किशोर महाबळ यांचे जाणे…

0
136

रविवारची पत्रे
६ फेब्रुवारी २०१६. प्रा. डॉ. किशोर महाबळ यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस! उणंपुरं ५०-५२ वर्षांचं आयुष्य! शेवटची ४-५ वर्षे सोडली, तर उरलेल्या ४६-४७ वर्षांतील प्रत्येक दिवस ज्ञानसाधनेत घालवलेला! अध्ययन, अध्यापन, वाचन, लेखन, भाषण आणि या व्यतिरिक्त शिबिर, कार्यशाळा, कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, कनव्हेेनशन्स अन् काय काय… बुधवारची शाळा, फुटपाथवरची शाळा, पाड्यावरची शाळा, रात्रशाळा, आडगावातल्या भटक्या मुलांची शाळा…एक चालतंबोलतं विद्यापीठ स्वत:च जिज्ञासूंकडे जाई आणि दोन्ही ओंजळी भरभरून आपल्याजवळचं सर्व त्यांच्यासमोर रितं करी! एकच तळमळ, एकच आस, एकच धडपड- ‘जे जे आपणास ठावे ते इतरासी सांगावे| शहाणे करून सोडावे सकल जन॥ जीवनातील क्षण न् क्षण फक्त ज्ञान अर्जित करणे आणि नंतर त्याचे वितरण करणे, हाच एकमेव ध्यास! आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक/विद्यापीठीय स्तरांवरील प्रत्येक व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करणे आणि त्यास उचित न्याय मिळवून देण्याचे महान कार्य डॉ. महाबळांनी आयुष्यभर केले.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी लहानपणापासूनच वाचनाची विलक्षण आवड डॉ. महाबळांना होती. वाचलेले चटकन् आत्मसात करण्याची तीव्र बुद्धिमत्ता होती. ईसापनीती, अकबर-बिरबलाच्या गोष्टी, चांदोबा, मुलांचे मासिक वाचत वाचत मोठं होत असताना अधिक गंभीर, अधिक प्रगल्भ, विचारपरिप्लृत वाचनही ते अव्याहत करू लागले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्यशास्त्र, संस्कृत, इंग्रजी वाङ्‌मयातील अभिजात साहित्याचा त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता. अभावग्रस्त लोकांना, विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा त्यांचा पिंड होता. सतत ज्ञानप्रवण असणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पेशीचा जणू धर्म होता. आपल्या व्यवसायाप्रती त्यांची १०१ टक्के बांंधिलकी होती. अत्यंत नेक, प्रामाणिक आणि प्रांजळ अशी त्यांची वृत्ती होती. उत्सुकता, कुतूहल, जिज्ञासा, उपक्रमशीलता, कल्पकता आणि वेगवेगळ्या अभिनव पद्धतीने विद्यार्थ्यांप्रती पोहोचण्यात त्यांचा हातखंडा होता. साध्या विषयावरही किती असंख्य तर्‍हेने व्यक्त होता येते, ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट होती. केव्हाही भेटले तरी त्यांच्या नव्या उपक्रमांबद्दल ते भरभरून बोलत असत. त्यांच्यामधील तो उत्साह, ती ऊर्जा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होती. समकालीन अनेक विषयांवर अद्ययावत पद्धतीने लिहिण्याची त्यांची ऊर्मी कधीही उणी झाली नाही.
डॉ. किशोर महाबळ म्हणजे सळसळता उत्साह, हे समीकरण त्यांच्या दु:खद निधनानंतरही नेहमीसाठीच कायम राहणार आहे, हे निश्‍चित!
उषा गडकरी
९८२३२२२००१

वाऽरे ही देशभक्ती…!
२६ जानेवारी असो वा १५ ऑगस्ट, देशात आगळावेगळा माहोल बघायला मिळतो. शाळा, कॉलेज, ऑफिसेस, बँक अशा अनेक ठिकाणी झेंडावंदन केले जाते व अत्यंत उत्साहात हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. परंतु, आजकाल याच सेलिब्रेशनला एक अतिशय विचित्र वळण मिळाल्याचे आपल्याला आढळेल.
राष्ट्रीय सण आले की, काही मुलांच्या चमूंचे थेट रस्त्यांवरून, विचित्र आवाजाच्या गाड्यांवरून देशप्रेमाचे बीभत्स प्रदर्शन करण्यात येते. झेंडावंदन करून घरी परताना असेच एक विचित्र दृश्य समोर आले व देशप्रेमाचे नवे स्वरूप बघायला मिळाले. मला याच अत्यंत देशप्रेमी नागरिकांना विचारावेसे वाटते की, रस्त्यांवर जोरजोरात आवाज करणार्‍या गाड्या फिरवणे, शिवीगाळ करत फिरणे, तिरंग्याचा गैरवापर करणे, मोठमोठ्याने गाणी वाजवून नाचणे, हीच का आपली राष्ट्रीय सण साजरे करण्याची तर्‍हा? तसे बघायला गेले, तर आपल्या पिढीसाठी सेलिब्रेशन, पार्टीज्, एन्जॉयमेण्ट हे तर अगदी नेहमीचेच, मग तो कुठलाही ‘डे’ असो! परंतु, आपल्या मातृभूमीला अशा गैररूपात वंदन करणे कितपत योग्य आहे? एकीकडे ‘भारतमाता की जय’ यासारखे नारे लावत, तर दुसरीकडे मुली दिसल्या तर त्यांची छेड काढत हे दिवस साजरे करण्यात कसली देशभक्ती?
देशाचे जवान आज कुठल्या परिस्थितीत आपले संरक्षण करीत आहेत, याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही! हे लोक घरदार सोडून, जिवाची पर्वा न करत दिवस-रात्र विसरून आपले रक्षण करत आले, त्यांच्यासाठी हाच का तो मान? ‘ने मजसी ने’मधील सावरकरांच्या भावना समजून घेताना आजही अंगावर काटा येतो. त्यांचे मातृभूमीवरील प्रेम, देशासाठीची तळमळ तब्बल ६८ वर्षांनंतरही तितकीच तीव्र जाणवते. सावकरांसारख्या अशा असंख्य वीरांमुळे आज आपण स्वतंत्रपणे वावरू शकत आहोत. त्या सर्व अमर जवानांना हीच का आदरांजली?
देशाचे भविष्य घडवणे व (बि)घडवणे हे आपल्या हातात आहे. खरं तर सर्वात हुशार, तल्लख बुद्धीची, उत्साहपूर्ण, अत्यंत कल्पनाशक्तीने भरलेली, सक्षम अशी ही आपली २१ व्या शतकातील पिढी, असा हा देशाचा युवावर्ग, आज भारताला अव्वल स्थानी पोहोचविण्याची पूर्ण क्षमता ठेवतो. मित्रांनो, आपल्यातील चांगल्या गुणांचा असा गैरवापर करणे असे कितीसे योग्य म्हणावे? देशाचे स्वातंत्र्य टिकवणे हे आपलेही कर्तव्य नव्हे का? वेळ मिळाला तर नक्की विचार करा आणि देशभक्तीची तुमच्या मनातील व्याख्या थोडीशी एडिट करून बघा…
समृद्धी समीर जोशी
चंद्रपूर

निवेदिता भिडे : एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व
आ. निवेदिताताईंना पद्मश्री मिळाल्याचे कळले आणि अगदी मनापासून आनंद झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रामाणिक राहाणार्‍या माणसांची जशी नोटबंदीमुळे खंत गेली तशीच खरोखर गुणांची कदर होण्यामुळे खूपच छान वाटले. स्वामी विवेकानंदांनी जसा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व प्रेमयोग सांगितला, तो जसा आ. एकनाथजी रानडेंनी आचरणात आणून दाखविला, त्यांच्याच तोडीचे चारही योग निवेदितादिदीने आचरणात आणूून दाखविले. स्वत:च्या देह प्रकृतीची जराही तमा न बाळगता त्या अहोरात्र झटत आहे. हे सर्व योग अगदी जवळून पाहण्याचे भाग्य लाभलेला मी एक सामान्य माणूस स्वत:ला भाग्यवान समजतो. सातत्याने मौलिक वाचन करून त्या त्यांच्या उत्कृष्ट शैलीने समाजापर्यंत पोहोचत असतात. इतक्या तळमळीने की ते ज्ञान पचनी पडलेच पाहिजे. (ज्ञानयोग) सतत रात्रंदिवस प्रवास चालू आहे, जनसंपर्क अव्याहत सुरू आहे. (कर्मयोग) प्रभू रामचंद्रावर, रामायणावर नितांत श्रद्धा त्याचे महत्त्व पटवून सांगतात, (भक्ती योग) स्वत:च्या जवळच्या नातेवाईकाकडे जाऊन ज्या आस्थेने त्यांची विचारपूस करतात ते स्वाभाविक प्रेम पाहिल्यानंतर वाटतं, खरोखरच हाच तर ओलावा आणि प्रेमयोग.
सर्व घटनांचा साक्षीदार असणारा मी त्यांना पूर्ण शरणागत होऊन अभिवादन करतो आणि पुढील आयुष्याच्या खूप खूप अंत:करणापासून शुभेच्छा देतोे.
राजाभाऊ खानझोडे
९९२२९१८८२८

उद्धवजी, हे काय केले तुम्ही?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी स्वत:कडे वाईटपणा घेऊन युती तोडतो, असे सांगितले. परंतु आम्हाला हे पटले नाही. हिंदुत्व या विषयावर शिवसेना-भाजपा एकत्र आले. काही अंशी महाराष्ट्राचे चित्र पालटले असे वाटताना आपण युतीच तोडली. उद्धवजी! तुम्ही शिवाजी महाराजांचे सेवक. संभाजी राजाचे चरित्र वाचले असेलच. औरंगजेबाने संभाजी राजांचा खूप शारीरिक, मानसिक छळ केला. परंतु ते मुसलमान झाले नाही आणि तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी युती तोडली. कुणी म्हणतात, ‘तुमचा हप्ता बंद झाला म्हणून तुम्ही चिडले.’ शिवाजी महाराजांनी कर वसूल केला. परंतु हप्ता घेतल्याचे वाचले नाही. शिवसेना नावाला बट्टा लावू नका किंवा पक्षाचे नाव बदला. आपले चुलत बंधू राज ठाकरे यांनी ७ वेळा फोन केला. परंतु साधे बोलण्याचे औचित्य दाखविले नाही. निवडणुकीतील युती तोडली, परंतु राज्यातून पाठिंबा काढणार नाही. म्हणजे दोस्त म्हणून एक हात गळ्यात व दुसर्‍या हाताने पाठीत खंजीर. उद्धवजी! तुम्ही बाळासाहेबांचे बोट धरून राजकारणात आलात. ‘पितृ देवो भव’ म्हणतात. त्यांचे विचार-आचार अमलात आणा. नाहीतर बापाने कमावले, पोराने गमावले असे व्हायला नको.
निर्मला गांधी
नागपूर

कौतुकाचा सिनेमा – कौतुकाचा लेख
२९ जाने.च्या आसमंत पुरवणीमध्ये मो. बा. देशपांडे यांचा ‘कौतुकाचा सिनेमा’ हा लेख‘आठवणी नागपूरच्या’ अंतर्गत वाचण्यात आला. आणि कौतुक केल्याशिवाय राहावले नाही. कौतुकाचा सिनेमा इतका सर्वांगसुंदर लेख आहे, लेखकाकडून एकही मुद्दा चुकूनही सुटला नाहीये. मनानी तर चक्क त्या दिवसांमध्ये फेरफटका मारून पुन्हा एकदा साक्षात अनुभूती घेतली. विद्यार्थिदशेतील सारे दिवस एखाद्या सिनेमासारखेच झरझर डोळ्यापुढे सरकून गेले.
विशेषकरून गणेशोत्सवात दाखविल्या जाणार्‍या चित्रपट आणि त्यामागे चालणार्‍या पळापळीचे अगदी तंतोतंत वर्णन केलं आहे. त्यातही एकाच वेळी एकच चित्रपट अनेक गल्ल्यांमध्ये दाखविण्याचा अनुभव नित्याचा आणि अफलातून असायचा. अगदी जवळजवळ लागून असणार्‍या वस्त्यांमधून ते सहजसाध्य व्हायचं. जसं, गिरीपेठ, गोरेपेठ, टिळकनगर, धरमपेठ कॅनाल रोड, एक एक गल्लीनुसार वस्ती बदलायची. तसेच मामा रोड धरमपेठ, रजत महोत्सव धरमपेठ, झेंडा चौक धरमपेठ इत्यादी ठिकाणी ही गंमत चालायची. त्यात रील वारंवार तुटणे ही भानगडही असायची. सलग चित्रपट बघण्याचा दुर्मिळ आनंद फक्त गणेशोत्सवातच मिळायचा. आम्ही आणखी एक करायचो, घरून लहान सतरंजी किंवा आसनं घ्यायची आणि आपली बैठक त्यावर. जागा ही आरक्षित व्हायची. आजूबाजूच्या काही नजरांमध्ये असं काही न सुचल्याची असूया जाणवायची. त्यात पावसाळ्याचे दिवस असायचे ते! पाऊस सुरू झाला तरी जरा थांबला की, चित्रपट पुन्हा सुरू व्हायचा. असा तुटक तुटक पण संपूर्ण चित्रपट बघून चुरचुरत्या डोळ्यांनी घरी परत!
टॉकीजमधील सिनेमाबद्दलही मोहन देशपांडेेंनी अप्रतिम वर्णन केलंय्. पैसे देऊन तिकीट काढल्यावर, आत प्रवेश करायला एक सेकंदही उशीर नको असायचा. पडद्यावरील पहिल्या हालचालीपासून, पुन्हा पडदा अंधारात जाईस्तोवर सगळं बघितलं तरच पैसे वसूल! उशीर होणार्‍यांना अंधारात चाचपडत, द्वाररक्षक विजेरीच्या उजेडात दाखवेल तसं कसरत करत जावं लागायचं.
टॉकीजच्या चित्रपटात ‘करमुक्त’ चित्रपटांचा एक प्रकार असायचा. त्याचा तिकीटदर कमी असायचा. तसंच पंचशील टॉकीजमध्ये सर्वात शेवटच्या दोन रांगा दुपारी १२ वाजता असणार्‍या खेळासाठी सवलतीच्या दरात स्त्रियांसाठी राखीव असायच्या. एकच सिनेमा एकाच टॉकीजमध्ये जास्तीत जास्त टिकून असण्यात, स्पर्धा असायची. ‘जय संतोषी मॉं’ व्हेरायटी आणि शोले पंचशील हे त्याबाबत नक्की आठवतात. बाकी मग दूरदर्शन, २४ तास मुव्ही सार्‍यांचं यथायोग्य आणि अभ्यासपूर्ण वर्णन मो. बा. देशपांडेंनी केलेच आहे. परंतु या लेखामुळे खूप सार्‍या जुन्या दिवसांना आणि आठवणींना उजाळा मिळून उच्चप्रतीचा आनंद प्राप्त झाला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं!
२४ तास सर्व काही उपलब्ध असणारी आताची मंडळी त्या निखळ आनंदाला मात्र निश्‍चितपणे मुकली असं मनात आल्यावाचून मात्र राहावत नाही.
‘कौतुकाचा सिनेमा’ या लेखामुळे बरेच दिवसात खूप छान काहीतरी आपलं वाटणारं, वाचायला मिळालं. त्यासाठी लेखक श्री. मो. बा. देशपांडे यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद!
– मीनाक्षी मोहरील
९९२३०२०३३४