पदवीधर निवडणुकीसाठी ६३.४६ टक्के मतदान

0
111

६ फेब्रुवारीला अमरावतीत मतमोजणी
तभा वृत्तसेवा
अमरावती, ३ फेब्रुवारी
अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचही जिल्ह्यांमध्ये सरासरी ६३.४६ टक्के मतदान झाले. शांततेच्या वातावरणात पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत असून, हे मतदान कोणत्या उमेदवाराच्या फायद्याचे झाले, हे ६ फेब्रुवारीला होणार्‍या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ हे पाच जिल्हे पदवीधर निवडणुकीचे क्षेत्र होते. भाजपाचे डॉ. रणजित पाटील, कॉंग्रेसचे संजय खोडके, प्रहारचे प्रा. दीपक धोटे, स्वतंत्र विचारसरणीचे डॉ. अविनाश चौधरी यांच्यासह एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. विभागातील २८० मतदान केंद्रांवर शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. कधी नव्हे त्या मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सकाळी ८ ते ४ या वेळेत अमरावती जिल्ह्यात ७६ हजार ६८६ मतदारांपैकी ४५ हजार ९६७ मतदारांनी हक्क बजावला. त्याची टक्केवारी ५९.९४ आहे. अकोला जिल्ह्यात ४७ हजार १५२ मतदारांपैकी २९ हजार ९१३ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६३.४४ आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये ३४ हजार ९१९ मतदारांपैकी २३ हजार ५११ मतदारांनी हक्क बजावला. त्याची टक्केवारी ६७.४४ आहे. वाशीम जिल्ह्यात १८ हजार ७३५ एकूण मतदार होते. त्यापैकी ११ हजार ९११ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६३.५८ आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३२ हजार ९९९ मतदार होते. त्यापैकी २२ हजार २४५ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६७.४१ आहे. पदवीधर निवडणुकीसाठी एकूण २ लाख १० हजार ४९१ मतदार होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ५८७ मतदारांनी मतदान केले. त्याची सरासरी टक्केवारी ६३.४६ आहे.
मतदान आटोपल्यानंतर पाचही जिल्ह्यांतील मतपेट्या अमरावतीत विभागीय क्रीडासंकुलामध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. या रूम सभोवताल कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान झाले आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये साधारणपणे ३५ ते ३८ टक्क्यांपर्यंतच मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत जवळपास २० टक्के मतदान अधिक झाले आहे.
हे मतदान निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १३ उमेदवारांपैकी कुणाला फायदेशीर ठरेल, हे ६ फेब्रुवारीला विभागीय क्रीडा संकुलात होणार्‍या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.