वाचकांचे मनोगत

0
84

आम्ही सारे लाचार…!
मराठी भाषकांचा उदो उदो करीत गोंधळ सादर करायचा आणि जोगवा गज्जूभाई, मियॉंभाई यांच्याजवळ मागायचा, ही मराठी अस्मितेची फसवणूक कशासाठी? सबका साथ, सबका विकास या घोषणेत दम तरी दिसतो. मिराज शेख, साजिद सुपारीवाला, हारून खान आणि अन्य ३० अमराठी उमेदवार शिवसेनेच्या मुंबई पटावर सामील होणार, या वृत्ताने आम्ही सारे सत्तेसाठी लाचार, हाच अजेंडा जनतेपुढे येतो आहे. कुठे थांबणार हे सर्व? आणि कधी विकास घडणार? या सर्व गोष्टी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक वाटते.
अमोल करकरे
पनवेल
धाकटाही नकोच!
पंचेवीस वर्षे धाकटा असणारा भारतीय जनता पक्ष गेल्या लोकसभा व विधानसभेत निकालानंतर थोरला झाला हे शिवसेनेला सहन होत नव्हते. त्यामुळेच गेली अडीच वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असूनही शिवसेना भाजपाला सतत डिवचत राहिली आणि शिवसेनेचा प्राण असलेल्या मुंबापुरी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने युती तोडली. अशा वेळी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा संसार थाटलेल्या मनसेने, द्या टाळी! आपण युती करू! आपण थोरले आहात, थोरलेच राहा म्हणत मातोश्रीवर प्रस्ताव धाडला. परंतु आम्हाला धाकटाही नकोच म्हणत शिवसेनेने तो नाकारला. न जाणो उद्या हाही थोरला झाला तर तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले ही म्हण खरी व्हायची भीती सेनेला वाटली असावी!
सोमनाथ देशमाने
९७६३६२१८५६
पंतप्रधानांचा विचार देशहितार्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार बोलून दाखविला होता. या निवडणुका एकाच वेळी घेण्यामागचा उद्देश प्रामुख्याने प्रचंड निवडणूक खर्च वाचवण्याचा आहे. ही नक्कीच देशहिताच्या दृष्टीने चांगली बाब आहे. सर्व राजकीय पक्षांनी पंतप्रधानांच्या विधानावर गांभीर्याने विचार करावा.
प्रा. मधुकर चुटे
नागपूर
शेतकर्‍यांसाठी भरघोस पॅकेज
यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जासाठी दहा लाख कोटींचे पॅकेज देऊन शेतकर्‍यांविषयी आपली आस्था प्रकट केली आहे. सोबत खत सबसिडी, पीक विमा योजना आणि अन्य योजना आहेतच. एवढी मोठी तरतूद यापूर्वी कॉंग्रेसच्या राज्यात कधीही झाली नव्हती. तरी राहुल गांधी म्हणतात, शेतकर्‍यांसाठी काही नाही. त्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते.
विनायक पाटील
नागपूर
रेल्वे सुरक्षेकडे विशेष लक्ष
रेल्वेतील सुरक्षेबाबत देशभरातून होत असलेल्या आरडाओरडीची दखल अखेर मोदी सरकारने घेऊन रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख कोटींची तरतूद केली. त्यासाठी मोदी सरकारचे अभिनंदन. आता तातडीने उपाययोजना करून त्या मूर्त स्वरूपात दिसणे आवश्यक आहे. असे झाले नाही, तर पुन्हा जनतेच्या टीकेला सामोरे जावे लागेल, याची काळजी घ्यावी.
अमोल देशपांडे
नागपूर