केरळमधील डाव्यांच्या हिंसाचाराचे गांभीर्य

0
170

प्रासंगिक
हिंसाचार आणि राजकारण यांचा संबंध तोडतो म्हटला तरी तुटत नाही. भारतासारख्या १२५ कोटींच्या देशात तरी अजून हिंसाचाराविना राजकारण शक्य झालेले नाही. त्याला आयामही अनेक आहेत. राजकारण म्हटले की वर्चस्वाची लढाई आलीच. कधी व्यक्तीच्या, तर कधी पक्ष-संघटनेच्या वर्चस्वासाठी ही लढाई लढली जाते. ती लढाई महाराष्ट्रात जशी आहे तशीच कर्नाटकातही आहे आणि जशी उत्तरप्रदेशात आहे, तशीच ती बिहारमध्येही बघायला मिळते. जम्मू-काश्मीर राज्यालाही हिंसाचाराचा शाप बसला आहे. तद्वतच सुदूर दक्षिण किनारपट्टीवरील केरळ राज्य गत काही वर्षांपासून हिंसाचाराने पोखरून निघाले आहे. विदेशी शक्तींचा हस्तक्षेप, अतिरेक्यांच्या घातपाती कारवाया, धर्मांध मानसिकता आणि विघटनवाद्यांच्या कारवाया आदी जम्मू-काश्मिरातील संघर्षामागची कारणे तत्काळ नजरेपुढे येतात. पण केरळातील संघर्ष हा दोन विचारधारांचा आहे. एका विचारधारेला दुसर्‍या विचारधारेच्या भयाने पछाडल्याने निर्माण झालेला हा संघर्ष काही थांबण्याचे नाव नाही. यात दोन्हीकडील मंडळी भारतीयच आहेत. पण विचार करण्याच्या पद्धतीमुळे आणि विरोधकांना विचाराने नव्हे, तर शस्त्राच्या धाकाने, हिंसेने नष्ट करण्याच्या प्रवृत्तीतून याचा उगम झालेला आहे. या संघर्षात आजवर अनेक निपराधांचे बळी गेलेले आहेत. केरळमध्ये हिंसाचार प्रारंभ करणारे आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या हिंसेला बळी पडणारे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपाचे कार्यकर्ते. या हिंसाचारामागे असलेल्या प्रवृत्तींचा नायनाट करण्याच्या विचारांना समाजसंमती आहे, पण केरळमध्ये सरकार डाव्यांचे, त्यामुळे त्यांना आळा घालणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
नुकताच दिल्लीत केरळ सरकारच्या हिंसाचार करणार्‍यांबद्दलच्या दुटप्पी भूमिकेचा जाहीर निषेध करण्यात आला. या निषेध सभेत कलावंत, समाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, अभिनेते, विचारवंत, पत्रकार आदी भिन्न क्षेत्रांतील मंडळींनी सहभाग घेतला आणि राज्य सरकारच्या बरखास्तीची मागणीच सरकारकडे करण्यात आली. अशा निषेध सभा यापूर्वीही झाल्या आहेत, पण त्यामुळे राज्यातील हिंसा आटोक्यात आली, असे कधी झाले नाही. उलट उत्तरोत्तर केरळातील हिंसाचारात वाढच झाल्याचे चित्र बघायला मिळते.
खरे तर एकेकाळी प्रबळ असलेला डाव्यांचा विचार भारतातून परागंदा होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांत गावागावात आणि शहराशहरात या विचारांनी अनेक बुद्धिवाद्यांना आपल्याकडे आकर्षित केले होते, त्यांना भुरळ घातली होती. भांडवलशाही वृत्तींविरोधातील आणि सर्वांसाठी समानतेची वागणूक अपेक्षित करणार्‍या या विचारांमधील फोलपणा नंतर जनतेच्याही लक्षात आला आणि डाव्या पक्षांना मिळणार्‍या समर्थनाला देशभरात ओहोटी लागली. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाचे बालेकिल्ले ढासळले. मोदींच्या लाटेत तर डाव्या पक्षांच्या अनेक उमेदवारांना त्यांच्या अनामत रकमादेखील राखता आल्या नाहीत. सध्या केरळमुळे या पक्षाची मिजास अजून कायम आहे. पण येथेदेखील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी अनेक मतदारसंघांमध्ये जी कामगिरी करून दाखविली, त्यामुळे या राज्यातही त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.
केरळमध्ये सीपीएम-सीपीआय विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघर्षाला १९४० ची पार्श्‍वभूमी आहे. ४०च्या दशकात संघाने आणि त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीने केरळमध्ये चंचुप्रवेश केला. हळूहळू संघ कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यशैलीमुळे, शिस्तबद्धपणामुळे, गरजूंच्या मदतीसाठी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे आणि राष्ट्रीय विचारांच्या पायामुळे केरळी जनतेच्या मनावर गारुड घातले. केरळींना हे विचार पटू लागले. संघ शाखेत जाणारी मुले आणि इतरांमधील संस्कारांचा फरक पालकांच्या लक्षात येऊ लागला आणि आपसूकच पालक त्यांच्या मुलांना संघाच्या शाखेत खेळायला आणि प्रार्थनेला पाठवू लागली. येथेच डाव्यांच्या विचारांना सुरुंग लागला. हळूहळू त्यांचे कार्यकर्ते संघ विचार आणि या विचारांचा पुरस्कार करणार्‍या भारतीय जनता पार्टीकडे वळू लागले. प्रेमाने, गोडीगुलाबीने कार्यकर्ते तयार करायचे ही वृत्तीच नसल्याने, हिंसाचाराच्या बळावर संघाला नेस्तनाबूत करण्याचा डाव आखला गेला.
१९४८ मध्ये संघाच्या थिरुवनंतपुरम येथील सभेवर झालेला हल्ला म्हणजे संघ आणि डाव्यांमधील संघर्षाची पहिली ठिणगी म्हणावी लागेल. १९५२ मध्ये अलापुझ्झा येथे पुन्हा संघाच्या सभेवर डाव्यांनी हल्ला केला. यानंतर एर्नाकुलम, थ्रिसूर, पलक्कड, कन्नूर आदी जिल्ह्यांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या डाव्या विचारांच्या मंडळींनी हत्या घडवून आणल्या.
संघ कार्यकर्त्यांवरील कम्युनिस्ट हिंसाचाराचा विचार करता आपल्याला १९६९ पर्यंत इतिहासात मागे डोकवावे लागेल. त्या वर्षी वडीकल रामकृष्णन् या सामान्य स्वयंसेवकाची हत्या कम्युनिस्ट गुंडांनी केली होती. त्यानंतर केरळमध्ये आतापर्यंत मागील ५० वर्षांच्या काळामध्ये २७० हून अधिक संघ स्वयंसेवक आणि हितचिंतकांच्या हत्या झाल्या आहेत. काही हत्यांमागे कट्टरतावादी इस्लामी गटदेखील आहेत. कारण त्यांचा प्रभाव रोखण्यातही संघ स्वयंसेवकांची कार्यशैलीच कारणीभूत ठरली आहे. कन्नूर जिल्ह्यामध्ये हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आणि पुढे कन्नूर पॅटर्न नावाने याला प्रसिद्धी मिळाली. केरळमध्ये संघाचे बहुतांशी कार्यकर्ते डाव्या विचारांची साथ सोडून आल्याने त्यांचा रोख संघावर आहे, हे सांगावे लागू नये. सध्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडूनही न्यायाची अपेक्षा करता येत नाही. कारण एका संघ स्वयंसेवकाच्या हत्येत त्यांच्यावरही आरोप झालेले आहेत. तथापि, तत्कालीन नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई टाळल्याने त्यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास सुकर होऊ शकला. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत आलेला आहे. ज्या ज्या वेळी डावे पक्ष सत्तेत आले, त्या त्या वेळी त्यांनी संघाचा प्रभाव कसा कमी होईल आणि उजव्या विचारांची चळवळ कशी चिरडता येईल, यादृष्टीनेच पावले उचलली. सत्तेच्या लढाईत डाव्यांनी त्यांच्या वैचारिक साथीदारांवर, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांवर हल्ले केल्याच्या घटनाही काही कमी नाहीत. एकीकडे कामगार, महिला, दलित, मागास लोकांच्या उत्थानाच्या गप्पा मारायच्या आणि सत्ता हातची जायला लागली की हिंसाचाराचा मार्ग अवलंबायचा ही डाव्यांची कार्यपद्धतीच झालेली आहे. त्यांच्या हिंसाचारातून लहान मुले, स्त्रिया, अपंग व्यक्ती आणि वयोवृद्धदेखील सुटलेले नाहीत. आपल्या सत्तेच्या आड येणार्‍या सार्‍यांना त्यांनी त्यांच्या लाल पंजाखाली जखडून टाकले आहे. या पक्षाने पोसलेले गुंड हिंसाचार करताना त्याचा मागमुसदेखील मिळू देत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. पण डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आल्याने त्यांना निराशेने घेरलेले असून, सध्याच्या वाढलेल्या हिंसा हे त्याचेच द्योतक आहे. जागतिक पातळीवरही डाव्या विचारांची झालेली पीछेहाट भारतातील डाव्यांच्या नैराश्यास कारणीभूत ठरली आहे. रशियाच्या विघटनानंतर तर येथील डावी चळवळ अजूनच क्षीण झाली आहे. कम्युनिस्ट विचारधारेची मंडळी अस्तित्वाच्या अखेरच्या संघर्षात हिंसाचार आणि दहशतीचा मार्ग अवलंबतात याची प्रचीती यापूर्वी आलेली आहे. त्यामुळे भारतातील विशेषतः केरळमधील हिंसक घटनांमागेदेखील हेच कारण असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानेही डाव्यांना पोटशूळ झाला आहे. येत्या काळात राष्ट्रवादी शक्ती आणखी सशक्त होतील, अशा अनेक घटना केरळमध्ये घडत आहेत. राज्यातील अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीवर खुष होऊन भाजपाच्या पाठीशी उभे राहाण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर केरळातील हिंसाचाराचे गांभीर्य जाणून घेण्याची गरज आहे.
– चारुदत्त कहू
९९२२९४६७७४