वास्तववाद व आधुनिकता

0
158

कलारंग
विसाव्या शतकात कला व आदर्शवाद या बाबतीत एक वेगळाच वाद उत्पन्न झाला. त्यात व्यामिश्रता होती. त्यामुळे यावर भरपूर प्रमाणात चर्चा घडून आली. या विचारधारेचे नाव म्हणजे ‘आधुनिकता.’ पाश्‍चात्त्य देशात आधुनिकतेला ‘फॅशन’ च्या स्वरूपात घेण्यात आले. अति सोप्या पद्धतीने जणुकाही आधुनिकता हा त्यांचाच प्रांत आहे. इतर कुणाचाच नाही. इतर ठिकाणी ‘आधुनिकता’ नाहीच असा एककल्ली विचार प्रगट झाला. यात किती तथ्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे आधुनिकता किंवा कशाला आधुनिकता म्हणायचे हे महत्त्वाचे प्रश्‍न या निमित्ताने समोर येतात. शिवाय कलेतील आधुनिकता म्हणजे काय हेही ठरवावे लागेल.
आधुनिक समाजात व संस्कृतीत जी प्रक्रिया घडते तिचा व कलेतील आधुनिकता यांचा सम्बंध आहे असा एक मतप्रवाह आहे. जणुकाही कलेतील आधुनिकतेचे स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्यात व्यामिश्रता नाही किंवा ती वादग्रस्त नाही. कलेतील आधुनिकतेला सामाजिक वा राजकीय मत प्रवाहांशीही जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कट्टरवाद, ईश्‍वरवाद, निरीश्‍वरवाद, प्रतिक्रियावाद या सवार्र्ंचा सम्बंध कलेतील आधुनिकतेशी जोडण्याचा विचार पुढे आला. ज्यांचा एकमेकांशी अजीबात सम्बंध नाही अशा कलेतील ‘क्युबिझम’ अतिवास्तवाद, पॉप आर्ट यांनाही कलेतील आधुनिकतेच्या छायेत मांडण्यात आले.
विसाव्या शतकाच्या पूर्वीदेखील कलेतील आधुनिकतेच्या विचारातून अनेक सिद्धहस्त कलाकृतींची निर्मिती झाली आहे. शिवाय विसाव्या शतकातील बर्टोल्ट ब्रेश्त, पॉल इल्युएर्ड, लुईस ऍरेगॉन, ब्लादिमीर मायाकोवस्की हे कलाकार आधुनिक धारणेतूनच वास्तववादाकडे वळले. त्यामूळे आधुनिक कला अर्थहीन नाही ही गोष्ट पहिले लक्षात घ्यायला हवी.
कला पद्धती व कलेतील कल यांचा सम्बंध कला सिद्धांत सप्रमाणित सिद्ध करण्यासाठी असतात. या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी असतात. कलेतील आधुनिकतेबाबत कलाकार वा विचारंवतांनी गंभीरता दाखवली नाही असे वाटते. त्यांनी अगदी उघड आधुनिकतेसम्बंधीचे तत्त्व लोकांना सांगितले. मात्र, कशाला आधुनिकता म्हणायचे याविषयी त्यांनी मंथन केले नाही. कुणीच अगदी व्यवस्थितपणे कलेतील आधुनिकतेची सर्वमान्य व्याख्या करू शकले नाही. उदाहरणार्थ, पॉपआर्ट चे सौंदर्यशास्त्राच्या पातळीवर अतिवास्तववादाशी साधर्म्य आहे ही गोश्ट पॉप आर्टिस्टला देखील माहीत नाही इतके हे कलाकार एकमेकांच्या कला पंथांबाबत अनभिज्ञ आहेत.
रशीयन लेखक ‘येवजेनी झामियातिन’ याने १९२३ साली लिहलेल्या ‘ऑन लिटरेचर, रिव्हॉल्युशन एण्ड एंट्रोपी’ या लेखातून कलेतील आधुनिकतेविषयी आपले विचार प्रकट केले. तो म्हणतो, ‘कला व विज्ञान समान दर्जाच्या आणि सहकारितेच्या तत्त्वावर जगाचे विश्‍व प्रदर्शित करतात. त्यातील दर्जाचे स्वरूप केवळ भिन्न असते. सर्व वास्तव रूप सरतेशेवटी स्थितिजन्य रूपाचीच अभिव्यक्ती असते. मात्र, निसर्गातील अभिव्यक्तीवर बंधने नसतात. ही अभिव्यक्ती सांकेतिक असते, अमूर्त असते आणि ती अवास्तव असते. वास्तववादात वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो. आधुनिकतेचे स्वरूप अपरम्परागत आहे. ते वास्तववादाच्या अगदी विरुद्ध असे आहे. कलेतील आधुनिकनतेने जागतिक संस्कृतीच्या ऐतिहासिक प्रवाहाची दिशाच बदलून टाकली. आधुनिकनतेचे अजून एक लक्षण आहे. ते म्हणजे आधुनिक विज्ञानावर तिचे अगदी वर-वर का होईना पण अवलंबून असणे.
एकोणिसाव्या शतकात सामाजिक संघर्षाचा निपटारा करण्यात मनुष्याला यश आले नाही. त्याची प्रतिक्रिया म्हणून कलेतील आधुनिकतेचा जन्म झाला. नवीन व पुरोगामी आदर्षाची जी निर्मिती झाली ते आदर्श समजण्यात देखील मनुष्य अपयशी ठरला. समाजातील पराकोटीच्या विरोधाभासामुळे आधुनिकतेची मानसिकता तयार झाली. आधुनिक जाणीव निर्माण झाली. ही गोष्ट समजण्यासारखी आहे.
कला ही नपुंसक आहे ही मान्यता आधुनिकतेला मान्य नाही. मानवीय आत्म्याची प्रचीती संपूर्णपणे कलेस झाली नसली तरी आधुनिकतेने तिला स्पर्श केला आहे. यामुळे कला दर्शन विस्कळित झाले असले तरी आधुनिकतेच्या स्पर्शाने तिला वेगळे रूप प्राप्त झाले हे सत्य नाकारता येत नाही. आधुनिकतेने पारम्परिक कलात्मक प्रतिमांचे विभाजन केले. असे करताना आधुनिकतेने व्यक्तिगत कलात्मक मूल्यांना आणि घटाकांना मान्यता दिली. व्यक्तिनिष्ठतेला महत्त्व दिले. निसर्गवादात ही व्यक्तिनिष्ठता कला प्रतिमेच्या वस्तुनिष्ठ आशयात दिसली. साहित्य व सिनेमात ही व्यक्तिनिष्ठता मानसिक महत्तेत आणि चैतन्यमयी प्रवाहातून जाणवली अभिव्यक्तिवादात ही व्यक्तिनिष्ठता भावनांचे ओझे वाहताना दिसली तर अमूर्त कला स्वरूपात ती रंग व बाह्माकार या स्वरूपात स्पष्ट झाली. या सर्व प्रकारातील घटकांना आधुनिकतेने प्रवाहित केले. अशा प्रकारे पारम्परिक कलात्मक प्रतिमांचे विभाजन करून आधुनिकतेने कलेला वेगळे वळण दिले. कलेतील आधुनिकतेने व्यक्तिनिष्ठता जपत असतानाच प्रतिमेच्या वस्तुनिष्ठतेला प्रस्थापित केले. हे आधुनिकतेचे कलात्मक वैशिष्ट्य आहे.
सामाजिक शक्तीचे वास्तव अनियंत्रित आहे आणि ते मानवीय मनाच्या कक्षेबाहेरचे आहे याचे दर्षन आधुनिक कलेतून घडले. सामाजिक प्रक्रियेचे मूळ स्रोत समजण्यात अयशस्वी ठरल्याने कलेतील आधुनिकतेने ऐच्छिक प्रतिमेचे तिरस्करणीय व द्वेषमूलक असे चित्र उभे केले. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर लबाडी करण्याचे नवे तंत्र मनुष्य शिकला हे ही एक सत्य आहे.
वैविध्याने नटलेली व सचोटीपूर्ण अषा विसाव्या शतकातील कलेमुळे ऐतिहासिक दृष्टीने विचार करता एक वेगळीच कलात्मक जाणीव विकसित झाली. विसाव्या शतकातील सर्वच मूल्यवान गोष्टींचा त्यात समावेश करण्यात आला. एक वेगळेच तंत्र उदयास आले. अर्थपूर्ण व बौद्धिक दृष्ट्या उच्च आशय कलाकृतीतून दिसू लागला. आधुनिकता असलेल्या विसाव्या शतकातील कलाकृतींमधून गहरी मानसिकता, उच्च अभिव्यक्ती आणि नावीन्यपूर्ण रचनांना कलाविष्कार बघायला मिळाला.

डॉ. विनोद इंदूरकर /९३२६१७३९८२