धोक्याची घंटा…!!

0
182

टेहळणी
चार राज्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वांचे लक्ष स्वाभाविकपणे तिथे एकवटले आहे. अशा वेळी देशाच्या अन्य भागात अथवा राज्यात काय चालले आहे त्याकडे माध्यमांचे आणि राजकीय नेत्यांचे नेमके किती लक्ष आहे असा प्रश्‍न पडतो आहे. सर्वजण देशाच्या उत्तरेकडे डोळे लावून बसले असताना दक्षिणेकडे सर्व काही आलबेल आहे काय? त्या राज्यांच्या अंतरंगात कोण डोकावून पाहणार? सरकारी गुप्तचर यंत्रणा नक्की जाग्या असतील असा आमचा विश्‍वास आहे तथापि ज्या घटना घडत आहेत त्या पाहिल्यावर देशप्रेमी नागरिकाचे मन नक्कीच चिंतेने ग्रस्त होईल.
२५ जानेवारी १९६५ दिनी एका युवकाने तिरुचिरापल्ली रेल्वे स्टेशनसमोर स्वत:ला जाळून घेतले होते. त्याचा मृतदेह कोळशागत काळाठिक्कर पडला होता. त्यानंतर काही तासांनी धर्मालिंगम नामक डीएमके नेत्याने त्या युवकाचे पत्र फडकावत केंद्र सरकार, हिंदी भाषा आमच्यावर थोपत आहे आणि त्याचा निषेध म्हणून हा बळी गेल्याचे सांगितले. पूर्ण जळलेल्या युवकाकडे पांढर्‍या शुभ्र कागदावर लिहिलेले पत्र कसे होते, ते पत्र जळले कसे नाही, असे प्रश्‍न कोणीही विचारले नाहीत. भावना भडकवून राजकीय हेतू साधण्यात आला. या गोष्टीला आता अनेक वर्षे उलटली. अद्याप तामिळनाडूमध्ये तोच भावना भडकवण्याचा उद्योग चालू आहे. त्या खेळात निष्पापांचा जीव जातो. देशविरोधी शक्ती त्यात उडी घेतात आणि त्यांना अनेकजण भावनाभरात साथ देतात. आजवर कधीही केंद्रातील कोणत्याही सरकारने तेथील दोन स्थानिक पक्ष निव्वळ राजकारणासाठी फुटीरतेचा भयानक खेळ खेळताहेत याकडे लक्ष दिले नाही. या खेळात आता देशफोड्या शक्ती उतरल्या आहेत आणि त्या अधिक चातुर्याने आपल्या चाली आखत आहेत हे भयावह आहे. याकडे लक्ष दिले नाही तर देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल असे दिसते.
वॄश्‍चिकस्य विषं पॄच्छे मक्षिकाया: मुखे विषम्‌|
तक्षकस्य विषं दन्ते सर्वांगे दुर्जनस्य तत्‌॥
सापांचे विष त्याच्या दातात असते, मधमाशीचे विष तिच्या मुखात असते आणि विंचवाचे विष त्याच्या शेपटीत असते. परंतु दुर्जन व्यक्तीचे विष मात्र त्याच्या संपूर्ण शरीरात भिनलेले असते.
स्वराज्याच्या लढाईत दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कधी भाषक अस्मिता उसळून आली नव्हती. स्वराज्योत्तर काळातील कणाहीन नेतृत्वाने या अस्मितेला डोके वर काढायला जागा उपलब्ध करून दिली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. इंग्रजांनी जाताजाता जो आर्य-द्रविड हा कपोलकल्पित सिद्धांत आपल्या माथी मारला, तो आपण इतिहास म्हणून अद्यापही मिरवतो आहे. त्यात फुटीची बीजे दडली आहेत याचा साधा वास देखील आमच्या पूर्वसुरींना आला नाही हे दुर्दैव नव्हे काय? मग रामस्वामी पेरियारचे ब्राह्मण हटाव हे आंदोलन त्या कल्पित सिद्धांतातूनच निर्माण झाले. पुढच्या काळात तर हिंदू हा आमचा धर्म नव्हे आणि आम्ही द्रविड म्हणजे वेगळेच आहोत, अशी मांडणी जाणीवपूर्वक करण्यात येऊ लागली. तिथेही दुर्लक्ष करण्यात आले. त्यातून डीएमके आणि एआयडीएमके हे दोन पक्ष भाषक आणि प्रांतीय अस्मिताव पराकोटीचा परंपरावाद यावर पोसले गेले.
कॉंग्रेसने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. आता परिस्थिती बदलली असल्याने मोदींना आणि संघाला विरोध करणार्‍या शक्ती मुद्दाम विघ्ने निर्माण करीत आहेत. त्यासाठी हिंदूंमधील एका परंपरेचे निमित्त साधण्यात आले. जलीकट्टूच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली. हिंदूंच्या बाजूने उभे आहोत असे दाखवून प्रत्यक्ष आंदोलनात हिंसेचा अवलंब करायचा आणि त्यासाठी तरुणांना भडकवायचे अशी रणनीती आखण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्व आरोप हिंदूंवर येतील अशी अटकळ बांधण्यात आल्याचे दिसते. मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम् यांनी जी माहिती दिली ती सुन्न करून टाकणारी आहे. धोक्याची घंटा वाजवणारी आहे. आपण बहिरे झालो असलो तर मात्र या घंटेचा काहीच उपयोग होणार नाही.
आंदोलन हे जलीकट्टूच्या नावाने आणि घोषणा मात्र लादेनच्या देण्यात आल्या, त्याचे फोटो झळकावले गेले. देश तोडण्याची भाषा वापरली गेली. स्वतंत्र तामिळ ईलम उभारण्याची मागणी करण्यात आली. यासाठी नक्कीच काही महिने आधीपासून तयारी केली गेली असणार. त्याशिवाय इतक्या मोठ्या संख्येने लोक बाहेर पडणार नाहीत. लोकांना अस्मिता आणि परंपरा याची आठवण करून देण्यात आली. तरुणांना केंद्राकडून तामिळांची अस्मिता धूत्कारली जाते आहे आणि हिंदी भाषा थोपली जाणार असल्याची भीती दाखवण्यात आली असणार. यात दोन सहस्र लोकांनी चक्क पोलिसांवर पेट्रोलबॉम्ब घेऊन हल्ला केला. मरीना बीचवर दहा सहस्र आंदोलक आपोआप जमत नसतात. त्यात भर पडली ती सिनेअभिनेते आणि अन्य कलाकारांची. तेथील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट प्रसारमाध्यमे, राजकारणी आणि विद्यार्थी संघटना यात अहमहमिकेने सामील झाल्या होत्या. त्यांनी पाठिंबा जलीकट्टूला दिला होता. कटु गोष्टींना नव्हे, हे त्यांना आता कदाचित कळले असेल. या सर्व प्रकारामागे जिहादी आणि ख्रिस्ती संघटनासामील असल्याचा दावा एका संस्थेने केला आहे.
मोदींच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. भारतात न राहाण्यासाठी सार्वमत घ्या आणि हिंदी हिंदूंच्या देशात आम्हाला राहायचे नाही, असे फलक घेऊन विद्यार्थी उभे केले गेले होते. गंमत म्हणजे जलीकट्टू सुरू झाल्या नंतरसुद्धा हे आंदोलक मरीना बीचवर बसून होते. इथेच त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते. इतक्या मोठ्या गोष्टीचे वृत्त देण्यासाठी आपल्याकडील वाहिन्यांना बहुधा वेळ मिळाला नसावा. यावर चर्चासुद्धा झालेली पाहण्यात आली नाही. तामिळ इलम ही मागणी श्रीलंकेत प्रभाकरनच्या एलटीटीइ लिट्टे या अतिरेकी संघटनेने केली होती. प्रभाकरन २००९ मध्ये मेला. तथापि त्याचे अनेक टायगर जीव वाचवून तामिळनाडूत आश्रय घेऊन असण्याची शक्यता आहे. मुळात प्रभाकरनबद्दल सहानुभूती बाळगणारे आणि त्याच्या संघटनेला मदत करणारे अनेक तामिळ नेते होते आणि आजही आहेत. जर लिट्टेचे लोक या आंदोलनात घुसले असतील तर भविष्यात नक्कीच डोकेदुखी निर्माण होणार. आपल्याकडील माध्यमे या मोठ्या धोक्याकडे दुर्लक्ष करत आहेत की त्यांना त्याचे गांभीर्य कळत नाही?
एक मोठा असंतोष खदखदतो आहे. जर वेळीच कठोर पावले उचलली गेली नाहीत तर भविष्यात काहीही उत्पात होऊ शकतील याची गृहखात्याला आणि पर्यायाने केंद्राला जाणीव असेल अशी आशा आपण बाळगू शकतो इतकेच…!!

डॉ. सच्चिदानंद शेवडे