साप्ताहिक राशिभविष्य

0
563

५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०१७

सप्ताह विशेष
• सोमवार, ६ फेब्रुवारी- भक्त पुंंडलिक महाराज पुण्यतिथी- पंढरपूर, मंगळवार, ७ फेब्रुवारी- जया एकादशी, बुधवार, ८ फेब्रुवारी- प्रदोष, भीष्मद्वादशी, संतान द्वादशी, श्री गोंदवलेकर महाराज जयंती, गुरुवार, ९ फेब्रुवारी- विश्‍वकर्मा जयंती, गुरुपुष्यामृत योग (सकाळी १०.४५ ते सूर्योदयापर्यंत), श्री बालाजी देवस्थान घोडायात्रा- चिमूर (चंद्रपूर), शुक्रवार, १० फेब्रुवारी- माघी पौर्णिमा (प्रारंभ सकाळी ७.२८) क्षयतिथी, माघस्नान समाप्ती, मांद्य चंद्रग्रहण (भारतात दिसणार), गुरु रविदास जयंती, सविनार, ११ फेब्रुवारी- पौर्णिमा समाप्त (सकाळी ६.००), गुरुप्रतिपदा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी शैलगमन यात्रा- कारंजा, गाणगापूर,
• मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६

मेष : अनाठायी खर्च
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी मंगळ व्ययस्थानात आहे. त्याच्या सोबतीला शुक्र आहे. या दोघांवरही गुरूची शुभ दृष्टी आहे. शनि भाग्य स्थानात आहे. चंद्र धन स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर पंचम स्थानात येईल. आपली आर्थिक घडी विसकटणार नसली तरी व्ययातील शुक्र-मंगळ युती, त्याला हर्षल व चंद्राची जोड आपणास बरेच मनस्वी वागण्याची तर्‍हा देऊ शकतात. यामुळे आपला पैसा बराचसा व्यर्थ किंवा अनाठायी खर्च होऊ शकतो. काहींना खाण्या-पिण्याच्या सवयींवर बंधने घालण्याची गरज आहे. लग्नेश व्ययात, पंचमात राहू ही स्थिती विशेषतः छातीचे व हृदयाशी संबंधित त्रास असलेल्यांनी काळजी घेतली पाहिजे. शुभ दिनांक- ५, ६, ८.
वृषभ : आरोग्य जपावे
आपला राशीस्वामी शुक्र लाभ स्थानात मंगळासोबत आहे. येथे शुक्र स्वतःच्या उच्च राशीत आहे. योगकारक शनि अष्टम स्थानात आहे. गुरू पंचमातून शुक्राला पाहात आहे. चंद्र या आठवड्यात आपल्याच राशीतून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो सुखस्थानात येईल. शुक्र-मंगळ धनलाभासाठी निश्‍चितच उत्तम असले तरी ते प्रकृतीला त्रास निर्माण करू शकतात. जुन्या रुग्णांना, किंवा दीर्घ काळापासून आरोग्यविषयक काही त्रास असलेल्यांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. शनिसोबत असणारा प्लुटो अशा जुन्या त्रासांना अकल्पित वळण देऊन अडचणीत आणण्याची संधी सोडणार नाही, त्यामुळे सावध रहावयास हवे.
शुभ दिनांक- ५, ६, ७.
मिथून : उत्तरार्धात सुसंधी
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी बुध अष्टमस्थानात आहे. शनि सप्तम स्थानी आलेला आहे. दशमात मंगळ- शुक्र आहेत. चंद्र व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो पराक्रम स्थानात जाईल. हा आठवडा आपणास काहीसा शारीरिक व मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतो. आपल्या राशीस्वामी बुधाची भूमिका नकारात्मक आहे. गुरूच्या दृष्टीमुळे फारसे विपरीत काही घडणार नसले तरी हे युवराज अधूनमधून बंडखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावध असावे. आठवड्याच्या उत्तरार्धात काही लोकांना प्रवास योग संभवतात. काही युवक-युवतींना विवाहाचे योग लाभू शकतील. शुभ दिनांक- ७, ८, ९.
कर्क : उत्साहाचे वातावरण
आपला राशीस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी लाभ स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर धन स्थानात येईल. शनि षष्ठ स्थानी आलेला आहे. भाग्यस्थानात मंगळ व शुक्र विराजमान असून त्यांच्यावर गुरूची शुभकारक दृष्टी आहे. आपले शुभ पूर्वसंचित आता सक्रिय झाले आहे. अगोदर घेतलेल्या श्रमाचे, पार पाडलेल्या कामगिरीच्या यशाचे उत्तम फळ आता आपणास मिळू शकणार आहे. यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. अचानक एखादा मोठा आर्थिक लाभ मिळू शकेल. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी लाभतील. काहींना लांबच्या प्रवासाचे, विदेश गमनाचेदेखील योग लाभू शकतात. शुभ दिनांक- ९, १०, ११.
सिंह : प्रकृती सांभाळा
आपला राशीस्वामी रवि षष्ठात असून राशीस्थानी राहू आहे. धनस्थानात गुरू आहे. शनि पंचमस्थानात तर, मंगळ व शुक्र अष्टम स्थानात आहेत. त्यांच्यावर गुरूची दृष्टी असल्याने बराच त्रास वाचणार आहे. चंद्र दशमातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो आपल्याच राशीत मुक्कामास येईल. आपली आर्थिक बाजू या आठवड्यात समाधानकारक राहू शकेल, मात्र काहींना त्यातही बरेच चढउतार पाहावे लागू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने फारसे शुभदायक योग नाहीत. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, औषध-पाणी-पथ्ये सांभाळली पाहिजेत. शनिची सप्तम व लाभस्थानावर येणारी दृष्टी व्यावसायिकांना मंदी निर्माण करणारी ठरू शकते.
शुभ दिनांक- ३, ७, ८.
कन्या : स्पर्धेत यश मिळावे
आपला राशीस्वामी बुध या आठवड्याच्या सुरुवातीला पंचमस्थानात रविसोबत असून सुखस्थानात शनि आहे. राशीस्थानात गुरू मुक्कामास आहे. चंद्र नवम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो व्ययस्थानात जाईल. सप्तमात मंगळ-शक्र उत्तम आलेले आहेत. बुद्धीचा पुरेपूर वापर करून बुध यशाचे दान पदरात घालणार आहे. व्यावसायिक क्षेत्रातील या ग्रहमानाची शुभ फले दीर्घकाळ मिळत राहतील. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळावे. काहींना तो नोकरीच्या संधी लाभून त्यात आपली चुणूक दाखविता येईल. नेमक्या कामाने अधिकारीवर्ग खूश राहील. वाहन-घर वा अन्य मालमत्तेच्या खरेदीचा कल रहावा. युवक-युवतींना विवाहाचे उत्तम योग.
शुभ दिनांक- ५, ६, ९.
तूळ : व्यावसायिक शुभयोग
आपला राशीस्वामी शुक्र षष्ठ स्थानात मंगळासोबत आहे. त्याच्यावर व्ययातून गुरूची दृष्टी आहे. शनि पराक्रम स्थानात आहे. चंद्र या आठवड्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानात असून तो तेथून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर लाभ स्थानात जाईल. प्रामुख्याने आपले व्यवसाय-क्षेत्र व आर्थिक स्थाने या अनुकूल ग्रहयोगामुळे सक्रिय झालेली दिसत आहेत. नोकरी-व्यवसायात उत्तम योग यावेत. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी, भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ही संधी उत्तम ठरू शकेल. नवे व्यावसायिक करार, व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. नवीन ओळखी, नवे संबंध प्रस्थापित होऊ शकतील.
शुभ दिनांक- ७, ८, १०.
वृश्‍चिक : कलागुणांचा विकास
आपला राशीस्वामी मंगळ पंचम स्थानात शुक्रासोबत आहे. शनि धनस्थानी आहे. गुरू आपल्या लाभस्थानात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून, तो आठवडाअखेर दशम स्थानी येणार आहे. संतती, शिक्षण आणि कलागुणांच्या दृष्टींनी चांगले योग संभवतात. शिकणारी मुले, युवक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, कला-साहित्य-संगीत क्षेत्रातील व्यक्तींना शुभ योग लाभणार. शैक्षणिक प्रगती, कलागुणांचा विकास, त्या-त्या क्षेत्रातील कौशल्य यासाठी उत्तम काळ. कलाकारांना कौतुक आणि मान-सन्मानाचा लाभ होऊ शकतो. प्रकाशने, प्रदर्शने यांना उत्तम प्रतिसाद मिळू शकतो.
शुभ दिनांक- ५, ६, ९.
धनू :जोडीदाराचा उत्कर्ष
आपला राशीस्वामी गुरू दशम स्थानात असून शनि आपल्या राशीत आलेला आहे. बुध राश्यंतर करून धनस्थानात गेला आहे. चंद्र षष्ठ स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर भाग्य स्थानात येणार आहे. हे ग्रहमान आपल्या साथीदाराचा उत्कर्ष होण्याचे सुचवीत आहे. व्यावसायिक येणी, जुनी उधारी वसूल होऊन आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. काही काळापासून अडलेल्या रकमा या काळात येऊ शकतील. आपल्या व आपल्या जोडीदाराच्या आर्थिक स्थितीत सुधार घडून येण्याची ही नांदी ठरू शकणार आहे. खर्चाला काही नवीन वाटा सापडू शकतात; परंतु त्यावरील गुरूची दृष्टी पाहता हा खर्च निरर्थक जाणार नाही. शुभ दिनांक- ६, ७, ८.
मकर : चमत्कारिक अनुभव
आपला राशीस्वामी शनि व्ययस्थानात असून राशीस्थानी रवि व बुध आहेत. पराक्रम स्थानात योगकारक शुक्र व मंगळ तरभाग्य स्थानात गुरू आहे. अष्टमस्थानात राहू आहे. पंचम स्थानातून चंद्र भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो अष्टम स्थानात जाणार आहे. या ग्रहस्थितीमुळे आपणास काही चमत्कारिक अनुभव लाभू शकतात. काही कामे आपल्या अपेक्षेपेक्षा कमी काळात पूर्णत्वास जाऊ शकतात. प्रलंबित कामे अचानकपणे समोर येऊन कार्यभाग साधू शकतो. जमीन-जुमल्याची कामे, वारसा हक्काची कामे, वाटे-हिश्श्याची प्रकरणे मार्गी लागू शकतात. सर्वांच्या सहमतीने काही निर्णय होऊन सलोख्याचे वातावरण कायम राहू शकेल.
शुभ दिनांक- ५, ९, १०.
कुंभ : संधीचा लाभ घ्या
आपला राशीस्वामी शनि लाभस्थानात असून राशीत केतू आहे. गुरू अष्टमात आहे, तर योगकारक शुक्र मंगळाच्या सोबतीने धनस्थानात आहे. रविसोबत व्यय स्थानात बुध आलेला आहे. सुखस्थानातून चंद्र या आठवड्यातील भ्रमण सुरू करीत तो आठवडाअखेर सप्तम स्थानी जाईल. आपले सारे गणित नेहमीच बरोबरच येईल असे होऊ शकणार नाही. अनेकदा आपण द्विधा मनःस्थितीत राहून हातच्या संधी घालवण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना सार्‍या स्थितीचा पुरेपूर विचार करणे आवश्यक आहे. कोणाचेही मन दुखावेल असे वर्तन आपल्या हातून घडू नये आणि मनाला लागेल असे कुणाला बोलले जाऊ नये याची काळजी घ्या. शुभ दिनांक- ७, ८, ११.
मीन :उत्कर्षाचे योग
राशीस्वामी गुरू सप्तमस्थानात असून राशीस्थानी मंगळ आणि शुक्र आहेत. शनि दशम स्थानात आलेला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आपल्या पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो शेवटी षष्ठ स्थानात जाणार आहे. राशीस्वामी गुरूची पूर्ण दृष्टी असल्याने आपली जणू संपूर्ण कुंडलीच सुखाने सजली आहे. शुक्र उच्च आहे. त्याची सप्तमावर व गुरूची राशीवर दृष्टी हे समीकरण अतिशय उत्तम लाभ देणारे आहे. आपला स्वतःचा आणि जोडीदाराचा उत्कर्ष घडविणारा हा योग आहे. आर्थिक, कौटुंबिक, मानसिक, सामाजिक स्तरावर याचे अतिशय शुभ प्रभाव आपणास अनुभवास मिळावेत.
शुभ दिनांक- ९, १०, ११.