकतेचा गुणधर्म आढळतो. जीवनाचा सौंदर्यशास्त्रीय आशय बदलला की, लगेच नवीन कला-पद्धतीचा जन्म होतो.
कला-पद्धतीबाबतीत महत्त्वाचा प्रश्‍न असा आहे की, वेगवेगळ्या कला-पद्धती समांतरपणे कशा अस्तित्वात असतात? त्यांचे मूल्यमापन कसे करायचे? विसाव्या शतकाचा विचार केल्यास असे आढळते की, स्वच्छंदतावाद आधुनिकतावादाबरोबर सहअस्तित्वात होते. त्याचप्रमाणे समीक्षात्मक व सामाजिक वास्तववाददेखील याच शतकात त्यांच्याबरोबर नांदत होता. याचे स्पष्टीकरण काय? याचे स्पष्टीकरण असे देता येईल की, सामाजिक ढाचा सर्वत्र एक प्रकारचा नसतो. शिवाय प्रत्येक कलाकाराचा जगाविषयीचा दृष्टिकोनही एकसारखा नसतो. जेव्हा वस्तूला सक्रिय रूप प्राप्त होते तेव्हा कला-पद्धती उदयास येते.
वस्तू व कला-पद्धती तसेच जीवनानुभव व कलाकाराची मानसिकता यांना बांधणारा दुवा म्हणजे आदर्शवाद.
कलाकाराला त्याला असलेल्या जगाबद्दलच्या जाणिवेतून त्याला वस्तूचे सूक्ष्म दर्शन घडते. वस्तूबद्दलचे सूक्ष्म ज्ञानच कलाकाराच्या कलेचा आशय बनते. हा आशय प्रत्येक कलाकाराचा वेगवेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या कला पद्धती उदयास येतात आणि त्याही एकाच काळात. कला पद्धतींचा जनक कोण? असा प्रश्‍न विचारला तर त्याचे सहज उत्तर म्हणजे मनुष्याचे जीवन. जीवनाचे स्वरूप काळानुसार बदलते.
प्राचीन व आधुनिक युगातील मनुष्याची मानसिकता व जीवन पद्धती वेगवेगळ्या असणार. विज्ञानयुगातील मनुष्याची जीवनदृष्टी वेगळीच असणार. त्यामुळे काळानुरूप कला पद्धतीत होणारे बदल अनिवार्य गोष्ट आहे.
डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२