शोध श्रीलंकेचा..!!

0
227

ठाणे येथील हार्मनी टूर्सच्या कौस्तुभ जोशी हा तरुण श्रीलंकेत रामायण सांगण्याची कल्पना घेऊन आला. स्थलदर्शन करीत, फिरती रामकथा करण्याची त्याची मनीषा होती. ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या हॉटेलमध्ये मुक्त मोकळ्या आवारात अथवा छोटेखानी सभागृहात रामकथा करावी असे त्याच्या मनात होते. त्याला आम्ही रुकार दिला आणि अपरिचित रामायण सांगणे मान्य केले. रावणाची लंका पाहायला मिळणार याचा आम्हाला आनंद झाला. त्या भरात लंकेवर मिळतील ती पुस्तके वाचायचा सपाटा लावला.
आजवरच्या विदेश प्रवासात आवश्यक तेवढे स्थलदर्शनापुरते वाचून मगच गेलो. यावेळी पुन्हा सर्व इतिहास वाचला. रामायणातील लंकेशी संबंधित वर्णने वाचली. सप्टेंबर २०१६ मध्ये आमची आठ दिवसांची लंकेची यात्रा झाली. प्रतिदिनी रात्री कितीही वाजले तरी छायाचित्रे आणि संक्षिप्त माहिती आम्ही फेसबुकवर टाकत असू. हे काम खरे तर स्वत:साठी होते. चालत्या बसमध्ये नोट्स काढणे कठीण होते. परतल्यावर सर्व ताजी माहिती संकलित करून ठेवण्याचे उत्तम साधन म्हणजे फेसबुक होय. हॉटेलमध्ये शिरताच वाय-फाय कनेक्शन मिळत असे. लगेच सर्व माहिती शेअर करता येत असे. फेसबुक मित्रांना श्रीलंकेची माहिती कळत असे आणि आम्हाला परतल्यावर माहितीच्या उपलब्धतेची निश्‍चिती होत असे. काही फेसबुक मित्रांनी मोलाच्या सूचना केल्या. इतकेच नव्हे तर, विलेपार्ले येथे राहाणार्‍या सुशील गोरे यांनी त्यांच्या वाचनालयात जाऊन डॉ. मधुसूदन चान्सरकर यांचे ‘सप्तसागरातील श्रीलंकेचा शोध’ हे छोटेखानी पण अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक मिळवले. त्या पुस्तकाची छायाप्रत काढून कुरियरने रवाना केली. डोंबिवलीच्या फ्रेंड्स लायब्ररीमध्ये ह. मो. मराठे यांचे वंश विद्वेषाच्या वणव्यात श्रीलंका हे पुस्तक मिळाले. श्रीलंकेची संघर्षगाथा हे मेजर जनरल नि. शशिकांत पित्रे यांचे अप्रतिम पुस्तक आमच्या संग्रहात होते. परममित्र पब्लिकेशन्सच्या माधव जोशींनी पंकज कालुवाला या तरुणाने लिहिलेले राजकीय हत्या हे उत्तम पुस्तक दिले. हमो, पंकज आणि शशिकांत पित्रे यांच्याकडे संपर्क साधताच त्यांनी त्यांच्या पुस्तकांचा संदर्भासाठी उपयोग करायला लगेच परवानगी दिली. डॉ. चान्सरकर यांचा शोध घेत नागपूरला त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांचे वय बरेच असल्यामुळे ते विदेशात त्यांच्या मुलाकडे असतात, असे कळले. पण दुर्दैवाने पत्ता मिळाला नाही. त्यांच्या पुस्तकातील बरेच संदर्भ प्रस्तुत पुस्तकात वापरले आहेत. अर्थात त्यांच्या आणि अन्य सर्वांच्या नावाचा कृतज्ञतेने उल्लेख केला आहे.
घरी आल्यापासून लंका हाच विषय घेऊन झपाटल्यासारखे झाले होते. पुस्तक लिहिण्यापूर्वी असे झपाटलेपण आवश्यक असते असा आमचा नेहमीचा अनुभव आहे. त्या भरात उर्वरित पुस्तकांचे वाचन आणि गुगलवर लंकेशी संबंधित चित्रफिती पहाणे आणि माहिती गोळा करणे चालू झाले. गुगलवर माहिती मिळवताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात अन्यथा फसगत होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ विकिपीडियावर श्रीलंकेतील तामिळांची लोकसंख्या अकरा टक्के दाखवली असून ही २०११ ची आकडेवारी असल्याचे म्हटले आहे. लंकेची अधिकृत माहिती देणार्‍या साईटवर अद्याप २००१ ची आकडेवारी दिसते. त्यात तामिळांची लोकसंख्या सात टक्के दिसते. दहा वर्षात चार टक्के भर पडणे शक्य नाही. कारण मधल्या काळात ईलमसाठीची युद्धे झाली. मध्ये प्रभाकरन् मारला गेल्यावर लिट्टेच्या ङढढए शरणागतीनंतर युद्ध थांबले. या युद्धात जवळपास सत्तर हजार तामिळ मेले. दीड लाख भारतात विस्थापित म्हणून निघून गेले आणि जवळपास तेवढेच विदेशात राजकीय आश्रय मागून स्थायिक झाले. श्रीलंकेत अनेक निष्पापांच्या युद्धोत्तर काळात अमानुष हत्या करण्यात आल्या. बलात्कार करण्यात आले. यानंतर जे आहेत त्यांना जणू घेट्टोमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले. त्या छावण्यातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. आजही परिस्थिती फारशी सुधारली नाही. दारिद्र्य आणि नरकसदृश्य जीवन तिथे असल्याचे म्हणतात.
दुःखं दुःखमिति ब्रूयात् मानवो नरकं प्रति|
दारिद्र्यादधिकं दु:खं न भूतं न भविष्यति॥
(नरक हा अतिशय दुःखदायी, असे लोक खुशाल म्हणू देत, पण दारिद्र्यापेक्षा अधिक दुःख देणारी वस्तू या जगात पूर्वी कधी झाली नाही व कधी होणार नाही.)
त्या भागात सहसा पर्यटक जात नाहीत अथवा त्यांना नेण्यात येत नाही. अशा दयनीय परिस्थितीत तामिळांची लोकसंख्या वाढेल कशी? ती कमीच होत जाणार, हे लक्षात घ्यावे लागते.
यू ट्युबवरचे व्हिडीओ बघताना मेंदूला मुंग्या येतात. आज एकविसाव्या शतकातही शरण आलेल्या माणसांवर इतके भयानक अत्याचार होऊ शकतात हे दिसते, पण पटवून घ्यायला खूप कष्ट पडतात. अत्याचारांना पशुतुल्य म्हणणे हे पशूंचा अपमान करणारे आहे. कारण ते विकृत नसतात. माणूस मात्र शिकलेला असतो आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग जर अशा विकृतीसाठी करीत असेल तर काय म्हणावे? बुद्धाचा शांती आणि करुणेचा संदेश देणार्‍या देशात हे घडत होते. असेच पूर्वी बौद्ध असलेल्या जपानने केलेले दिसते. त्यांनी चिनी लोकांवर वैज्ञानिक प्रयोगांच्या नावाखाली अत्यंत क्रूरपणा केला. आत्ताच्या काळात म्यानमारच्या बौद्ध लोकांनी केलेली रोहिंग्या मुसलमानांची केलेली कत्तल आठवत असेलच. ज्याच्या निषेधार्थ मुंबईत रझा अकादमीने मोर्चा आणि सभेचे आयोजन करून अमर जवान स्मारक तोडले आणि वाहने जाळली.
आजवरचे पुस्तक लेखन हे हाती करीत आलो. यावेळी पहिल्यांदा पुस्तक संगणकावर लिहिले. आता छान हात बसला आहे. गेली सात वर्षे साप्ताहिक सदर लिहिण्याचा सराव संगणकावरच झाला. तो आता पुस्तक लेखनाच्या कामी आला. लिहिताना आरंभी थोडा मानसिक गोंधळ होता. पुस्तकाचा बाज हा प्रवासवर्णन असा ठेवायचा नाही हे आधीच निश्‍चित केले होते. फक्त कोणत्या कालापासून लेखन करावे इतकाच प्रश्‍न होता. लिहायला प्रारंभ करताच तो प्रश्‍न चुटकीसरशी सुटला.
हे पुस्तक म्हणजे केवळ इतिहास नाही आणि निव्वळ प्रवासवर्णन नाही. रामायणकालापासून श्रीलंकेचा घेतलेला धांडोळा असे याचे स्वरूप आहे. त्यामुळे रावणाची लंका, रामायणकालीन स्थळे, त्यांचे महत्त्व, राम-रावण युद्ध, तत्कालीन संस्कृती ही अधिक प्रगत होती याची उदाहरणे, बौद्ध राजवटीचा उदय, सिंहली-तामिळ राजांचा संघर्ष, स्वराज्योत्तर काळातील संघर्ष, लिट्टेचा उदय आणि अस्त आणि आजची श्रीलंका या सर्व बाबी या एका पुस्तकात वाचायला मिळतील. ललित भाषेत लिहिलेला इतिहास असे म्हटले तरी चालेल. क्लिष्ट वाटणारा इतिहास हा विषय रोचक करण्याचा आमचा प्रयत्न कितपत सफल झाला ते वाचकांनी ठरवावे.
नागपूरला व्याख्यानासाठी गेलो असताना सौ. उज्ज्वला आणि शिरीष चक्रदेव हे स्थपति दाम्पत्य भेटले. दोन वर्षांपूर्वी आम्ही युरोप दौर्‍यावर असताना, ते उभयता आमच्या चमूसोबत होते. स्थापत्यविशारद असल्यामुळे त्यांचा, प्रदेश निरीक्षणाचा आणि चर्चेचा विषय स्थापत्य हाच असे. त्यांनी श्रीलंका भेट नुकतीच दिली हे कळल्यावर आम्ही त्यांना पुस्तकासाठी एक लेख श्रीलंकेच्या स्थापत्यशास्त्रावर लिहिण्याबद्दल विचारले. सौ. उज्ज्वला चक्रदेव यांनी आमचा आग्रह मान्य केला. तो लेख त्यांनी पाठवलेल्या छायाचित्रांसह परिशिष्टात समाविष्ट केला आहे. ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या संस्थेने अत्यंत देखणी निर्मिती केली आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे