भटकेच खरे स्वातंत्र्ययोद्धे अन् संस्कृतिरक्षक

0
135

चौथ्या बिर्‍हाड परिषदेच्या सांगता सभेत दादा इदाते
तभा वृत्तसेवा
भंडारा, २९ जानेवारी
कुणाचाही सहारा नसलेला असहाय, घर नसलेला म्हणजे अनिकेत आणि पैसा ज्याच्याजवळ नाही असा अकिंच्य अशांचा समूह म्हणजे भटके होत. भटक्यांकडे आज गुन्हेगार म्हणून पाहिले जाते, परंतु खरे स्वातंत्र्ययोद्धे आणि संस्कृतीचे रक्षक भटकेच आहेत. इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी ही परिस्थिती निर्माण केली. भटके हिंदू समाजाचा अभिन्न घटक आहेत, हे समाजाला पटवून देत त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी समाजाने पुढे यावे व मूलभूत विचारातून चळवळ उभी व्हावी, असे आवाहन भटके विमुक्त जनकल्याण आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकूजी उर्फ दादा इदाते यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित भटक्यांना मार्गदर्शन करताना केले.
अखिल भारतीय भटके विमुक्त विकास परिषद विदर्भ प्रदेशाच्या वतीने जिल्ह्यातील भिलेवाडा येथे चौथ्या बिर्‍हाड परिषदेचे आयोजन २८ व २९ जानेवारी रोजी करण्यात आले होते. विदर्भ आणि छत्तीसगड राज्यातून एकूण १,४३२ बिर्‍हाडं परिषदेत दाखल झालीत. ३ हजार स्त्री-पुरुष व बालकांची नऊ जिल्ह्यातून उपस्थिती होती. १९ प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे भटके बांधव दोन दिवसांच्या परिषदेत सहभागी झाले होते. २८ जानेवारीला संध्याकाळी परिषदेचे उद्घाटन झाले.
समारोपाला व्यासपीठावर भिलेवाडाचे ग्रामपंचायत सदस्य विनोद बांते, शिवा कांबळी, व्यंकट ठाकरे, भिमा ठाकरे, भंडारा जिल्हाध्यक्ष उकांडा वडस्कर, गोंदियाचे प्रवीण जगताप, नरेश चिंचोळकर, शिवाजी शिंदे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना दादा इदाते म्हणाले, भटका समाज हा लढवय्या होता. यामधील विमुक्त म्हणजे खरे स्वातंत्र्ययोद्धे होते. विमुक्त लोकांच्या समुहाने स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी इंग्रज अधिकारी स्टीफन याने इंग्रजी ट्राईब ऍक्ट आणून या लोकांची मूळ समाजाशी नाळ तोडली. हे गुन्हेगार आहेत, असे सातत्याने बिंबविले गेल्यानेच आज आपणही या समाजाकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहतो.
ज्यावेळी देशात इंग्रजांनी आक्रमण करून हिंदूंची पवित्र मंदिरे आणि स्त्रियांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भटके म्हणविणार्‍यांनी देवी-देवतांची पूजा अर्चना करीत संस्कृतीचे रक्षण केले. त्यांनीच संस्कृती टिकवून ठेवली, मात्र आज याच भटक्यांना उपेक्षेचे जीवन जगावे लागत आहे.
भटक्यांचा महाराष्ट्रातील इतिहास मोठा आहे. वसंतराव नाईकांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत राजकारणात मोठी झालेली ही मंडळी भटक्यांंच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. ज्या समाजाला गुन्हेगार म्हटले जाते, तो हिंदू समाजाचा अभिन्न अंग आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. भटक्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी संस्कार केंद्रे चालविण्याची गरज असल्याचे सांगत भटक्या समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी समाजाचे प्रबोधन व्हावे. भटक्या विमुक्त परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे कर्तव्य समजून काम करावे, असे आवाहन दादा इदाते यांनी केले.
भाषणात दादा इदाते यांनी बिर्‍हाड परिषदेचे विभाग संयोजक दिलीप चित्रीवेकर यांचे कौतुक केले. इंगळी चावल्यागत बेभान होऊन काम करणारे कार्यकर्ते परिषदेकडे आहेत, हीच जमेची बाजू असल्याचेही ते म्हणाले. परिषदेत भटक्यांप्रती शासनाने आपले कर्तव्य पार पाडावे, यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप चित्रीवेकर यांनी केले. यावेळी भटक्या समाजातील १३ लोकांचा विविध कारणांसाठी सत्कार करण्यात आला. दादांच्या हस्ते कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र दोनाडकर व आभार प्रदर्शन शिवा कांबळी यांनी केले.